

Veg Omelette: ऑम्लेट म्हटलं की, सर्वात आधी डोळ्यांसमोर अंडे येते. कारण साधारणपणे अंड्यापासूनच ऑम्लेट तयार केले जाते. पण अंड्याशिवायही ऑम्लेट बनवता येते. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलं. आज आम्ही तुम्हाला प्रोटीन आणि पोषणाने भरपूर अशा ऑम्लेटबद्दल सांगत आहोत, ज्याचा शाकाहारी लोक आनंदाने आस्वाद घेऊ शकतात. रेसिपी जाणून घ्या.
साहित्य: बेसन किंवा सोया बॅटर (पीठ), पनीर, कांदा, ढोबळी मिरची (शिमला मिर्च), टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, हळद, ओवा, तेल.
१. हे ऑम्लेट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेसन घ्या.
२. जर तुम्हाला बेसनाऐवजी सोया वापरून ऑम्लेट बनवायचे असेल, तर भिजवलेले सोया चंक्स मिक्सरला लावून त्याचे पीठ तयार करा.
३. आता यामध्ये मीठ, ओवा, पनीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद आणि लाल तिखट घालून नीट मिक्स करा.
४. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इतर भाज्याही यामध्ये घालू शकता.
५. आता एक पॅन गरम करा, त्यावर हे पीठ टाकून व्यवस्थित पसरवा. कडेने थोडे तेल किंवा तूप सोडा.
६. जेव्हा एका बाजूने ऑम्लेट व्यवस्थित शिजेल, तेव्हा ते उलटून दुसऱ्या बाजूनेही नीट भाजून घ्या.
७. तुमचे 'वेज ऑम्लेट' तयार आहे! हे तुम्ही चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता.
बेसन हे हरभऱ्याच्या डाळीपासून तयार केले जाते. हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत मानले जाते. यात केवळ प्रथिनेच नाहीत, तर डायटरी फायबर, जीवनसत्त्वे, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक आणि तांबे यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला फायदेशीर ठरतात. तुम्ही याचा आहारात विविध प्रकारे समावेश करू शकता. पचनासाठी देखील बेसन अतिशय उत्तम मानले जाते.