Phaltan crime : फलटणमध्ये पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून - पुढारी

Phaltan crime : फलटणमध्ये पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून

फलटण : पुढारी वृत्तसेवा (Phaltan crime) माजी नगरसेवक आणि त्याच्या दोघा मुलांसह सहाजणांनी तलवार, लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने पोलिस रेकॉर्डवरील दोघांंना मारहाण केली. या मारहाणीत एकाचा खून झाल्याची घटना घडली, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

नीलेश हिरालाल चव्हाण, असे खून झालेल्याचे नाव आहे. भरत फडतरे हा जखमी झाला आहे. दोघेजण पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सलीम शेख, जमीर सलीम शेख व सैफुला सलीम शेख (रा. कुंभारटेक, फलटण), बिलाल बागवान व राज बागवान, अशी संशयितांची नावे आहेत.(Phaltan crime)

याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास फलटण येथील श्रीराम पोलिस चौकीसमोर टोपी चौकात निलेश हिरालाल चव्हाण व त्याचा मित्र भरत फडतरे यांना आमच्या गल्लीतील मुलींची छेड का काढतो? असे म्हणून सलिम शेख व त्यांची दोन मुले जमीर शेख, सैफुला शेख व बिलाल बागवान, राज बागवान आणि एक अनोळखी व्यक्‍ती यांनी तलवार, लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत निलेश चव्हाण याला जोराचा मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

तसेच भरत फडतरे हा गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी बारामती येथे हलवण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद कांता हिरालाल चव्हाण यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दिली असून संशयितांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जमीर शेख व सैफुला शेख, बिलाल बागवान व राज बागवान यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना बुधवार दि. 19 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस निरीक्षक भारत किंद्रे करत आहेत.

Back to top button