WhatsApp New Rules: १ ऑक्टोबरपासून WhatsApp मेसेजसाठी कंपन्यांना मोजावे लागणार पैसे; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

WhatsApp Business New Rules: १ ऑक्टोबर २०२६ पासून WhatsApp Business Platform वर कंपन्यांकडून पाठवल्या जाणाऱ्या मेसेजवर पैसे द्यावे लागणार आहेत.
WhatsApp Business New Rules
WhatsApp Business New RulesPudhari
Published on: 
Updated on: 

WhatsApp Business New Rules: व्हॉट्सॲपवरून कंपन्यांकडून ग्राहकांना पाठवले जाणारे मेसेज आता अधिक महाग होण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून WhatsApp Business Platform च्या शुल्क रचनेत मोठा बदल होणार आहे. या बदलाचा थेट परिणाम कंपन्यांवर होणार असून, सामान्य ग्राहकांना व्हॉट्सॲप मेसेज पाठवण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

आतापर्यंत एखाद्या ग्राहकाने कंपनीला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवल्यानंतर पुढील २४ तासांच्या ग्राहक सेवा कालावधीत कंपनीला काही प्रकारचे मेसेज मोफत पाठवता येत होते. मात्र, आता या २४ तासांच्या कालावधीत पाठवले जाणारे मेसेज शुल्काच्या कक्षेत येणार आहेत.

याचा अर्थ असा की, ऑर्डरची खात्री करणे, ऑर्डरची माहिती, डिलिव्हरी अपडेट किंवा ग्राहकाच्या प्रश्नाला दिलेले उत्तर यासाठी कंपन्यांना आता शुल्क लागू शकते. हे उत्तर कंपनीचा कर्मचारी देत असो किंवा एआय प्रणालीद्वारे दिले जात असो, मेसेजच्या प्रकारानुसार शुल्क आकारले जाईल.

पहिल्या १,००० मेसेजवर सवलत

कंपन्यांसाठी मात्र एक दिलासा देणारी बाब आहे. प्रत्येक बिझनेस नंबरसाठी महिन्याला सुरुवातीचे १,००० मेसेज मोफत असतील. त्यानंतरच्या मेसेजसाठी शुल्क आकारले जाईल.

यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांशी व्हॉट्सॲपवरून संवाद साधणाऱ्या कंपन्यांच्या खर्चात वाढ होऊ शकते. विशेषतः ग्राहक सेवा विभागात मोठ्या प्रमाणावर मेसेज पाठवणाऱ्या कंपन्यांवर याचा परिणाम होऊ शकतो.

ग्राहकांना पैसे द्यावे लागणार नाहीत

या बदलामुळे सामान्य व्हॉट्सॲप युजर्सकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाहीत. ग्राहकाने कंपनीला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला, तर त्या मेसेजसाठी ग्राहकाला पैसे मोजावे लागणार नाहीत.

तसेच, सामान्य WhatsApp आणि छोट्या व्यवसायांसाठी उपलब्ध असलेल्या मोफत WhatsApp Business App वर हा बदल लागू होणार नाही. हा बदल मुख्यतः WhatsApp Business Platform वापरणाऱ्या कंपन्यांसाठी आहे.

२४ तासांची ग्राहक विंडो म्हणजे काय?

एखाद्या ग्राहकाने कंपनीला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवल्यानंतर कंपनीला त्याला उत्तर देण्यासाठी २४ तासांची विंडो मिळते. या कालावधीत ग्राहकाच्या प्रश्नाला उत्तर देणे, ऑर्डरची माहिती देणे किंवा इतर सेवा-संबंधित माहिती देणे शक्य असते. आता या कालावधीत पाठवले जाणारे मेसजही शुल्काच्या नियमात येतील.

मात्र, याचा अर्थ असा नाही की कंपनीला ग्राहकाच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे मेसेज पाठवता येतील. व्हॉट्सॲपच्या ग्राहक सेवा नियमांनुसारच मेसेज पाठवावे लागतील.

मार्केटिंग मेसेज आधीपासूनच सशुल्क

कंपन्यांकडून ग्राहकांना पाठवले जाणारे मार्केटिंग मेसेज याआधीपासूनच शुल्काच्या कक्षेत आहेत. यामध्ये जाहिराती, ऑफर्स आणि प्रमोशनल मेसेजचा समावेश होतो.

याशिवाय युटिलिटी आणि ऑथेंटिकेशनसारख्या ठराविक मेसेजसाठीही शुल्क आकारले जाते. आता सर्व्हिस मेसेजही या सशुल्क व्यवस्थेत समाविष्ट केले जात आहेत.

WhatsApp Business New Rules
Who Is CJ Desai: कोण आहेत भारतीय वंशाचे सीजे देसाई? मार्क झुकरबर्गने सोपवली मोठी जबाबदारी; Metaमध्ये AIचं नेतृत्व करणार

एका उदाहरणातून समजून घ्या

समजा, एखाद्या ग्राहकाने कंपनीकडे ऑर्डरशी संबंधित चौकशी केली. त्यानंतर कंपनीने व्हॉट्सॲपवर त्याला पाच मेसेज पाठवले.

यामध्ये एक जाहिरातीचा मेसेज आहे. दोन उत्तर एआय प्रणालीने दिली. एका प्रश्नाचे उत्तर कंपनीच्या कर्मचाऱ्याने दिले. तर आणखी एक मेसेज ऑर्डर किंवा सेवेशी संबंधित माहिती देणारा आहे.

पूर्वी कंपनीला अशा संवादातील काही मेसेजसाठी शुल्क द्यावे लागत नव्हते. मात्र, नव्या नियमांनंतर पात्र मेसेजवरही शुल्क लागू होईल. त्यामुळे जाहिरात मेसेजसोबत ग्राहक सेवा देण्यासाठी होणारा व्हॉट्सॲपचा खर्चही कंपन्यांना मोजावा लागणार आहे.

३० सप्टेंबरपर्यंत पेमेंट पद्धत जोडणे आवश्यक

WhatsApp Business Platform वापरणाऱ्या कंपन्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या खात्यात पेमेंट पद्धत जोडणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास १ ऑक्टोबरपासून त्यांच्या मेसेजची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते. त्यामुळे व्हॉट्सॲपवर ग्राहक सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे.

WhatsApp Business New Rules
Gold Price Discount: 10 ग्रॅम सोन्यावर मिळतेय 5 हजार रुपयांपर्यंत सूट; कुठे आणि कशी मिळवायची? सर्व माहिती जाणून घ्या

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

सामान्य ग्राहकाला व्हॉट्सॲपवर कंपनीला मेसेज पाठवण्यासाठी किंवा कंपनीचा मेसेज वाचण्यासाठी थेट पैसे द्यावे लागणार नाहीत. मात्र, कंपन्यांचा ग्राहक सेवा खर्च वाढल्यास भविष्यात काही कंपन्या आपल्या सेवा, ऑफर्स किंवा ग्राहक संवादाच्या पद्धतीत बदल करू शकतात.

महत्त्वाचे म्हणजे १ ऑक्टोबरपासून प्रत्येक WhatsApp मेसेजसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. हा बदल WhatsApp Business Platform वर कंपन्यांकडून पाठवलेल्या विशिष्ट प्रकारच्या मेसेजसाठी आहे. सामान्य व्हॉट्सॲप युजर्सच्या वैयक्तिक चॅटवर या नियमाचा थेट परिणाम होणार नाही.

त्यामुळे ‘व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवणे आता सशुल्क झाले’ असे सरसकट म्हणणे योग्य ठरणार नाही. नवीन शुल्क व्यवस्था मुख्यतः कंपन्यांच्या WhatsApp Business Platform वापराशी संबंधित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news