मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघात भाजपकडून कोण लढणार?; मुख्यमंत्री सावंत यांनी जाहीर केले नाव - पुढारी

मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघात भाजपकडून कोण लढणार?; मुख्यमंत्री सावंत यांनी जाहीर केले नाव

पणजी; पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणूक ही गोव्याला विकासाच्या समृद्धीकडे नेणारी आहे. आणि त्यासाठी २०२२ मध्ये २२ अधिक जागा मिळवण्याचे ध्येय भाजपचे आहे. गोव्याच्या समृद्ध विकासासाठी आणि अपूर्ण विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपची सत्ता गोव्यात येणे गरजेचे आहे. त्यामध्ये पणजीची जागा भाजपला मिळायलाच हवी. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे. असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी केले.

पणजी येथील गोमंतक मराठा समाजाम सभागृहात पणजी भाजपा मंडळातर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमदार बाबूश मोन्सेरात, महाराष्ट्रातील आमदार संजय केळकर, व अॅडवोकेट निरंजन डावखरे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, महापौर रोहित मोन्सेरात, नगरसेवक, भाजप पदाधिकारी आणि भाजपाचे पणजी मतदारसंघ प्रभारी प्रेमानंद महांबरे तसेच जुने गोव्याचे दोन पंच सदस्यही उपस्थित होते.

बाबुशच मोन्सेरात हेच असतील भाजपचे उमेदवार

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पणजीचा विकास भरीव झालेला आहे. त्यामुळे लोकांना घाबरण्याची गरज नाही. बाबूश मोन्सेरात हेच भाजपचे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात उमेदवारच कुठे दिसत नाहीत. पणजीतील सर्व प्रकल्प पूर्ण झाले आहेत. येत्या काळातही नवे प्रकल्प येथे उभे राहतील आणि पणजी देशातील एक क्रमांकाचे शहर होईल. यासाठी भाजप सरकार महापालिकेला सर्व ते सहकार्य करत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

बाबूश मोन्सेरात यांनी तीन मतदार संघातून विजय मिळवला आहे. ताळगाव, सांताक्रूझ व पणजी या तीन मतदारसंघात निवडून येणारे ते एकमेव आमदार आहेत. पणजी महापालिकेतील ३० पैकी २५ नगरसेवकांचे त्यांना समर्थन आहे. त्यांचा मुलगा रोहित मोन्सेरात हा नगरसेवक व पत्नी जेनिफर मोन्सेरात महसूलमंत्री आहेत. पणजी पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचा तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सध्या त्यांच्यावर या केसेस सुरु आहेत. भाजप पणजीतून त्यांनाच उमेदवारी देणार आहे. नागरिकांमध्ये विशेष आकर्षण असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

भाजपचा काळामध्ये अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत. केंद्राकडून २२ हजार कोटींचे प्रकल्प गेल्या सात वर्षात गोव्यासाठी मिळाले आहेत. जुवारी हा देशातील एक क्रमांकाचा फुल होणार असून शेकडो विकास प्रकल्प उभे राहात आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे हा विकास शक्य झाल्याचे सांगून स्वतःच्या राज्यात एकही योजना न राबवणारे गोवेकरांना मात्र, फुकट देण्याचे आश्वासन देताहेत. येथे योजना जाहीर केल्या त्या स्वतःच्या राज्यात लागू कराव्यात असे आव्हान तृणमूल व आपचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी केले. लाडली लक्ष्मी, गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना यासारख्या अनेक योजना गोवेकरांना पुरेशा असून बाहेरील पक्षाने इथं येऊन योजनांचे भडीमार करण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

येत्या विधानसभा भाजपच जिंकणार आहे यात तिळमात्र शंका नसल्याचे सांगून जास्तीत- जास्त आमदार भाजपाचे यावेत यासाठी प्रयत्न करा. संपूर्ण गोव्यामध्ये भाजपाची लाट आलेली असून स्थिर व समृद्ध सरकार भाजप देऊ शकते यावर लोकांचा विश्वास आहे. असे सांगून गोव्यात जातीभेदाचे राजकारण करणाऱ्यांना, धर्म भेदाचे राजकारण करणाऱ्यांना , समाजात फूट पाडणाऱ्या पासून लोकांनी दूर राहावे. असे सांगून स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी भाजी, फळे, दूध, फुले या उत्पादनांमध्ये गोवेकरांनी पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सदानंद तानावडे म्हणाले की, भाजप गोवाभर लोकप्रिय पक्ष झालेला आहे. गेल्या दहा वर्षात भाजप सरकारने गोव्यात भरीव कामे केलेली आहेत. ती लोकांच्या समोर आहेत. विकासाचे रिपोर्ट कार्ड लोकांसमोर ठेवून भाजप निवडणुकीला सामोरे जात आहे. काणकोण ते पत्रादेवी पर्यतचा विकास सगळ्यांना दिसत आहे. अटल सेतू आणि पणजीतील विकास प्रकल्पाद्वारे पणजीचा भरीव विकास झालेला आहे . विकासाचा हा रथ पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा भाजपच सत्तेवर येणे गरजेचे असल्याचे तानावडे म्हणाले.

तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये महिलांना योजनांचा लाभ अगोदर द्यावे त्यानंतरच गोव्यात घोषणा कराव्यात. स्वतःच्या राज्यात काही न करता गोवेकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तृणमूल व आम आदमी पक्ष करत असल्याचे सांगून गोव्यामध्ये अठरा हजार पाचशेच्या आसपास तृणमूलचे समर्थक घुसलेले आहेत आणि त्यामुळे गोवा असुरक्षित बनला असल्याची खंत यावेळी तानावडे यांनी व्यक्त केली. बाबूश मोन्सेरात यांनी लोकांचे प्रेम संपादन केले आणि त्यामुळे त्यांना पणजीत मोठे माताधिक्य नक्कीच मिळेल असेही तानावडे म्हणाले.
पर्रीकर असते तर त्यांच्याविरोधात उभा राहिलो नसतो

भाजपा मोठा परिवार आहे. आपण काही वर्षांपूर्वी भाजपात होतो. पुन्हा एकदा भाजपात आलो त्यामुळे आपण आपल्या मूळ घरी आल्याचे प्रतिपादन बाबूश मोन्सेरात यांनी यावेळी केले. भाजपा मोठा परिवार असल्यामुळे त्यामध्ये सामावून गोव्याचा आणि पणजीचा विकास करण्याचे ध्येय आपण ठेवले आहे. याशिवाय जर मनोहर पर्रीकर पणजीमध्ये उमेदवार असते तर आपण त्यांचा विरोध कधीच उभा राहिलो नसतो असेही त्यांनी यावेळी सांगितले .

भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी नाराजी बाजूला सारून पणजीच्या विकासासाठी एकत्र यावे. पक्षाच्या हितासाठी पक्ष प्रथम हा मंत्र जपावा असे सांगून आपण ८० टक्के आश्वासने पूर्ण केल्याचे मोन्सेरात म्हणाले. लोकांसाठी काम करणे आवडते टीका करणाऱ्याकडे आपण लक्ष देत नाही. आपण सकारात्मक घेतो असे सांगून पणजीतील युवकांना ही रोजगार हवेत याची जाणीव सर्वांनी ठेवावी. असेही बाबूश मोन्सेरात यांनी जाहीरपणे सांगितले.

त्याप्रसंगी महाराष्ट्राचे आमदार संजय केळकर तसेच एडवोकेट निरंजन डावखरे यांनीही समयोचित भाषणे केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या एकूण सहकार्यामुळे होणाऱ्या विकासावर त्यांनी भाष्य केले. स्वागत मंडळ उपाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केले तर प्रास्ताविक पणजी भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उत्कर्षा बाणासातारकर यांनी केले. उपमहापौर वसंता आगशिकर यानी पणजीतील झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला.

हेही वाचलंत का? 

Back to top button