पणजी : उत्पल पर्रीकर यांच्या आशा फडणवीसांनी उंचावल्या, उमेदवारी देण्यावरुन केले मोठे विधान - पुढारी

पणजी : उत्पल पर्रीकर यांच्या आशा फडणवीसांनी उंचावल्या, उमेदवारी देण्यावरुन केले मोठे विधान

पणजी : पुढारी वृत्तसेवा

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे गोवा भाजपच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यांचा मुलगा आहे म्हणून उमेदवारी देता येणार नाही; पण पक्षात काम चांगले असले तर पक्ष निश्चित उत्पल पर्रीकरांच्या (Utpal Parrikar) नावाचा विचार करेल, असे सांगत निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना आश्वस्त केले आहे.

उत्पल पर्रीकर यांनी भाजपने उमदेवारी दिली नाही तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी पणजी मतदारसंघात प्रचारही सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केल्याने भाजपचे संभाव्य उमेदवार आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही आपला अधिकृत प्रचार प्रारंभ पुढे ढकलला होता. आपल्या नावाचा पक्ष विचार करेल, अशी उत्पल पर्रीकर यांना आशा आहेत. त्यानुसार त्यांनी दोनवेळा दिल्ली दौरा करून वरिष्ठांच्या भेटीही घेतल्या होत्या. कामाला लागा एवढ्याच संदेशावरून उमेदवारी निश्चित होणार नाही, हे त्यांना माहीत होते. त्यामुळे थेट लोकांच्या दारात जाणे, भलेही अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी उत्पल यांनी केली आहे.

भाजपमधील एक मोठा नाराज गट, त्याशिवाय सारस्वत समाजाचा एक गट त्यांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट आहे. भाजप उमेदवारांची यादी पुढील आठवड्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय स्थानिक भाजपमध्ये उत्पल पर्रीकर यांना विरोध आहे, हा विरोध काही लपून राहिलेला नाही. मनोहर पर्रीकरांच्या कामाच्या शैलीला कंटाळलेले लोक आता दुसरा पर्रीकर नको म्हणून उत्पल यांना विरोध करीत आहेत, हे स्पष्ट आहे.

उत्पल यांना वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी मिळाली, तर स्थानिक व त्यांना विरोध करणारे नेते त्यांचे काम करतीलच, असेही नाही. या सर्व शक्यता उत्पल यांना माहीत आहेत. त्यामुळे दबाव आणून उमेदवारी मिळविण्याच्या फंद्यात ते पडत नाहीत.

उत्पलना वेगळा न्याय कसा?

उपमुख्यमंत्री तथा माजी नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र जोशुआ डिसोझा यांना त्यांच्या पश्चात म्हापशाची उमेदवारी देण्यात आली होती. त्या उमदेवारीसाठी पक्षाने पक्षीय कामगिरीचा निकष जोशुआंच्या बाबतीत लावला नव्हता. मग मनोहर पर्रीकरांच्याच मुलाला म्हणजेच उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्यासाठी पक्षातील कामाविषयीचा निकष कशासाठी, हा प्रश्न उपस्थित होतो.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मोराने दोस्ती शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही | Peacock viral video

Back to top button