पणजी : गोव्यासह देशातील नऊ सुंदर पर्यटनस्थळांना स्थान: ‘कोंड नेस्ट ट्रॅव्हलर’ची यादी प्रसिद्ध | पुढारी

पणजी : गोव्यासह देशातील नऊ सुंदर पर्यटनस्थळांना स्थान: ‘कोंड नेस्ट ट्रॅव्हलर’ची यादी प्रसिद्ध

पणजी : पुढारी वृत्तसेवा
‘कोंड नेस्ट ट्रॅव्हलर’ या मासिकाने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील 30 सर्वांत सुंदर पर्यटनस्थळांची यादी जाहीर केली आहे. भारतातील नऊ पर्यटनस्थळांना स्थान दिले असून, गोव्याला प्रामुख्याने त्यात अग्रक्रमांक मिळाला आहे. कोंड नेस्ट ट्रॅव्हलर (इंडिया) हे मासिक असून त्यांची वेबसाईट आहे. ते दरवर्षी जगातील सुंदर पर्यटनस्थळांची यादी प्रसिद्ध करतात. त्यामध्ये या पर्यटनस्थळांची संपूर्ण माहिती दिली जाते. जागतिक स्तरावरील पर्यटनास चालना देण्यासाठी त्यांच्याकडून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव अशा सिंधुदुर्गनगरीचा समावेश करण्यात आला आहे.

लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्‍त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्‍कीम, मेघालय, ओडिशा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भीमताल, केरळमधील आयमानम अशा 9 भारतीय पर्यटनस्थळांचा यामध्ये समावेश आहे.
यंदाच्या सर्वांग सुंदर पर्यटनस्थळांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश झाल्याने हा जिल्हा आता जगाच्या नकाशावर आला आहे.
गोवा हे आतंरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आहे. या राज्यातील निसर्गसंपन्न भाग आणि किनारे हे पर्यटकांना मोहिनी घालतात. त्याशिवाय मुक्तछंद राहणे, फिरणे हे गोव्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच जगाच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक गोव्यात दाखल होत असतो.

स्वच्छ सुंदर किनारे, समुद्रातील प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, त्सुनामी आयलंड या सारख्या पर्यटनस्थळांविषयी थोडक्यात माहिती दिली गेली आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन सोपे झाल्याने जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सिंधुदुर्ग पोहोचला आहे.या यादीमध्ये श्रीलंका, भूतान, कतार, जपान, युएई, इजिप्त, ओक्लाहोमा, सेऊल, गोबन, उझबेकिस्तान या देशांचा पर्यटनस्थळ म्हणून समावेश आहे. आता या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या यादीत सिंधुदुर्गचा समावेश झाला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने खर्‍या अर्थाने सिंधुदुर्ग हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आल्याचे दिसून येते.

हेही वाचलत का ? 

Back to top button