सब 1 : शेतीला हवी विज्ञानाची जोड - पुढारी

सब 1 : शेतीला हवी विज्ञानाची जोड

सत्यजित दुर्वेकर, पुढारी ऑनलाईन : देशाच्या शेती क्षेत्रापुढे निसर्गचक्रातील बदलामुळे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी शेती क्षेत्रात विज्ञानाची कास धरण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. आपला देश अन्‍नधान्याच्या द‍ृष्टीने स्वयंपूर्ण बनविण्याकरिता विज्ञानाचा हातभार मोलाचा ठरला आहे, याची जाणीव सर्वांनीच ठेवलेली बरी. काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातील लोकसंख्येच्या अन्‍नधान्याची गरज भागवू शकेल एवढे उत्पादन देशात होत नव्हते. (सब 1)

त्यामुळे भारताला अनेक पाश्‍चिमात्त्य देशांकडून अन्‍नधान्ये आयात करावी लागत होती. भारताला अन्‍नधान्यांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण करण्याकरिता हरितक्रांतीचा प्रयोग करण्यात आला. या पुढील काळात हवामान बदलामुळे शेती क्षेत्रापुढे निर्माण झालेल्या संकटांना तोंड देण्याकरिता या क्षेत्रात विज्ञानाची साथ घेतल्याशिवाय तरणोपाय नाही.

गेल्या काही महिन्यांपासून देशात अनेक ठिकाणी गारपीट, अवकाळी आदी संकटांची मालिकाच सुरू आहे. या संकटांवर मात करण्याकरिता बदलत्या वातावरणातही शेतकर्‍याला आपले उत्पादन कसे वाढवता येईल, या द‍ृष्टीने विचार करणे आवश्यक बनले आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाचे चक्र पूर्णतः बदलून गेले आहे. हे आव्हान स्वीकारण्याकरिता वेगवेगळ्या पिकांच्या जनुकांमध्ये बदल करण्याचे विकसित झालेले तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे ठरत आहे. नैसर्गिक संकटांचा मुकाबला करण्याकरिता संशोधित जनुकीय बियाणे वापरणे ही काळाची गरज ठरली आहे.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने तांदळाचे सब-1 हे जनुकीय संशोधित बियाणे तयार केले. तांदळाच्या जनुकात केलेल्या बदलामुळे पुरासारख्या स्थितीतही तांदळाचे पीक किमान दोन आठवडे उभे राहू शकते, असा दावा या विद्यार्थिनीने केला आहे. पामेला रोनाल्ड असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. भारतात अनेक ठिकाणच्या भात उत्पादक शेतकर्‍यांना पूरस्थितीशी सामना करावा लागतो. तांदळाचे पीक अनेक दिवस पुराच्या पाण्यात राहिल्यामुळे खराब होते, असा अनुभव आहे. तसे झाल्यास तांदळाच्या उत्पादनावर विपरित परिणाम होतो.

मात्र ‘सब 1’ या बियाणामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारताच्या पश्‍चिम बंगाल आणि लगतच्या भागात तसेच बांगला देशसारख्या देशात ‘सब 1’ या बियाण्याचा वापर अनेक शेतकरी करताना दिसत आहेत. या बियाणांमुळे शेतकर्‍यांच्या तांदळाच्या एकरी उत्पादनात वाढ झाल्याचेही आढळून आले आहे. गरीब शेतकर्‍यांकरिता तांदळाची ही सुधारित जात वरदान ठरणारी आहे, यात वाद नाही. छोट्या शेतकर्‍यांना अशा सुधारित वाणांची माहिती दिली तर ते त्याचा किती चांगला उपयोग करून घेतात, हे ‘सब 1’ च्या उदाहरणावरून दिसून येते.

कृषी क्षेत्रात या पद्धतीने विज्ञानाचा वापर करण्यास काही मंडळी प्राणपणाने विरोध करतात. त्यांच्या मते, जनुकीय सुधारित बियाणे वापरणे हा मोठा गुन्हाच आहे. ही मंडळी एक गोष्ट लक्षात घेत नाहीत, ती म्हणजे भारतात ज्या परंपरागत बियाणांच्या आधारे शेती केली जात होती, त्या बियाणांमुळे देशाच्या कृषी उत्पादनात वाढ होऊ शकलेली नाही. त्यामुळे पिकांच्या जनुकामध्ये संशोधन करणे अपरिहार्य होऊन बसले आहे. हे संशोधन उत्पादन वाढीकरिता उपयुक्‍त ठरते, असे सप्रमाण सिद्ध झाले आहे.

कृषी क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाचा फायदा भारतीय शेतकर्‍यांनी करून घेतला पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहता आपले दर एकरी उत्पादन कसे वाढवायचे, या एकमेव मुद्द्याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी सुधारित बियाणांबरोबरच शेतकर्‍याला आपल्या पाणी देण्याच्या पद्धतीत आणि खते घालण्याच्या पद्धतीतही बदल केला पाहिजे. भारतीय शेतीची परंपरागत पद्धत आणि विज्ञान यांचा समतोल साधत शेतकर्‍याला या पुढील वाटचाल करावी लागणार आहे.

Back to top button