महाबळेश्‍वर तापमान : दुसर्‍या दिवशीही महाबळेश्‍वर @ शून्य

महाबळेश्‍वर तापमान : दुसर्‍या दिवशीही महाबळेश्‍वर @ शून्य

महाबळेश्‍वर : पुढारी वृत्तसेवा

(महाबळेश्‍वर तापमान) जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्‍वरमधील वेण्णालेक व लिंगमळा परिसरात हिमकण बनल्यानंतर दुसर्‍या दिवशी या परिसरात शून्य अंश डिग्री सेल्सिअस तापमान राहिले. त्यामुळे महाबळेश्वर शहरासह परिसरात थंडीचा कडाका गुरुवारीही कायम राहिला.

गुरुवारी पहाटे वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात शून्य अंश, तर महाबळेश्वर शहराचे 4 ते 5 अंश डिग्री सेल्सिअस तापमान होते. महाबळेश्‍वर शहरासह वेण्णालेक-लिंगमळा हा संपूर्ण परिसर धुक्यात हरवला होता. धुक्याने भरलेले डोंगर-दर्‍या मन मोहून टाकत होत्या. अंबेनळी घाटही धुक्यात हरवून गेला होता.(महाबळेश्‍वर तापमान )

गत चार-पाच दिवसांपासून शहर व परिसरात थंडीचा कडाका वाढला असून बुधवारी पहाटे वेण्णालेकसह लिंगमळा स्मृतिवन परिसरात हिमकणांचा गालिचा अंथरल्याचे

मनोहारी दृश्य पहायला मिळाले होते. परंतु, गुरुवारी दाट धुक्यात महाबळेश्‍वर शहर व परिसर हरवून गेला.
सध्या शासनाच्या कोरोना निर्बंधांमुळे महाबळेश्‍वर येथील प्रेक्षणीय स्थळे बंद असल्यामुळे पर्यटनस्थळी सध्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

येथील कडाक्याच्या थंडीमुळे स्थानिक नागरिकदेखील स्वेटर, शाल, मफलर, कानटोपी परिधान करून फेरफटका मारताना दिसत आहेत. वेण्णालेक व लिंगमळा परिसरात थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत.
गुरूवारी येथे दिवसभर ढगाळ वातावरण असून थंड वारे दिवसादेखील वाहत आहेत. तापमानातही चढ उतार होत आहे.(महाबळेश्‍वर तापमान )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news