

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित आज (सोमवारी) जेजुरी गडावरून पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. यावेळी सुमारे चार लाखाहून अधिक भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी सोहळा जेजुरी गडावरून निघताच हजारो भाविकांनी भंडाराची उधळण करून येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.
आज (सोमवारी) सकाळी ११ वाजता जेजुरी गडावरून पालखी सोहळ्याचे मानकरी पेशवे यांनी आदेश देताच श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा सुरु झाला. यावेळी जेजुरी गडावर पालखी सोहळ्याने प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या. यावेळी हजारो भाविकानी भंडाराची उधळण करून येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.
जेजुरी गडावरून बनुबाई मंदिर मार्गे ऐतिहासिक छत्री मंदिर, जानुबाई मंदिर मार्गे सोहळा कऱ्हा स्नानासाठी कऱ्हा नदीकडे रवाना झाला.