पणजीत बाबूश : भाजपच्या पहिल्या यादीत नंबर कोणाचा? | पुढारी

पणजीत बाबूश : भाजपच्या पहिल्या यादीत नंबर कोणाचा?

पणजी, पुढारी वृत्तसेवा: भाजपने गुरुवारी संभाव्य उमेदवारांची चक्क 37 मतदारसंघांसाठीची नावे पक्षाच्या संसदीय मंडळाच्या विचारार्थ पाठवली. बहुतेक ठिकाणी एकच नाव सुचवण्यात आल्याने त्या मतदारसंघात त्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब होणे ही केवळ औपचारिकता राहिली आहे. पणजी मतदारसंघातून विद्यमान आमदार आतानासिओ मोन्सेरात ऊर्फ बाबूश यांच्या एका नावाचीच शिफारस दिल्लीत केली आहे. मांद्रे मतदारसंघातून उमेदवारीसाठी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांच्या नावाची शिफारस केली आहे. मडगावसाठी उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांच्या नावाचा विचार करण्यात आला आहे.

भाजपच्या गाभा समितीची बैठक पक्षाच्या निवडणूक कार्यालयात गुरुवारी झाली. त्या बैठकीत पणजी मतदारसंघातून दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांचे नावही विचारात घ्यावे, अशी सूचना गाभा समितीच्या एका ज्येष्ठ सदस्याने केली. त्या मागणीला गाभा समितीच्या इतर सदस्यांकडून अनुमोदन किंवा समर्थन मिळाले नाही. या क्षणी मोन्सेरात यांना दुखावणे परवडणारे नाही. त्यांच्या नाराजीची झळ कित्येक मतदारसंघात बसू शकते याचा विचार केला जावा, असेही या बैठकीत सांगण्यात आले.

त्यामुळे उत्पल यांचे नाव गाभा समितीच्या पातळीवरच मागे पडले. त्यानंतर झालेल्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत साहजिकपणे मोन्सेरात यांचेच नाव पक्षाच्या संसदीय मंडळाच्या विचारार्थ पाठवण्याचे ठरवले. पर्रीकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीवेळीही उत्पल यांच्या नावाचा विचार भाजपने केला नव्हता. भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उत्पल यांना महिनाभरापूर्वी दिल्लीला बोलावून घेतले होते. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व नड्डा यांची उत्पल यांच्या उमेदवारीविषयी चर्चा झाली होती. आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.

दिवंगत पर्रीकर यांच्या काळापासूनच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आपण मोडू शकत नाही, असे उत्पल यांनी नड्डा यांना स्पष्ट केले होते. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उत्पल यांना दिल्लीला बोलावून त्यांना निवडणूक लढवण्याच्या हट्टापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांच्या नावाचा विचारच न केल्याने संसदीय मंडळ आपल्या अधिकारात उत्पल यांच्या नावाचा विचार उमेदवारीसाठी करणार काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मांद्रेतून पार्सेकर व सोपटे यांची नावे विचारार्थ पाठवली आहेत. भाजपच्या मांद्रे मंडळ समितीत सोपटे यांचे कार्यकर्ते असतानाही पार्सेकर यांचे नाव स्थानिक पातळीवरून कोणी सुचवले हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आपल्याला वरिष्ठांकडून उमेदवारी मिळणार असल्याचे पार्सेकर यांना वाटते तर जनमत आपल्या बाजूने असल्याने आपलाच विचार उमेदवारीसाठी होणार, असे सोपटे यांना वाटते.

सांगे मतदारसंघातून उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सावित्री कवळेकर, तसेच माजी आमदार सुभाष फळदेसाई उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्या दोघांची नावे संसदीय मंडळाच्या विचारार्थ पाठवली आहेत. काणकोण मतदारसंघातून विद्यमान आमदार उपसभापती इजिदोर फर्नांडिस आणि माजी मंत्री रमेश तवडकर हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्या दोघांची नावेही दिल्लीला पाठवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

येथेही दोघांची नावे विचारार्थ

सावर्डे मतदारसंघात सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊसकर आणि माजी आमदार गणेश गावकर यांचे नाव उमेदवारीसाठी विचारार्थ घेतले आहे. डिचोली मतदारसंघातून सभापती राजेश पाटणेकर यांच्यासोबतच भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस शिल्पा नाईक यांचे नावही दिल्लीला पाठवण्यावर निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. कुंकळ्ळीतून विद्यमान आमदार क्लाफासिओ डायस यांच्यासह मंडळ उपाध्यक्ष सुदेश भिसे यांचे नाव विचारात घेतले आहे.

काही नावांवर झाले शिक्कामोर्तब

निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत काही नावांवर शिक्कामोर्तब करून ती विचारार्थ मंडळ समितीकडे पाठवले आहे. त्यातील काही नावे अशी – पेडणे- प्रवीण आर्लेकर, शिवोली- दयानंद मांद्रेकर, थिवी- नीळकंठ हळर्णकर, कुंभारजुवे- सिद्धेश नाईक, हळदोणे- ग्लेन टिकलो, म्हापसा- ज्योशुआ डिसोझा, पर्वरी- रोहन खंवटे, ताळगाव- जेनिफर मोन्सेरात, वास्को- दाजी साळकर, केपे-चंद्रकांत कवळेकर, कुडचडे- नीलेश काब्राल आणि मडगाव- मनोहर आजगावकर.

हेही वाचलंत का? 

दोन-तीन मतदारसंघांतील नावे ठरत नव्हती, ती नंतर ठरतील. 15 रोजी उमेदवारांची नावे जाहीर होतील. भाजप एकाच यादीत सर्व नावे जाहीर करेल. गाभा समिती व निवडणूक व्यवस्थापन समितीत नावांवर चर्चा झाली.
– श्रीपाद नाईक, केंद्रीय राज्यमंत्री

 

Back to top button