Ganeshotsav 2023 : पोलिस यंत्रणाही सज्ज; शहरामध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त     | पुढारी

Ganeshotsav 2023 : पोलिस यंत्रणाही सज्ज; शहरामध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त    

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहर परिसरातील गणेश मंडळांकडून बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरवण्यात आला आहे.  पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पोलिस रेकॉर्डनुसार दरवर्षी साधारण दीड ते दोन हजार सार्वजनिक गणेश मंडळे उत्सव साजरा करतात.
येथील मंडळांनी काढलेल्या विसर्जन मिरवणुकादेखील भव्य स्वरूपात असतात. दरम्यान, गणेशाची आरास, हालते देखावे पाहण्यासाठी अबालवृद्ध घराबाहेर पडतात. त्यामुळे रस्त्यांवरदेखील दहा दिवस मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत काही भुरटे चोर आपली संधी साधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यंदा गणेशोत्सवादरम्यान पोलिसांची साध्या वेशातील पथके गस्त घालणार आहेत. एकंदरीत गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनीदेखील जय्यत तयारी केली आहे.

या दिवशी राहणार चोख बंदोबस्त

19 सप्टेंबर – गणेश चतुर्थी, श्रीगणेशाची प्रतिष्ठापना
20 सप्टेंबर  – दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन
21 सप्टेंबर  – गौरी आगमन
22 सप्टेंबर   – गौरीपूजन
23 सप्टेंबर  – पाच दिवसांच्या गणेशमूर्ती आणि गौरी विसर्जन
25 सप्टेंबर  – सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन
27 सप्टेंबर  –  नऊ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन
28 सप्टेंबर  – अनंत चतुर्दशी, दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन

संमिश्र लोकवस्तीत विशेष लक्ष

उत्सवादरम्यान संमिश्र लोकवस्ती असलेल्या भागात पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यासाठी साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात समाजकंटकांवर करडी नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

घातपातविरोधी पथकाचा ‘वॉच’

उत्सवाच्या ठिकाणी घातपातविरोधी पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, मिरवणूक मार्गांवर पोलिस मदत केंद्र, बिनतारी संदेश यंत्रणा व सुरक्षा यंत्रणा सतर्क राहणार आहे. संशयित हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर केला जाणार आहे.

बंदोबस्तासाठी लवाजमा

अपर पोलिस आयुक्त – 01
पोलिस उपायुक्त – 05
सहायक पोलिस आयुक्त – 08
पोलिस निरीक्षक – 54
सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक – 165
अंमलदार  2,240
होमगार्ड  600
एसआरपीएफ 02 कंपनी
बीडीडीएस – 02 पथक
गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनी सर्वोतोपरी तयारी केली आहे. उत्सव साजरा करीत असताना नागरिकांनीदेखील पोलिसांना सहकार्य करावे. महिलांनी गर्दीच्या ठिकाणी दागिन्यांचे प्रदर्शन टाळावे. आजूबाजूला काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ नजीकच्या पोलिसांना माहिती द्यावी.
– विनय कुमार चौबे, 
पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.
हेही वाचा

Back to top button