Pune News : देशी गाईंच्या दुधापासून इन्स्टंट आईस्क्रीम : कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील

Pune News : देशी गाईंच्या दुधापासून इन्स्टंट आईस्क्रीम : कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर देशी गाईंच्या आटविलेल्या दुधापासून इन्स्टंट मशीनद्वारे पेरू, चिकू, केळी, अंजीर, डाळिंब तसेच कॅडबरी, ओरिओ बिस्कीट, चोको चिप्स अशा विविध पदार्थांपासून ग्राहकांसमोरच तयार केलेले ताजे तजेलदार रोल आईस्क्रीम खाण्याची संधी पुणेकरांना ऐन गणेशोत्सवापासून उपलब्ध झाली आहे. 'फुले अमृत' या नांवाने आईस्क्रिमच्या विक्रीस सुरुवात झाली आहे.

पुणे कृषी महाविद्यालयामध्ये देशी गाईंचे दूध व ताजी फळे यापासून आपल्या डोळ्यादेखत तयार होणार्‍या इन्स्टंट आईस्क्रीमची निर्मिती व विक्रीच्या स्टॉलचे उद्घाटन सोमवारी (दि.18) महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे हस्ते झाले. त्यावेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. सुनील मासळकर, देशी गो संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. धीरज कंखरे,अन्य विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज-काल बहुतांश आईस्क्रीम व्हेजिटेबल ऑइल वापरून बनवण्यात येणार्‍या फ्रोजन डेझर्ट प्रकारातली असतात. त्यामुळे आपल्या स्वतःच्या डोळ्यांदेखत ताजे स्वच्छ घटक पदार्थ वापरून तयार करून मिळणारे रोल आईस्क्रीम खायला मिळणे ही खरं पुणेकर ग्राहकांसाठी एक सुंदर पर्वणी ठरणार असल्याचेही कुलगुरू पाटील यांनी नमूद केले. सध्या दुग्धशास्त्र विषयातील अनुभवाधारित शिक्षण घेणारे चतुर्थ वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थिनी पुणे कृषी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील विक्री केंद्रावर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तयार होणार्‍या आईस्क्रीमची विक्री करीत आहेत.

"कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन प्रकल्पात सध्या 50 दुधाळ गायी आहेत. त्यांच्या दुधापासून तयार होणारे आईस्क्रिम हे लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत निश्चितच आरोग्यासाठी अधिक लाभदायी आहे. सध्या तयार होणार्‍या आईस्क्रिमची सरासरी किंमत 50 रुपये असून 30 टक्के सूट ग्राहकांना दिली जात आहे. म्हणजे 35 रुपयांना आईस्क्रिम विक्री सुरु आहे. तसेच महाविद्यालयात तूप, पनीर, खवा, लस्सी, बासुंदी आदी दुग्धजन्य पदार्थांचीही विक्री सुरु आहे.

– डॉ. सोमनाथ माने , देशी गो संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प प्रमुख, कृषी महाविद्यालय.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news