

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा होणार्या सर्व टाक्यांपासून तत्कालीन लोकप्रतिनिधींनी कर्मचार्यांवर दमदाटी व दबाव टाकून मुख्य पाईपलाईनला क्रॉस कनेक्शन जोडली आहेत. त्यामुळेच शहराला पूर्वी ज्या पद्धतीने पाणीपुरवठा होत होता तसा सध्या होत नाही. मुख्य लाईनचे सर्व क्रॉस कनेक्शन बंद करून पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
सुबराव गवळी तालीम परिसर, पद्मावती मंदिर, राधाकृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिर, माळी चेंबर्स या सर्व भागांमध्ये पाणी कमी दाबाने येत असल्याने स्थानिक नागरिकांनी डॉ. बलकवडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. बिले भरूनही पाणीपुरवठा होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत आहे. जनतेला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करावा अन्यथा भविष्यात ढिसाळ नियोजनामुळे जनतेला त्रास झाल्यास तीव— आंदोलन करू, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला. यावेळी काही महिलांनी घागर व तांबे आणले होते. कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळात सीमा पाटील, संगीता पाटील, सुनीता ढोबळे, जयश्री नाळे, अश्विनी लांबोरे आदींचा समावेश होता.
कचरा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी
भाजपने महापालिकेतील कचरा घोटाळा उघडकीस आणला. परंतु, अद्याप त्या घोटाळ्यातील दोषीवर प्रशासनाने कारवाई केलेली नाही. येत्या तीन दिवसांत घोटाळेबाजांवर कारवाई न केल्यास सोमवारपासून (दि. 2) आयुक्तांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा भाजपचे अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, विजय खाडे यांनी दिला आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना त्यासंदर्भात पत्र दिले आहे.