Miraj news : दुबईतील बँकेकडून कर्ज देण्याच्या आमिषाने पोल्ट्री व्यावसायिकाला ९२ लाखांचा गंडा

Miraj news : दुबईतील बँकेकडून कर्ज देण्याच्या आमिषाने पोल्ट्री व्यावसायिकाला ९२ लाखांचा गंडा

मिरज : पुढारी वृत्तसेवा : दुबईतील बँकेकडून 21 कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने येथील पोल्ट्री व्यावसायिकाला 92 लाख 68 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याबाबत डॉ. दत्तात्रय दुबे यांनी सांगलीतील दोघांसह आठजणांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ( Miraj news )

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये योगेश जावळे, प्रमोद देशपांडे (दोघे रा. विश्रामबाग, सांगली), दिनेश देसाई, प्रवीण कुर्डूवार, भारत भूषण परांजपे, प्रवीणचंद्र मणीलाल शहा (सर्व रा. अहमदाबाद), डॉ. अलशरीफ, महंमद सरावत (दोघे रा. दुबई) यांचा समावेश आहे.

( Miraj news )पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मिरजेतील डॉ. दत्तात्रय दुबे यांचा सोलापूर येथे पोल्ट्रीफार्म आहे. त्यांनी व्यवसाय विस्तारासाठी परदेशी बँकेकडून कमी व्याजाने कर्ज मिळविण्यासाठी सांगलीतील योगेश जावळे व प्रमोद देशपांडे यांच्याशी संपर्क साधला होता.
त्यांनी अहमदाबाद येथील दिनेश देसाई, प्रवीण शहा यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. त्यानंतर दुबईतील रॅकिया इन्व्हेस्टमेंट अ‍ॅथॉरिटीमार्फत 21 कोटी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. डॉ. दुबे यांनी स्थानिक बँकेकडून कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करून रिझर्व्ह बँकेकडे पाठविले. तेथून लोन रजिस्टर क्रमांकासह कर्जाचा प्रस्ताव दुबईतील अलशरीफ व महंमद सरावत या मध्यस्थाकडे पाठविण्यात आला.

अलशरीफ याने स्टॅम्प ड्यूटी व प्रोसेस फी म्हणून 1 कोटी 25 लाख रुपये डॉ. दुबे यांना भरायला सांगितले. त्यानुसार अलशरीफ याने सांगितलेल्या बँक खात्यावर डॉ. दुबे यांनी वर्षभरात वेळोवेळी 78 लाख रुपये पाठवले. दिनेश देसाई, प्रवीण शहा यांनी कमिशन म्हणून 14 लाख रुपये घेतले.

त्यानंतर अलशरीफ याने दुबईतील बँकेची 21 कोटी रुपये जमा केल्याची ट्रान्स्फर स्लीप डॉ. दुबे यांना पाठविली. मात्र ही रक्कम जमा झाली नसल्याने डॉ. दुबे यांनी संपर्क साधला असता त्यांना दुबई व अहमदाबाद येथील मध्यस्थांनी आणखी रक्कम भरायला सांगितली. कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू झाल्याने डॉ. दुबे यांनी वरील आठजणांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे. कर्जाच्या आमिषाने 92 लाख 68 हजाराच्या फसवणुकीच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news