जळगाव पुढारी वृत्तसेवा : धरणगाव तालुक्यातील चोरगाव शिवारात गेल्या दीड- दोन महिन्यापासून शेतशिवारात बिबट्याचा मुक्तपणे संचार होता. अखेरीस मंगळवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागास यश आले. त्यामुळे स्थानिक शेतकरी नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
धरणगाव तालुक्यात गेल्या दीड दोन महिन्यापासून बिबट्याचा संचार होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी वनविभाग अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार एरंडोल वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे, मानद वन्य जीव रक्षक विवेक देसाई यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी तळ ठोकून होते. अखेर मंगळवारी रात्रीच्या वेळी वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. सहा. वनसंरक्षक एस. के. शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एरंडोल दत्तात्रय लोंढे, अनिल साळुंखे वनपाल, एन. एन. क्षीरसागर, उमेश भारुळे, शिवाजी माळी, लखन लोकनकर, कांतीलाल पाटील, योगेश सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गेल्या महिना दीड महिन्यापासून चोरगाव सह अन्य परिसरा बिबट्याचा संचार असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वन विभाग मार्फत पिंजरा मागविण्यात आला होता. अखेर मंगळवारी नंदू पाटील यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. यासंदर्भात वनविभाग अधिकारी, विशेषतः वन्य जीव अभ्यासक विवेक देसाई यांचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील धरणगाव तालुकावासियातर्फे आभार मानतो. असे जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी म्हटले आहे.
दोनगाव, चोरगाव, आव्हाणी, निंभोरा, फुपनगरी याठिकाणी बिबट्याने 9 जनावरांचा फडशा पाडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. बिबट्याचा मुक्त संचार आणि शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले होते. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे शेतकऱ्यांनी केली होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आव्हाणी चोरगाव व नांदगाव या ठिकाणी वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावण्यात आले होते.
बिबट्याला त्याच्या मूळ रहिवास असलेल्या परिसरात सोडण्यात आले आहे.