CM Basawraj Bommai : विस्तार अधांतरी; बोम्मईंची दिल्‍लीवारी सोमवारी

CM Basawraj Bommai : विस्तार अधांतरी; बोम्मईंची दिल्‍लीवारी सोमवारी

बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कसरत सुरू केली आहे. मंत्रिपदासाठी असंतुष्ट आमदारांकडून दबाव येत असल्याने त्यांनी गुरुवारी दिल्ली दौरा ठरवला होता; पण ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला असून येत्या सोमवारी ते दिल्लीला जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरचनेचा निर्णय घेतला जाणार आहे. (CM Basawraj Bommai)

मुख्यमंत्रिपदी येऊन बोम्मई यांना सहा महिने लोटले आहेत. मंत्रिमंडळात आणखी चार पदे रिक्‍त आहेत. या पदांसाठी सुमारे दोन डझन आमदार इच्छुक आहेत. त्यांच्याकडून वारंवार जाहीरपणे मंत्रिपदाची मागणी केली जात आहे. त्याविषयी मुख्यमंत्री बोम्मई यांनी पक्षश्रेष्ठींना कळवले आहे.तातडीने मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीचे बोलावणे आले होते. मात्र, ऐनवेळी श्रेष्ठींकडून मिळालेल्या सूचनेने त्यांनी गुरुवारचा दौरा रद्द केला.

CM Basawraj Bommai : 14 फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे अधिवेशन

14 फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. त्याआधीच मंत्रिमंडळाविषयी निर्णय घेण्याची मागणी इच्छुकांकडून केली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी दिल्ली दौरा आखला होता. तेथे ते दोन दिवस राहणार होते. मंत्रिमंडळ विस्तार आणि पुनर्रचनेवर अंतिम निर्णय घेऊन ते परतणार होते. दौरा रद्द झाल्याने आता हा विषय पुन्हा काही दिवस लांबवणीवर पडला आहे.

मंत्रिमंडळामध्ये सध्या चार पदे रिक्‍त आहेत. ती पदे भरण्यात येणार आहेत. शिवाय मंत्रिमंडळातील काही सदस्य सक्रिय काम करताना दिसत नाहीत. अशा मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे. त्यांच्या जागी युवा आणि नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचा विचार श्रेष्ठींनी केला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात आगामी काळात सुमारे 12 नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. इच्छुक आमदारांनी मंत्रिमंडळाचा फक्‍त विस्तार न करता फेररचनाच करण्याची मागणी केली आहे.

जाहीर वक्‍तव्ये नको

मंत्रिमंडळाविषयी कुणीही जाहीर विधाने करू नयेत, अशी तंबी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. प्रत्येकाने पक्षाची शिस्त पाळावी. नियमांचे पालन करून विधाने करावीत. अंतर्गत समस्या पक्षपातळीवर सोडवता येतात. त्यासाठी जाहीर विधाने केल्यास त्याचा पक्ष संघटनेवर विपरित परिणाम होतो. प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, असे आवाहनही बोम्मई यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news