Russia-Ukraine conflict : राजधानी कीव्हमध्ये जोरदार संघर्ष, रशियाचे हल्ले परतवल्याचा युक्रेनचा दावा | पुढारी

Russia-Ukraine conflict : राजधानी कीव्हमध्ये जोरदार संघर्ष, रशियाचे हल्ले परतवल्याचा युक्रेनचा दावा

किव्ह; पुढारी ऑनलाईन

Russia-Ukraine conflict : युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रशियन आणि युक्रेनियन सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. तिसऱ्या दिवशी शनिवारी कीव्हमध्ये तीव्र लढाई सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. कीव्ह शहरातील वासिल्किव भागात जोरदार संघर्ष सुरु असल्याची माहिती युक्रेनियन सशस्त्र दलाने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. रशियाच्या लष्करी विमानावर हल्ला केला असून यात शत्रुचे मोठे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनियन सशस्त्र दलाने म्हटले आहे.

युक्रेनचे सैन्य रशियन हल्ले मागे परतवण्याचा प्रयत्न करत आहेत. कीव्हमधील लष्कराच्या तुकडीने रशियन सैन्याला मागे हटवण्यास भाग पाडल्याचे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. रशियाने कीव्हमधील लष्करी तुकड्यांपैकी एकावर हल्ला (Russia-Ukraine conflict) केला. पण हा हल्ला परतवून लावल्याचे युक्रेनियन सशस्त्र नमूद केले आहे.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी, रशिया कीव्ह शहरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. पण आम्ही राजधानी कीव्ह गमावू शकत नाही, असा इशारा त्यांनी देशाला संबोधित करताना दिला आहे.

रशियाचे युक्रेनच्या नागरी वस्त्यांवरही जोरदार हल्ले सुरु आहेत. कीव्हच्या उत्तर भागात रशियन रणगाडे दाखल होत असल्याचे एक चित्रणही समोर आले आहे. मध्यरात्रीनंतर एका अपार्टमेंटमध्ये स्फोट झाल्याने शेकडो नागरिक जखमी झाले. कीव्ह शहराला गुडघ्यावर आणण्याचे शत्रूने ठरवून टाकलेले आहे, असे हताश उद्गार कीव्हचे महापौर व्हिटाली क्लिटस्च्को यांनी काढले आहेत.

अमेरिका आणि नाटोबद्दलच नव्हे तर उर्वरित सार्‍या जगाबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी, ‘सर्वांनी आम्हाला एकटे पाडले’, असे हताश उद्गार काढले आहेत. रोमानियाच्या जहाजावरील रशियन हल्ला आणि काळ्या समुद्रात उठलेल्या आगीच्या कल्लोळांतून युक्रेनसाठी आशेची पालवी फुटते काय, नाटो सदस्य रोमानियाच्या जहाजावरील रशियन हल्ल्यानंतर तरी नाटो आणि अमेरिकन फौजा युक्रेनच्या बाजूने रणांगणात उतरतात काय, याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे.

युक्रेनवर रशियन हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी शुक्रवारी रशियाचा खोटारडेपणाही समोर आला. आम्ही फक्त लष्करी ठाण्यांवर हल्ले करीत आहोत, नागरी वस्त्यांवर नाही, असे रशिया जगाला गुरुवारपर्यंत खणकावून सांगत होता… आणि शुक्रवारी युक्रेनमधील शहरा-शहरांतील उद्ध्वस्त झालेल्या इमारतींची, बेघर झालेल्या लोकांची छायाचित्रे समोर आली. रशियाचा बुरखा फाटलेला असला तरी क्रौर्य आटलेले नाही. रशियन फौजा युक्रेनियन राजधानी कीव्हमध्ये हल्ले करत आहेत.


Back to top button