Ratnagiri crime : केळवडे खून प्रकरणातील संशयित आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी | पुढारी

Ratnagiri crime : केळवडे खून प्रकरणातील संशयित आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील केळवडे गावाच्या जवळील जंगलामध्ये गंभीर जखमी अवस्थेत एक व्यक्ती आढळली होती. तसेच उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला ( ratangiri crime ) होता. डॉक्टरांनी उपचारा दरम्यान त्या व्यक्तीसोबत घातपात झालेल्याचा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हाचा दाखल करण्यात आला होता. या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संजय उर्फ बंडा महादेव गुगे यास न्यायालायात हजर करताच त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दीपक ऊर्फ बाबू राजाराम गुरव (रा . वरचीवाडी , केळवडे , ता . राजापूर) हे गावाजवळील जंगलामध्ये गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले होते. त्यांना उपचाराकरीता प्रथम सिंधुदुर्ग येथील एका खासगी रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी दीपक यांच्या डोक्यात बंदुकीचे छरे असण्याची शक्यता वर्तविली होती. पुढील उचारासाठी दीपक गुरव यांना सिंधुदुर्गहून रत्नागिरीकडे घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची दखल घेत रत्नागिरी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाला गती दिली. ( ratangiri crime )

गुन्ह्याचे घटनास्थळ हे डोंगराच्या उतारावरील जंगलमय भागातील निर्जन स्थळ असल्याने तसेच गुन्ह्याच्या घटनास्थळी कोणताही पुरावा मिळुन येत नसल्याने तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. गुन्हा घडण्यामागील सर्व संभाव्य कारणे विचारात घेऊन त्यादृष्टीने पोलिस तपास करीत होते. गुन्ह्यात बळी गेलेल्या इसमास बंदुकीची गोळी लागल्याने पोलिसांनी घातपाताच्या दृष्टीने तपास करीत घटनास्थळाच्या आसपासच्या गावातील बंदुक बाळगणाऱ्या लोकांची माहिती घेतली. या संशयीत लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचेकडे चौकशी करणे सुरु केले.

त्यामध्ये केळवडे गावातीलच संशयीत व्यक्ती संजय उर्फ बंड्या महादेव मुंगे याच्याकडे अवैध बंदुक असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी संशयीत महादेव मुगे यास ताब्यात घेतले. संशयीत महादेव मुंगे याने गुन्ह्याची कबुली देत हा गुन्हा त्यानेच त्याच्याकडील बंदुकीने केल्याचे सांगितले. या प्रकरणी महादेव गुंगे यास न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून गुन्ह्याचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Back to top button