

पुणे : सनई-चौघड्याच्या सुरावटीत… ब्रह्मवृंदांच्या मंत्रजागरात… ढोल-ताशा पथकांच्या निनादात आणि मांगल्यपूर्ण वातावरणात मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या बाप्पाच्या मूर्तीची मंगळवारी विधिवत प्रतिष्ठापना झाली. 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष सगळीकडे दुमदुमला. हाच आनंद, उत्साह आणि हर्षोल्हास मानाच्या आणि प्रमुख गणपतीच्या मंडळांच्या मिरवणुकांमध्येही पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांच्या जोशात कोणतीही कमतरता नव्हती. बाप्पाच्या आगमनाने प्रत्येकात नवचैतन्य संचारले होते.
संबंधित बातम्या :
ढोल-ताशा पथकांच्या तालावर तरुणाई थिरकली अन् पुण्यातील देदीप्यमान स्वागत मिरवणुकीची अनुभूतीही पुणेकरांनी घेतली. बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण शहर गणेशमय झाले होते. मानाच्या आणि प्रमुख गणपतींच्या पारंपरिक मार्गावरून निघालेल्या मिरवणुकांनी पुणेकरांचे लक्ष वेधले अन् मंत्रोच्चाराने भारलेल्या वातावरणात मानाच्या आणि प्रमुख गणपतींची मुहूर्तावर विधिवत पद्धतीने प्रतिष्ठापना झाली. मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केलीच. पण, मिरवणुकीचे प्रत्येक क्षण त्यांनी मोबाईल कॅमेर्यात बंदिस्त केले. प्रत्येकाने बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा क्षण डोळ्यांत साठवत 'बाप्पा मोरया'चा जयघोष केला अन् प्रत्येक जण भक्तिरंगात न्हाऊन गेला.
आले रे आले गणपती आले….गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… आपला गणपती शारदा गणपती म्हणताना मंडईकरांचा अमाप उत्साह… ढोल-ताशांचा दणदणाट… गणरायावर होणारी फुलांची उधळण… अशा जल्लोषपूर्ण वातावरणात मंडईच्या श्रींचे आगमन झाले. फुलांनी सजलेल्या ओंकाररथातून पारंपरिक थाटात शारदा-गजाननाची आगमन मिरवणूक काढण्यात आली. गुरुपरंपरेची महती सांगणार्या स्वामी दरबारात गणरायांची प्रतिष्ठापना झाली. दुपारी साडेबारा वाजता अॅड. पराग एरंडे व अनुराधा एरंडे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीची आगमन मिरवणूक मार्ग अखिल मंडई मंडळ-मंडई पोलिस चौकी-बाबू गेनू चौक- रामेश्वर चौक येथून पुन्हा बाबू गेनू चौकमार्गे उत्सवमंडप असा होता. या वेळी समर्थ ढोल पथक आणि आवर्तन ढोल पथक ही वाद्य पथके आणि न्यू गंधर्व बँड यांच्या वादनाने मने जिंकली.
कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह, पारंपरिक वेशभूषेत असलेल्या महिला कार्यकर्त्या, ढोल-ताशा पथकांचा निनाद अन् गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मिरवणूक जल्लोषात पार पडली. सकाळी आठ वाजता उत्सव मंडपातून मिरवणुकीला सुरुवात झाली अन् वाजतगाजत मिरवणूक उत्सव मंडपाच्या ठिकाणी पोहचली. प्रभात बँड पथकाचे उत्कृष्ट वादन, संघर्ष, श्रीराम आणि शौर्य ढोल-ताशा पथकातील वादकांनी केलेला तालांच्या गजराने पुणेकरांना थिरकायला भाग पाडले. प्रथा आणि परंपरेप्रमाणे श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीतून उत्सवमंडपात आणण्यात आली. पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. 'बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशा पथकांच्या वादनाने एक वेगळेच वातावरण निर्माण झाले. श्रींची मूर्ती उत्सवमंडपात येताच मंत्रजागर सुरू झाला अन् सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी डॉ. आनंद ऊर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
सकाळी मिरवणूक सुरू झाली अन् मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली. आढाव बंधूंचे सुरेल नगारावादन, न्यू गंधर्व ब—ास बँडचे उत्कृष्ट वादन अन् शिवमुद्रा आणि ताल ढोल-ताशा पथकातील वादकांनी केलेल्या उत्कृष्ट वादनाने मिरवणुकीत रंग भरला अन् बाप्पाच्या आगमनानिमित्त झालेल्या सूरमयी वादनाने पुणेकरांचाही आनंद द्विगुणित झाला. मिरवणुकीला नारायण पेठेतील न. चिं. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज (गुळुंजकर यांच्या घरापासून) सुरुवात झाली आणि कुंटे चौक, नगरकर तालीम, अप्पा बळवंत चौकमार्गे मिरवणूक उत्सवमंडपात पोहचली. बाप्पाची मूर्ती चांदीच्या पालखीतून उत्सवमंडपात आणण्यात आली आणि सनई-चौघड्याच्या कर्णमधुर साथीत श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्री समर्थ घराण्याचे अकरावे वंशज भूषण महारुद्रा स्वामी महाराज (सज्जनगड, सातारा) यांच्या हस्ते गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली अन् 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष सगळीकडे दुमदुमला.
पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, गणरायाच्या आगमनानिमित्त ओसंडून वाहणारा उत्साह, फुलांच्या आकर्षक रथात आणि वाजतगाजत निघालेली बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक असे आनंदी, उत्साही आणि चैतन्यपूर्ण वातावरण गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीत पाहायला मिळाले. मिरवणुकीला सुरुवात होताच गणपती बाप्पाचा जयघोष अन् तालांचा गजर सुरू झाला. ही मिरवणूक गुरुजी तालीम मंदिर-गणपती चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-जोगेश्वरी चौकातून उत्सवमंडपात आली. सुभाष आणि स्वप्निल सरपाले यांनी साकारलेल्या फुलांच्या आकर्षक रथामध्ये गणरायाची मूर्ती विराजमान झाली होती. मिरवणुकीमध्ये जयंत नगरकर यांचे नगारावादन लक्षवेधी ठरले. गंधर्व ब—ास बँड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक, अभेद्य ढोल-ताशा पथक, शिवप्रताप ढोल-ताशा पथकांच्या वादनाने पुणेकरांची मने जिंकली. दुपारी तीन वाजता युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते श्रीगणेशाच्या मूर्तीची विधिवत पद्धतीने प्रतिष्ठापना करण्यात आली.
तुळशीबागेतील श्रीराम मंदिरापासून प्रभू श्रीरामचंद्रांच्या पालखीतून मंगळवारी सकाळी पूजेच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची मिरवणूक निघाली आणि मिरवणुकीतले प्रत्येक क्षण पुणेकरांनी आपल्या डोळ्यांत साठवून घेतले. तुळशीबाग राम मंदिर येथून बाबू गेनू चौक-मंडई-शनिपार रस्ता-बाजीराव रस्ता-नगरकर तालीम चौक-लक्ष्मी रस्त्याने मिरवणूक गणपती चौकातून उत्सवमंडपात आली अन् मिरवणुकीमध्ये मंगेश बँड पथकासह लोणकर बंधूंचे नगारावादन आणि समर्थ प्रतिष्ठान ढोल-ताशा पथकांच्या वादनाने गणेशभक्तांना खिळवून ठेवले. दुपारी साडेबाराच्या सुमारास पूना मर्चंट चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया आणि जयराज अँड कंपनीचे राजेश शहा यांच्या हस्ते श्रीगणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली
या मानाच्या पाचव्या गणपतीची प्रतिष्ठापना टिळक पंचांगानुसार 20 ऑगस्टला झाली. त्यामुळे मंगळवारी गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापनेची स्वतंत्रपणे मिरवणूक काढण्यात आली नाही. रोज सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दाते पंचांगानुसार केसरीवाडा गणपतीचे अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार आहे.
हेही वाचा