Kolhapur CPR : दुखणे सीपीआरचे, रुग्णांसह नातेवाईकांचीही फरफट, नातेवाईकांवर स्ट्रेचर, वॉकर घेऊन जाण्याची वेळ | पुढारी

Kolhapur CPR : दुखणे सीपीआरचे, रुग्णांसह नातेवाईकांचीही फरफट, नातेवाईकांवर स्ट्रेचर, वॉकर घेऊन जाण्याची वेळ

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शस्त्रक्रियेपूर्वी तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला इतरत्र तपासणीसाठी न्यावे लागते. एक्सरे, इको, सीटी स्कॅन अशा विभागांकडे रुग्णाला घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचर किंवा वॉकरची आवश्यकता भासते. दिवसभर वॉर्डमध्ये नंबर लावून स्ट्रेचर उपलब्ध होते; पण अशावेळी तुमच्या रुग्णाला घेऊन जाण्यासाठी वॉर्डबॉय मिळेल, याची शाश्वती सीपीआर रुग्णालयात मिळत नाही. यावेळी चार मजले उतरवून रुग्णाला आणताना त्याच्यासोबत नातेवाईकांचीही फरफट दररोज नजरेस पडते. (Kolhapur CPR)

जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून, तसेच कर्नाटक, कोकणच्या सीमाभागातील रुग्ण सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल होतात. अपघातग्रस्तावरील उपचार, भाजून जखमी झालेले रुग्ण, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया येथे यशस्वी होतात. हे सर्व विभाग सीपीआरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत.

दूधगंगा, वेदगंगा या दोन इमारतींमध्ये अतिदक्षता विभाग, महिला व पुरुष वॉर्ड आहेत. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णांना या इमारतींमध्ये ठेवण्यात येते. पण, एक्स रे किंवा हृदय तपासणीसाठी वेगळ्या ठिकाणी रुग्णाला घेऊन जावे लागते.

Kolhapur CPR : स्ट्रेचर ओढण्याचे तंत्र

स्ट्रेचर घेऊन जाताना त्याची चाके अचानक वळली जातात; पण प्रशिक्षित व्यक्ती तो योग्यरीत्या हाताळू शकतो. यामुळे रुग्णाला कोणताही धक्का पोहोचत नाही; पण अनेकदा वॉर्डबॉय नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनाच हे स्ट्रेचर घेऊन जावे लागतात. यामुळे रुग्णाला त्रास होण्यासह किरकोळ अपघाताचे प्रसंगही घडण्याची शक्यता असते. (क्रमश:)

रिक्त पदे भरणार केव्हा?

कर्मचार्‍यांच्या उपलब्धतेबद्दल विचारणा केली असता नेहमीप्रमाणे रिक्त पदांचे कारण दिले जाते. जिल्ह्याचे प्रमुख उपचार केंद्र असणार्‍या ठिकाणीच अशी कर्मचार्‍यांची वानवा असेल, तर विचारायचे तरी कोणाला, असा सवाल आहे; पण ही रिक्त पदे न भरल्याने सर्वसामान्यांना किती त्रास होतो, याचा विचार होणार तरी केव्हा?

Back to top button