पनीर घोटाळा... घरी बनवा ही हाय-प्रोटीन डिश, बोट चाटून पुसून खाल
paneer ghotala recipe high protein surats famous rich street food
पुढारी ऑनलाईन :
पनीर घोटाळा हे सुरतचे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. पनीर, टोमॅटो, कांदा आणि खास मसाल्यांपासून बनवले जाणारे हे पदार्थ बटरमध्ये परतलेल्या पावसोबत गरमागरम दिले जाते, त्यामुळे त्याची चव आणखीनच लाजवाब लागते. पनीर घोटाळा कसा बनवायचा, ते आपण या स्टोरीत पाहणार आहोत.
पनीर हे प्रोटीनने समृद्ध असून खायला देखील अतिशय चविष्ट असते. पनीरच्या पोषणमूल्यांबद्दल सांगायचे झाल्यास, १०० ग्रॅम पनीर (फुल क्रीम दुधापासून बनवलेले) यात साधारण २६०–३०० कॅलरी, १८–२० ग्रॅम प्रोटीन, २०–२५ ग्रॅम फॅट आणि १.२–२ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. या गुणधर्मांमुळे पनीरपासून अनेक शाही पदार्थ तयार केले जातात. त्यापैकीच एक खास डिश म्हणजे ‘पनीर घोटाळा’.
पनीर घोटाळा हा गुजरातमधील सुरत येथे प्रामुख्याने बनवला जाणारा, अतिशय फेमस आणि स्वादिष्ट स्ट्रीट फूड आहे. किसलेले पनीर, पनीरचे तुकडे, कांदा, टोमॅटो आणि खास मसाल्यांपासून हा पदार्थ तयार केला जातो. विशेष म्हणजे, हा पदार्थ तयार करण्यासाठी फक्त १०–१५ मिनिटे लागतात.
पनीर घोटाळा बनवण्यासाठी लागणारी सामग्री
पनीर
टोमॅटो
कांदा
बटर किंवा तेल (फोडणीसाठी)
जिरे
आले, लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट
सुके मसाले: हळद, कश्मिरी लाल तिखट, पावभाजी मसाला
चीज (किसण्यासाठी)
हिरवी कोथिंबीर (बारीक चिरलेली)
मीठ (चवीनुसार)
पाणी (गरजेनुसार)
पाव (बटरसोबत सर्व्ह करण्यासाठी)
पनीर घोटाळा बनवण्याची पद्धत
पनीर घोटाळा बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीर धुवून नीट किसून घ्या. त्यानंतर गॅसवर एक फ्राय पॅन ठेवा आणि त्यात बटर किंवा तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाका. मग बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
कांदा चांगला परतल्यावर त्यात हळद, कश्मिरी लाल तिखट, पावभाजी मसाला आणि आले-लसूण-हिरवी मिरची यांची पेस्ट घालून नीट मिसळा. यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो आणि थोडे पाणी घालून मिश्रण मॅश करत शिजवा, जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही.
मसाला तयार झाल्यावर त्यात किसलेले पनीर, थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. हे मिश्रण पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत शिजवा. शेवटी, वरून थोडे चीज किसून घाला आणि भरपूर ताजी कोथिंबीर पेरा.
तयार आहे तुमचा स्वादिष्ट पनीर घोटाळा!
बटरमध्ये भाजलेल्या पावसोबत गरमागरम सर्व्ह करा आणि या लज्जतदार पदार्थाचा मनसोक्त आनंद घ्या.

