पणजी : पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील भाजपच्या विद्यमान सरकारमध्ये मंत्री असलेल्या दोन नेत्यांनी मंगळवारी (दि.11) रोजी विविध पक्षात प्रवेश केला. त्याचसोबत एका आमदाराने व एका माजी आमदारानेही पक्षांतर केले. त्यामुळे मंगळवार हा पक्षांतराचा दिवस ठरला आहे. प्रियोळचे अपक्ष आमदार गोविंद गावडे यांनी भाजपात प्रवेश केला. तर कळंगुटमधून भाजपच्या उमेदवारीवर सलगपणे दोन वेळा निवडून आलेले व काल भाजपच्या सदस्यत्वासह आमदारकी व मंत्रिपद सोडलेले मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मयेचे भाजप आमदार प्रवीण झांट्ये यांनी मगो पक्षात प्रवेश केला, तर फोंड्याचे मगोचे माजी आमदार लवू मामलेदार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महत्त्वाचे म्हणजे, गावडे यांच्या भाजप प्रवेशाला प्रियोळमधील मूळ भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. त्यांनी तेथे सामूहिक राजीनामा दिला असून, लोबो यांच्या काँग्रेस प्रवेशाविरोधात कळंगुट व शिवोली येथील काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी दंड थोपटले आहेत.
कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस व काँग्रेसचे सर्व नेते एकत्र आले असून, त्यांनी लोबो यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. शिवोलीतील काँग्रेसचे नेते राजन घाटे यांनी पणजीतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आज प्रवेश केलेल्या दोन्ही मंत्र्यांना स्थनिक पातळीवर विरोधाचा सामना करावा लागत आहे. लोबो यांच्यासोबत त्यांच्या पत्नी डिलायला लोबो यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गोविंद गावडे यांनी गोव्यात भाजपचे सरकार पुन्हा आणण्यासाठी आपण राज्यभर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मायकल लोबो यांनी गोव्यात भाजपला पर्याय काँग्रेसच असून, येत्या निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळणार असल्याचा दावा केला आहे.
पणजी येथील भाजप मुख्यालयात पक्ष प्रवेशावेळी गोविंद गावडे यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासोबत प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सहप्रभारी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी व केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश व राज्यसभा खासदार विजय तेंडुलकर उपस्थित होते. लोबो यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना कोरोनाची लागण झालेली असल्याने ते यावेळी उपस्थित नव्हते.
मुख्य राजकीय घडामोडी
– गोविंद गावडे यांचा भाजपमध्ये प्रवेश
– मायकल व डिलायला लोबो यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
– प्रवीण झांट्ये यांचा मगो पक्षात प्रवेश
– लवू मामलेदार यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
– प्रियोळ भाजपच्या नेत्यांचे सामूहिक राजीनामे
– कळंगुट व शिवोलीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
– मयेचे काँग्रेस संभाव्य उमेदवार अॅड. अजय प्रभूगावकर यांनी काँग्रेस सोडली
– मये काँग्रेस गटाचा सामूहिक राजीनामा
– शरद पवार यांचे दिल्लीतून काँग्रेस राष्ट्रवादी युतीसाठी प्रयत्न.
प्रवीण झांट्ये यांचा मगोत प्रवेश
डिचोली : देव सर्वत्र आहे. जिथे देव आहे तिथे कोणीच मागे पडणार नाही. मात्र, निष्ठा हवी. त्याच निष्ठेने मी पुढे जात आहे. दोनदा मुख्यमंत्री पदाची ऑफर आली, ती नाकारली. युवा नेते आता मगो पक्ष पुढे नेत आहेत, ही आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी प्रवीण झांट्ये यांच्या पक्षप्रवेशावेळी केले.
हेही वाचलंत का?
गोविंद गावडे हे सक्रिय व हुशार मंत्री असून त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. ते भाजपमध्ये आल्यामुळे भाजप विधानसभा निवडणुकीत '22 प्लस' नव्हे तर आता '24 प्लस'ची संख्या गाठणार आहे.
– डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्रीमायकल लोबो यांच्या प्रवेशामुळे राज्यात काँग्रेस बळकट झाली आहे. गोव्यातील लोकांना काँग्रेस सत्तेवर यावी, असे वाटत असून, लोबोंसारख्या नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे ती निश्चित सत्तेवर येईल.
– दिनेश गुंडू राव, काँग्रेसचे गोवा प्रभारी