राजबिंडा नट रमेश देव

ramesh dev
ramesh dev
Published on
Updated on

दोन दिवसांपूर्वीच रमेश देव यांनी आपला ९३ वा वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव यांचं आडनाव खरे तर ठाकूर. देव यांचे बालपण कोल्हापुरात गेले. राजर्षी शाहू महाराजांमुळे त्यांचं आडनाव देव झालं. रमेश देव यांचे वडील त्या काळचे प्रसिद्ध फौजदारी वकील होते. शाहू महाराजांनी दिलेल्या स्कॉलरशिपवरच ते वकील झाले होते. एकदा एका कामात त्यांनी महाराजांना मदत केली तेव्हा महाराज म्हणाले, ""ठाकूर, तुम्ही देवासारखे भेटलात. तुम्ही आता ठाकूर नाही – देवच!'' आणि तेव्हापासून या परिवाराचे देव हेच आडनाव झालं.

पु. ल. देशपांडे यांनी एका चित्रपटातील भूमिका नाकारली म्हणून रमेश देव यांना चित्रपटात संधी मिळाली. आपली आई, गुरू राजा परांजपे आणि पत्नी सीमा यांच्यामुळेच 'रमेश देव' ही वेगळी ओळख निर्माण झाली. रमेश देव हे दिसायला राजबिंडा होते. त्या काळात त्यांच्या देखणेपणावर अनेक मुली फिदा असायच्या.

१९५१ साली पाटलाची पोर या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजा परांजपे दिग्दर्शित 'आंधळा मारतो एक डोळा' या १९५६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे त्यांना ओळख मिळाली होती. राजश्री प्रॉडक्शनचा आरती हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.१९५७ च्या सुमारास रमेश देव व सीमा (नलिनी सराफ) या दोघांचीही रूपेरी कारकीर्द सुरू झाली.

'आलिया भोगाशी' चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची सीमा यांच्याशी पहिली भेट झाली आणि त्यानंतर सहा वर्षांनी एक जुलै १९५३ ला त्यांचा विवाह झाला.रमेश देव आणि सीमा देव यांची ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री कायमच चांगली राहिली होती. रमेश देवांचे मराठी चित्रपटसृष्टीत फार मोठे योगदान आहे. एक काळ तर असा होता, की रमेश देव आणि त्यांची पत्नी सीमा देव चित्रपटात असतील तर तो हीट होणार अशी खात्री असायची.

इंडस्ट्रीत वेळ पाळणारा नट म्हणूनच रमेश देव यांचं नाव घेतलं जात असे. रमेश देव यांनी अनेक चित्रपटात नायकाच्या भूमिका केल्या, पण ते उठून दिसले ते खलनायकी भूमिकेत. 'भिंगरी' चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच होता. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले. तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या.

रमेश देव यांनी निर्माता, दिग्दर्शक अशा विविध प्रांतातही ठसा उमटवला. त्याचा 'सर्जा' हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट चांगलाच गाजला. अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केल्या. ऋषीकेश मुखर्जींच्या 'आनंद' चित्रपटात राजेश खन्नाचा डॉक्टर मित्र खरोखरीच मनापासून रंगवला. त्यांच्या या भूमिकेला दादही मिळाली. अभिनेता म्हणून प्रस्थापित होवून रमेश देव यांनी एकाहून एक सरस चित्रपट दिले व आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळविले.

संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी तर रमेश देव यांना 'कोल्हापुरी' म्हणूनच ओळखत असे.रमेश देव यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत २८५ हून अधिक हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३० मराठी नाटकांमध्ये २०० हून अधिक शो केले. त्यांनी फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि २५० हून अधिक जाहिरात चित्रपटांची निर्मिती देखील केली. त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिका देखील दिग्दर्शित केल्या. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. रमेश देव यांचे चिरंजीव अजिंक्य देव अभिनेता व दिग्दर्शक आहेत तर दुसरे चिरंजीव अभिनव हा दिग्दर्शक आहे. रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

रमेश देव यांनी अभिनय केलेले चित्रपट

देवघर, भिंगरी, भैरवी, आधी कळस मग पाया, बाप माझा ब्रम्हचारी, एक धागा सुखाचा, क्षण आला भाग्याचा, प्रेम आंधळं असतं, सोनियाची पाऊले, आंधळा मागतो एक डोळा, येरे माझ्या मागल्या, आलिया भोगासी, आई मला क्षमा कर, राम राम पाव्हण, अवघाची संसार, पसंत आहे मुलगी, यंदा कर्तव्य आहे, सात जन्माचे सोबती, जगाच्या पाठीवर, आलय दर्याला तुफान, दोस्त असावा असा.

हिंदी चित्रपट-आनंद, आरती, मेरे अपने, आपकी कसम.

– संजीव वेलणकर पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news