Amboli Recipe : आंबोळी जाळीदार बनविण्यासाठी 'या' आहेत सोप्या टिप्स...! - पुढारी

Amboli Recipe : आंबोळी जाळीदार बनविण्यासाठी 'या' आहेत सोप्या टिप्स...!

आंबोळी हा कमी जिन्नसमध्ये आणि कमी वेळेत बनणारा पदार्थ आहे. कोकणात आंबोळी ला घावण असे म्हणतात. पचायला हलका आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे. पण आंबोळी जितकी जाळीदार तितकी ती चविष्ट लागते. तसेच ती मऊ आणि लुसलुशीतही असायला हवी. त्यासाठी या सोप्या टिप्स…

सकाळी नाष्ट्याला चहासोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत आंबोळीचा आस्वाद घेता येते. कोकणात घावण सोबत काळ्या वाटाण्याची ऊसळ केली जाते. कोकणात फिरायला गेल्यावर हा पदार्थ जरुर खा.

बिडाच्या तव्यात चांगली आंबोळी तयार होते. पसरट फ्राय पॅनमध्ये देखील आंबोळी बनवता येते.
आंबोळीसाठी जाडसर तांदूळ असायला हवा. अगदी स्वस्त धान्य दुकानात मिळणाऱ्या तांदळाच्यादेखील चांगल्या आंबोळ्या येतात.

वाटण असे तयार करा…(Amboli Recipe)

तांदूळ स्वच्छ धुवून ८ तास भिजत ठेवावेत. तांदूळ चांगले भिजले की ते सरसरीत वाटता येतात. तांदूळ मिक्सरमध्ये वाटल्यानंतर ते पुन्हा आठ तास भिजत ठेवल्यास हरकत नाही. यामुळे पीठ भिजून वर येते. यामुळे आंबोळी लुसलुशीत होते. पण मिक्सरमध्ये वाटल्यानंतर लगेचदेखील आंबोळ्या करता येतात.

आंबोळी उलतता यावी, या अंदाजाने त्यात पाणी घालावे. चवीनुसार त्यात मीठ घाला.

केवळ तांदळाच्या आंबोळ्या करता येतात असेही नाही. ज्वारी, नाचणी पिठाच्याही आंबोळ्या करता येतात. तांदळात उडीद डाळ, मेथ्या असे जिन्नस घालूनही आंबोळ्या करता येतात.

तांदूळ मिक्सरमध्ये वाटताना त्यात ओल्या खोबऱ्याचा किस घातल्यास आंबोळ्या पांढऱ्याशुभ्र आणि चविष्ट होतात. पिठामध्ये नारळाचे दूधदेखील घालू शकता.

आंबोळीला कांद्याचा फ्लेवर…

आंबोळी करण्यापूर्वी तव्यात कापलेला कांदा तेल लावून फिरवून घ्या. कांद्याऐवजी केळीच्या पानाचा कापलेला देठही त्यासाठी वापरता येतो. यामुळे आंबोळी तव्याला चिकटून रहात नाही. ती चांगल्या प्रकारे उलतता येते. तसेच कांद्याचा फ्लेवरही आंबोळीला येतो.

तव्यात आंबोळी सोडल्यानंतर लगेच झाकण ठेवायला हवे. यामुळे आंबोळीची वरची बाजू वाफेवर चांगली शिजते.

चांगली भाजली असल्याची खात्री करुन झाकण काढा. चुलीवर तर चांगल्या आंबोळ्या बनवता येतात.

आंबोळीत काकडी, पालक भाजीचा वापर…

लहान मुले सहसा हिरव्या भाज्या खायला तयार होत नाहीत. त्यासाठी आंबोळीच्या पिठात काकडी किसून टाकता येते. तसेच त्यात पालक भाजी बारीक कापूनही मिसळता येते.

हे ही वाचा : 

पहा व्हिडिओ : पावसाळ्यातील औषधी आणि गुणकारी रानभाज्या । भारंगीची भाजी | भारंगी रेसिपी | भाग २

Back to top button