Gandhi Jayanti 2023 : भिलारे गुरुजींनी परतवला होता म. गांधींवरील हल्ला

Gandhi Jayanti 2023 : भिलारे गुरुजींनी परतवला होता म. गांधींवरील हल्ला
Published on
Updated on

भिलार : स्वातंत्र्यपूर्व काळात पाचगणी येथे प्रार्थनेवेळी म. गांधी यांच्यावर हल्ला करणाऱ्या मारेकल्याच्या हातातील सुरा थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. मि. दा. भिलारे गुरुजी यांनी निर्भयपणे हिसकावून घेत एका महात्म्यावरील हल्ला परतवला होता. हे महान कार्य इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे. या स्मृती आज गांधी जयंतीनिमित्ताने समोर आल्या आहेत. (Gandhi Jayanti 2023)

३० जानेवारी १९४८ रोजी म. गांधीजींची हत्या झाली. पण, त्याआधी १९३४ पासून त्यांच्या हत्येचे अनेक प्रयत्न झाले होते. त्यात पाचगणीतील घटनेचीही नोंद आहे. म. गांधी आणि पाचगणी हे नातं अगदी घनिष्ठ आहे. स्वातंत्र्य लढ्यावेळी महत्त्वाच्या कालावधीत १९३५ ते १९४४ या काळात पाचगणीतील दिलखुश बंगला, वीरजी बंगला, बाधा प्रार्थना सभागृह, बहाई भवन, कस्तुरबा गांधी रुग्णालय येथे म. गांधी यांचे वास्तव्य असायचे. या वास्तू आजही त्यांच्या आठवणी जाग्या करतात. त्यावेळी पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, चक्रवर्ती राजगोपालचारी, सरहद्द गांधी, विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, साने गुरुजी अशा अनेक धुरंधर नेत्यांशी त्यांच्या बैठका चालायच्या, त्या वास्तूंमध्ये गांधीजींच्या वापराच्या अनेक वस्तू आजही आहेत.

संबंधित बातम्या : 

बाथाचे प्रार्थना सभागृह, वीरजीभाई यांना गांधीजींनी लिहिलेली पत्रे, १९४० साली गांधीजींनी लावलेले गुलमोहराचे झाड या गोष्टी त्यांच्या आठवणी जागवतात. वाधा हायस्कूल सभागृहात गांधीजी प्रार्थना करत असत. याच ठिकाणी १९४४ मध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी मारेकऱ्याच्या हातातील सुरा हिसकावून भि. दा. भिलारे गुरुजींनी गांधीजीचे प्राण वाचवले होते. हा प्रसंग भिलारे गुरुजी यांच्या तोंडून अनेकदा ऐकायला मिळाला होता. (Gandhi Jayanti 2023)

एक दिवस पुण्याहून अठरा-वीस तरुणांचे टोळके पाचगणीला आले. आल्या आल्या त्यांनी गावात म. गांधी = यांच्याविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. यात नथुराम गोडसेदेखील होता. हा गोंधळ पाहून गांधीजीनी त्यांना चर्चेला बोलवा, असे सांगितले. पण, नथुराम आला नाही. सायंकाळी प्रार्थना सभा सुरू झाली. तरुणांच्या घोषणांमुळे खबरदारी म्हणून सेवादलाच्या तरुणांनी गांधीजींच्या संरक्षणासाठी गुप्त व्यवस्था केली होती. सभा सुरू झाली, इतक्यात कोणाला तरी दिसले नथुराम गोडसे हातात सुरा घेऊन म. गांधी यांच्यावर चालून येत आहे. भिलारे गुरुजींनी नथुरामला बरोबर हेरले होते. त्यांनी धावणाऱ्या नथुरामला एका झटक्यात पकडले व त्याच्या हातातील सुरा काढून घेतला. म. गांधीजींचे नातू तुषार गांधीनी ही घटना आपल्या पुस्तकात लिहून ठेवली आहे. त्या प्रसंगाची साक्ष देणाऱ्या गोष्टीही पाचगणीत आहेत. परंतु, याचे योग्यरितीने जतन होत नसल्याने काळानुसार त्यांची वाताहत होऊ लागली आहे.

स्मारकाबाबत उदासिनता

पाचगणी येथे कार्यरत असलेल्या म. गांधी स्मारक समितीने गांधीजीचे चिरंतन स्मारक उभारण्यासाठी पुढाकारही घेतला आहे. परंतु, त्याला म्हणावे असे यश येत नाही. स्मारकाबाबत समिती आग्रही आहे. पण, पाचगणीकरांची उदासीनता यामुळे हे स्मारक अद्याप कागदावरच आहे. पालिका प्रशासनाने कस्तुरबा गांधी रुग्णालयाजवळील रस्त्याचे गांधी मार्ग नामकरण केले. ही एकमेव जमेची बाजू ठरली आहे. (Gandhi Jayanti 2023)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news