INDvsWI 3rd ODI : रोहित शर्मा करणार संघात मोठे बदल, शिखर धवन-कुलदीपचे पुनरागमन निश्चित | पुढारी

INDvsWI 3rd ODI : रोहित शर्मा करणार संघात मोठे बदल, शिखर धवन-कुलदीपचे पुनरागमन निश्चित

अहमदबाद; पुढारी ऑनलाईन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे (INDvsWI 3rd ODI) मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारी (दि. ११) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्डेडियमवर खेळवला जाणार आहे. सलग दोन सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. आता शेवटचा सामना जिंकून मालिकेत पाहुण्या संघाला क्लीन स्वीप देण्याकडे रोहित (Rohit Sharma) आणि टीमचे लक्ष्य असेल. दरम्यान, तिसऱ्या वनडेत कर्णधार रोहित शर्मा संघात अनेक बदल करू शकतो. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…

तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीमध्ये बदल होऊ शकतो. या सामन्यात कर्णधार रोहितसोबत शिखर धवन दिसेल (shikhar dhawan) अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे धवन पहिला सामना खेळू शकला नाही आणि दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही, मात्र तिसऱ्या सामन्यात त्याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पहिल्या वनडेत रोहित शर्मासह इशान किशन सलामीला (ishan kishan) आला होता. तर दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतकडे (rishabh pant) सलामी फलंदाजाची जबाबदारी देण्यात आली ओती. मात्र इशान आणि पंत हे दोन्ही खेळाडू सलामीला येऊन मोठी खेळी साकरू शकले नाही. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करणारा धवन संघाचा भाग बनू शकतो.

तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार विराट कोहलीच (virat kohli) येईल. पहिल्या दोन सामन्यात विराटने फलंदाजीत निराशा केली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 8 आणि दुसऱ्या सामन्यात 18 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा स्थितीत अंतिम सामन्यात कोहली नक्कीच फॉर्मच्या शोधात मैदानात उतरेल असे बोलले जात आहे.

इशानला यष्टिरक्षक म्हणून मिळेल संधी…

चौथ्या क्रमांकावर केएल राहुल (k l rahul), पाचव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) आणि यष्टीरक्षक म्हणून इशान किशन प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दुसऱ्या सामन्यात राहुलने चांगली फलंदाजी करताना 48 चेंडूत 49 धावा केल्या, तर सूर्यानेही कठीण परिस्थितीत 64 धावांची खेळी केली. पहिल्या सामन्यात सूर्यकुमारने 34 धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका पार पाडली होती.

यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंतच्या जागी इशान किशनला खेळवता येईल. इशानही पहिला सामना खेळला आणि २८ धावा करून बाद झाला. तर, पंतला पहिल्या दोन सामन्यात 14.50 च्या सरासरीने केवळ 29 धावा करता आल्या आहेत. पंत दीर्घकाळापासून सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे त्याला विश्रांतीही दिली जाऊ शकते.

चहलच्या जागी कुलदीपला?

फिरकी गोलंदाजीचा विचार केल्यास युझवेंद्र चहलच्या (yuzvendra chahal) जागी कुलदीप यादवला स्थान देण्यात येईल. कुलदीपचे वनडे संघात पुनरागमन झाले असून आता शेवटच्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते का हे पहावे लागणार आहे. चहलने पहिल्या दोन सामन्यात 5 विकेट घेतल्या. अशातच त्याला विश्रांती देण्यात येईल असा अंदाज बांधला जात आहे. वॉशिंग्टन सुंदर दुसऱ्या फिरकी गोलंदाजाची भूमिका बजावू शकतो. सुंदरनेही पहिल्या दोन सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत.

वेगवान गोलंदाजीतही मोहम्मद सिराजच्या जागी आवेश खानला आणि शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चाहरला संधी मिळू शकते. आवेशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तो सिराजची जागा घेऊ शकतो. आवेशकडे वेगाने चेंडू फेकण्याचे कसब आहे. नव्या चेंडूवर तो सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेण्यातही पटाईत आहे. जर तो तिसऱ्या वनडेत खेळला तर या सामन्यातून तो वनडे पदार्पण करेल.

शार्दुल ठाकूरलाही विश्रांती देऊन चाहरला संधी दिली जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात दीपक चाहरने दोन विकेट घेतल्या आणि फलंदाजीत 54 धावा केल्या. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध कृष्णा संघात कायम राहू शकतो. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कृष्णाने 4 बळी घेत सामनावीराचा मान पटकवला.

तिसऱ्या वनडेसाठी भारताचा संभाव्य संघ..

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, आवेश खान, कुलदीप यादव, प्रणीक कृष्णा.

Back to top button