कुडचडे मतदारसंंघ : कुडचडेत दोन नगरसेवकांची भूमिका गुलदस्त्यात; जोरदार रस्सीखेच | पुढारी

कुडचडे मतदारसंंघ : कुडचडेत दोन नगरसेवकांची भूमिका गुलदस्त्यात; जोरदार रस्सीखेच

रविना कुरतरकर, मडगाव
काँग्रेसचे अमित पाटकर यांनी नीलेश काब्रालविरोधी घटकांना काँग्रेस पक्षात समाविष्ट करून घेण्याचा सपाटा लावला आहे. काब्राल विरोधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कुडचडे-काकोडा पालिकेच्या नगरसेवकांना काँग्रेसच्या बाजूने आणण्यास अमित पाटकरांना अपयश आलेले आहे. कुडचडे काकोडा नगरपालिकेत काब्रालविरोधक म्हणून ओळखले जाणारे तीन नगरसेवक, विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे विरोधक बनले आहेत. काब्रालवर नाराज होऊन बाजूला गेलेले सुशांत नाईक आणि प्रदीप नाईक या दोन्ही नगरसेवकांनी भाजपचा राजीनामा दिलेला नाही. परिणामी ते काँग्रेसच्या पाटकरांना सहकार्य करतील का, हा प्रश्‍न आहे.

भाजपपासून दुरावलेले नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा केला होता. त्यांच्यासोबत नगरसेवक सुशांत नाईक सुद्धा भाजपच्या विरोधात गेले होते. उमेदवारीसाठी पाटकर आणि होडरकर यांच्यात चुरस होती. त्यावेळी सुशांत नाईक खंबीरपणे बाळकृष्ण होडरकर यांच्या पाठीशी होते. पक्षाने पाटकर यांच्या बाजूने झुकते माप देऊन त्यांना उमेदवारी दिली. होडारकर नाराज होऊन पाटकरांच्या विरोधात बंड न पुकारता त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. सध्या त्यांनी पाटकरांना पाठिंबा दिला असला, तरीही ते उघडपणे त्यांच्या प्रचारासाठी आलेले नाहीत. काँग्रेसमधील त्यांचे काही समर्थक सुद्धा पाटकरांकडे गेलेले नाहीत, असे कळते.

होडारकर यांच्यासोबत काब्राल यांची साथ सोडलेले नगरसेवक सुशांत नाईक यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. शिवाय ते उघडपणे पाटकरांच्या समर्थनासाठी उतरलेले नाहीत. नगरसेवक प्रदीप नाईक यांनी ही भाजपचा राजीनामा दिलेला नाही. या तीनही नगरसेवकांची भूमिका सद्या गुलदस्त्यात आहे. काहीजण काब्राल यांना जाऊन मिळाल्याची चर्चा आहे.

पाटकर यांनी सुशांत नाईक, यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. एका नगरसेवकाने सांगितले की, पाटकर यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यांनी त्या नगरसेवकांविषयी गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.काब्राल यांचे मंडळाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्रित आलेल्या गटात वरील तीन नगरसेवकांचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त अपर्णा प्रभुदेसाई, क्लेमॅन्टिना फर्नांडिस आणि मंगलदास घाडी यांचेही त्यांना सहकार्य लाभले होते. पालिकेत काब्राल विरोधी गट म्हणून ओळखले जाणारे हे सर्व नगरसेवक सध्या एकमेकांचे विरोधक आहेत. त्यापैकी नगरसेवक क्लेमॅन्टिना फर्नांडिस यांचे पती गाब्रियल फर्नांडिस कुडचडेचे आपचे उमेदवार आहे. नगरसेविका अपर्णा प्रभुदेसाई यांचे पती अनिल प्रभुदेसाई कुडचडेतून मगोपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत आहे. बाळकृष्ण होडारकर यांनी पाठिंबा काँग्रेसला दिलेला आहे.

विरोधी नगरसेवकांचा गट फुटला
नगरपालिकेवर मंडळ स्थापन करण्यासाठी निर्माण केलेला, विरोधी नगरसेवकांचा गट विधानसभा निवडणुकीत फुटल्यात जमा आहे. या गटातील सर्व नगरसेवकांनी आपल्या वेगळ्या चुली मांडल्या आहेत. नगरसेविकांचे पती आप आणि मगोपचे उमेदवार आहेत. या गटाचे प्रमुख पद सांभाळणारे बाळकृष्ण होडारकर सध्या काँग्रेसवासी झालेले आहेत. आनंद प्रभुदेसाई यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे मंगलदास घाडी यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. एकत्र येऊन काब्राल यांचा पराभव करण्याची स्वप्ने पाहणार्‍या या गटातील सर्व नगरसेवकांची तोंडे चार बाजूला झाल्याने त्याचा फायदा काब्राल यांना होण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडिओ : कसा आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2022 : जाणून घेऊया प्रा. डॉ. प्रकाश कांबळे यांच्याकडून

 

Back to top button