पणजी ः पुढारी वृत्तसेवा : पंचायत निवडणूक प्रभाग फेररचनेनंतर आक्षेप आणि सूचनांसाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी गोवा कॅन या संस्थेने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. आक्षेप व सूचना नोंदवण्यासाठी दिलेला वेळ अपुरा असल्याकडे या संस्थेने आयोगाचे लक्ष वेधले आहे.
याविषयी संस्थेचे समन्वयक रोलँड मार्टिन्स यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, की प्रभाग फेररचनेची सूचना देणारी जाहीर सूचना 25 फेब्रुवारी रोजी दिल्याने सूचना आक्षेपांसाठी 6 दिवसच उपलब्ध झाले. रविवारी मामलेदार कार्यालये बंद होती त्यामुळे प्रत्यक्षात पाचच दिवस यासाठी उपलब्ध झाले. 186 पंचायतीतील लोकांशी संबंधित असा हा विषय आहे.
केवळ तालुका पातळीवर प्रभाग फेररचना उपलब्ध केल्याने गावातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. बार्देश तालुक्यात 33 ग्रामपंचायती तर सासष्टीत 30 पंचायती आहेत. त्या गावातील लोकांना प्रभाग फेररचना पाहून त्याविषयी सूचना आक्षेप नोंदवण्यासाठी मोठी रांग लावण्याशिवाय पर्याय नाही.
यासाठी 189 ठिकाणांहून लोक 12 ठिकाणी आले तर केवढी गर्दी होईल याची कल्पना केली जावी. ही प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी प्रभाग फेररचनेची माहिती पंचायत पातळीवर गावातच उपलब्ध करणे इष्ट ठरेल. त्यासाठी नव्याने जाहीर सूचना देऊन सूचना आक्षेप नोंदवण्यासाठी किमान 10 दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?