

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अवघे सहाच नगरसेवक असल्याने छगन भुजबळ यांनी कधी महापालिकेत पाय टाकला नाही. मात्र, आता प्रशासकीय राजवट लागू झाल्याने ते महापालिकेत जाऊन राज्याच्या महाविकास आघाडीचा विकासकामे थांबविण्याचा फॉर्म्युला राबवित असल्याची टीका करत भुजबळांनी पालकमंत्री या नात्याने गेल्या अडीच वर्षांत राज्य सरकारकडून किती निधी आणला हे सांगावे, असे आव्हानच माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळांना दिले आहे.
पालकमंत्री भुजबळ यांनी महापालिकेत विविध विषयांवर सोमवारी (दि.25) आढावा बैठक घेतली होती. वादग्रस्त दोन्ही उड्डाणपुलांसह पीपीपी तत्त्वावर देण्यात येणार्या फाळके स्मारकाच्या प्रक्रियेला ना. भुजबळांनी स्थगिती देण्याचे आदेश प्रशासक रमेश पवार यांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर नाशिक दौर्यावर आलेले माजी पालकमंत्री महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधत ना. भुजबळांवर हल्ला चढविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे सहाच नगरसेवक महापालिकेत असल्याने इतके दिवस भुजबळांना कधी महापालिकेत जाता आले नाही. परंतु, आता प्रशासक राजवट लागू झाल्याने भुजबळ महापालिकेत जाऊन अधिकार्यांच्या भेटी घेत आहेत. आयटी पार्कचे काम थांबविण्याची सूचना करणे हे विकासाला थांबविण्यासारखे आहे. भाजपने गेल्या पाच वर्षांत शहरात अनेक चांगली विकासकामे केली आहेत. निओ मेट्रो, लॉजिस्टिक पार्क, आयटी पार्क, नमामि गोदा, सिटीलिंक बससेवा असे अनेक प्रकल्प भाजपने हाती घेतले आहेत. त्यामुळे या विकासाच्या जोरावर जनता मतपेटीतून उत्तर देईल.
अडीच वर्षे महाविकास आघाडीची राज्यात सत्ता असल्याने भुजबळांनी नाशिकसाठी किती निधी मिळवून दिला, याचे उत्तर भुजबळांनी द्यावे, असे आव्हानच महाजनांनी भुजबळांना दिले. अब्दुल सत्तार यांच्या व्हायरल व्हिडिओसंदर्भात विचारले असता शिवसेनेने सत्तारांवर कारवाई करून धर्मनिष्ठा दाखवून द्यावी, असे आवाहन करत राज्यात राष्ट्रपती राजवटीबाबत राज्यपाल निर्णय घेतील. गृहमंत्र्यांनी भोंगे प्रकरणी बोलविलेल्या बैठकीचे मुख्यमंत्र्यांना गांभीर्य नाही. त्यामुळे सरकार या प्रश्नावर अजिबात गंभीर नाही हे स्पष्ट होत असल्याची बाब महाजन यांनी निदर्शनास आणून दिली.
शिवसेना सत्तेसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करू शकते आणि त्यासाठी हिंदुत्वाची दिलेली आहुती हे आजचे मोठे उदाहरण आहे : गिरीश महाजन
सोंगाड्याचे हीरो राऊतच शोभतील
भाजपचे नेते म्हणजे राज्यातील नवे सोंगाडे, असा शब्दप्रयोग खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपबद्दल केला. त्याबद्दल गिरीश महाजन यांना प्रश्न केला असता सोंगाड्या चित्रपटाचे हीरो राऊत शोभले असते, असे सांगत महाजन यांनी संजय राऊतांवर पलटवार केला.
मनसे-भाजप युतीची चर्चा नाही
राज्यात मनसे आणि भाजप युतीबद्दल अद्याप कोणतीही चर्चा नाही. परंतु, राजकारणात भविष्यात काय होईल हे सांगणे अवघड आहे. आमदार अमोल मिटकरींच्या जिभेला हाड राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना शरद पवारांनी कानमंत्र द्यावा. सोमय्यांची जखम किती गंभीर नाही यापेक्षा पोलिसांकडून हल्ल्याची दखल घेतली जात नाही हे गंभीर असल्याचे गिरीश महाजन यांनी नमूद केले.