देशात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, २४ तासांत २ लाख ६४ हजार नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट वाढला | पुढारी

देशात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, २४ तासांत २ लाख ६४ हजार नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट वाढला

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ६४ हजार २०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३१५ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कोरोना रुग्णसंख्येत ६.७ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. देशात सध्या १२ लाख ७२ हजार ७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटि रेट १४.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत १ लाख ९ हजार ३४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, देशात ओमायक्रॉन रुग्णसंख्या ५,७५३ वर पोहोचली आहे.

कोरोना महारोगराईने पुन्हा एकदा उच्चांक गाठल्याचे दिसून आले आहे. याआधीच्या दिवशी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत २७ टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवण्यात आली होती. बुधवारी दिवसभरात तब्बल २ लाख ४७ हजार ४१७ कोरोनाबाधित आढळले होते. तर ३८० रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९५.५९ टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता.

तिसऱ्या लाटेचा प्रभाव लक्षात घेता कोरोनाविरोधातील लसीकरणाला वेग देण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत. आतापर्यंत १५५ कोटी २८ लाख ७६ हजार ४३४ डोस लावण्यात आले आहेत. बुधवारी ७६ लाखांहून अधिक डोस देण्यात आल्याचे माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोना तपासण्यांना वेग आला आहे.

पोलिसांमागे कोरोनाचे शु‍क्लकाष्ठ

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेतही महाराष्ट्रातील पोलीस दलाला याचा फटका बसत असल्याचे चित्र सध्या आहे. गेल्या तीन दिवसांतील राज्यातील कोरोना बाधित पोलिसांची आकडेवारी पाहता यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत अनुक्रमे २९८, ३७० आणि ४०३ अशी पोलीस कोरोना रुग्णवाढ नोंदवली गेली आहे, तर सौम्य लक्षणे असलेल्या ९ हजार ५१८ पोलिसांना विलगीकरणात पाठविण्यात आले आहे.

जळगाव जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव; १३ कैदी पॉझिटिव्ह

कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून कोरोना महामारीचा शिरकाव आता जळगाव जिल्हा कारागृहामध्ये देखील झाला आहे. येथील १३ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नागपुरात ७३ ओमायक्रॉनबाधित, तर ६४ पोलिसांना कोरोनाची लागण

नागपुरात कोरोना पाठोपाठ ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंट बाधितांची संख्याही वाढत आहे. मात्र हे रूग्ण लक्षणे नसलेले आहेत. असे असले तरी प्रशासन खबरदारी घेत आहे. ‘सलाईन गार्गल’ या जीनोम सिक्वेंसिंगच्या नव्या पद्धतीमुळे नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था म्हणजेच नीरीमध्ये जीनोम सिक्वेसिंग होते. गुरूवारी करण्यात आलेल्या चाचणीत ७३ पैकी सर्व ७३ ओमायक्रॉन बाधित निघाले. यापूर्वी रविवार ९ जानेवारी रोजी करण्यात आलेल्या चाचणीत ५३ जण ओमायक्रॉन बाधित निघाले होते. दोन्ही मिळून ओमायक्रॉन बाधितांची संख्या १२६ इतकी झाली आहे. दरम्यान गुरूवारी नागपूर पोलीस दलातील १७ पोलीस कोरोना बाधित निघाले. त्यामुळे पोलीस दलातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६४ इतकी झाली आहे.

Back to top button