

China humanoid Robot Bumi: रोबोटिक्सच्या शर्यतीत चीनने पुन्हा एकदा जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. आतापर्यंत महागड्या प्रयोगांपुरते मर्यादित असलेले मानवी (ह्युमनॉइड) रोबोट आता थेट सामान्य लोकांच्या घरात आणण्याची तयारी चीनने केली आहे. विशेष म्हणजे, या रोबोटची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसेल. एक आयफोन इतकीच किंमत असणारा हा रोबोट आता घरी आणता येणार आहे.
चीनमधील Songyan Power या कंपनीने विकसित केलेला ‘बुमी’ (Bumi) नावाचा मानवी रोबोट लवकरच सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. हा रोबोट चालू शकतो, धावू शकतो, नृत्य करू शकतो आणि माणसाच्या आवाजातील आदेशही ओळखू शकतो. विशेषतः मुलांचे शिक्षण, प्राथमिक रोबोटिक्स शिकवणे आणि घरगुती वापर या उद्देशाने तो तयार करण्यात आला आहे. जानेवारी 2026 पासून ‘बुमी’ रोबोटची विक्री सुरू होणार असून, तो जगातील सर्वात स्वस्त मानवी रोबोट्सपैकी एक मानला जात आहे.
Songyan Power कंपनीने Huichen Technology सोबत केलेल्या करारानुसार, 1,000 ‘बुमी’ रोबोट्सचा पुरवठा केला जाणार आहे. या रोबोटची किंमत 9,998 युआन, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 1.30 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ उद्योग, कारखाने किंवा संशोधन संस्थांपुरते मर्यादित असलेले रोबोट आता शाळा, महाविद्यालये आणि घरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकीकडे चीन कमी किमतीत मोठ्या प्रमाणावर रोबोट तयार करून बाजारपेठ काबीज करण्यावर भर देत असताना, अमेरिकेची भूमिका वेगळीच आहे. अमेरिकन कंपन्या अधिक प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि व्यावसायिक वापरासाठीचे महागडे रोबोट विकसित करत आहेत.
उदाहरणार्थ, टेस्लाचा ‘ऑप्टिमस’ रोबोट साधारणपणे 16 ते 25 लाख रुपयांपर्यंत किमतीचा असू शकतो, असा अंदाज आहे. तर Agility Robotics चा ‘Digit’ रोबोट तब्बल 2 कोटी रुपयांपर्यंत विकला जातो आणि तो मुख्यतः गोदामे व औद्योगिक वापरासाठी तयार करण्यात आला आहे.
थोडक्यात सांगायचं तर, चीन स्वस्त हार्डवेअर, मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि व्यापक बाजारपेठेवर काम करत आहे. तर अमेरिका उच्च दर्जाचे सॉफ्टवेअर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्यावसायिक वापरावर लक्ष केंद्रित करत आहे.
तज्ज्ञांच्या मते, चीनचे स्वस्त रोबोट शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात जगभर वेगाने स्वीकारले जाऊ शकतात. मात्र, काही अभ्यासकांचा इशारा आहे की अतिशय कमी किमतींच्या स्पर्धेमुळे भविष्यात तंत्रज्ञानातील नवकल्पनांवर मर्यादा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही, एक गोष्ट स्पष्ट आहे मानवी रोबोट आता प्रयोगशाळेत नाही, तर थेट घरात येण्याच्या तयारीत आहेत, आणि या बदलाचं नेतृत्व सध्या चीन करताना दिसत आहे.