Sugarcane varieties : उसाचे फायदेशीर वाण : को-86032 | पुढारी

Sugarcane varieties : उसाचे फायदेशीर वाण : को-86032

- डॉ. भरत रासकर

ऊस पंढरी म्हणून पाडेगाव केंद्र हे देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. मागील 88 वर्षांमध्ये या संशोधन केंद्राने आजपर्यंत झालेल्या संशोधनातून अधिक उत्पादन आणि साखर उतारा देणार्‍या उसाच्या 14 साच्या उन्‍नत जाती प्रसारित केल्या. (Sugarcane varieties)

आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकरीमावा, हुमणी, पांढरीमाशी, तांबेरा आणि तपकिरी ठिपके नियंत्रणासाठी भरीव काम केलेले आहे. 2018-19 मधील देशातील सर्वोत्कृष्ट ऊस संशोधन केंद्र म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अखिल भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांनी 16 ऑक्टोबर 2019 रोजी पाडेगाव संशोधन केंद्राचा गौरव केला.

Sugarcane varieties : पूर्वहंगामी, आडसाली आणि खोडवा लागवडीसाठी या वाणाचे संशोधन

अशा या केंद्राने उसाची को-86032 या वाणाची सुरू, पूर्वहंगामी, आडसाली आणि खोडवा लागवडीसाठी संशोधन केलेल्या वाणाची चारही कृषी विद्यापीठाच्या संयुक्‍त संशोधन समितीने दि. 31 मे 1996 रोजी अकोला कृषी विद्यापीठात पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रासाठी शिफारस केली.

उसाच्या को-86032 या एकाच वाणाखाली राज्यात आजतागायत 50 टक्के व देशपातळीवर 46 टक्के क्षेत्र असून हा वाण शेतकरी आणि कारखानदार यांच्या पसंतीस पडला आहे.

हेक्टरी 250 ते 300 टन उत्पादनक्षमता, अधिक साखर उतारा, उत्तम खोडवा अशा चांगल्या गुणधर्मामुळे या वाणाने साखर कारखानदारीत महाराष्ट्रात आणि देशात मोठी आर्थिक क्रांती घडवून आणली आहे.

त्यामुळे हा वाण ‘वंडरकेन’ म्हणून देशभर ओळखला जातो. म्हणून सदरचे वर्ष या संशोधन केंद्राने को-86032 वाणाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.

Sugarcane varieties : वाणाचा प्रवास

को-86032 वाणापूर्वी राज्यामध्ये को-740 आणि को-7219 या वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात होती. 1956 मध्ये प्रसारित केलेल्या को-740 वाणाने 40 वर्षे राज्यात पूर्ण केली. तथापि, काणी रोगामुळे आणि सुरुवातीला कमी उतारा असल्यामुळे हा वाण मागे पडला.

को-7219 हा वाण त्यावेळी ऊस आणि साखरेच्या उत्पादनामुळे पसंतीस पडला. परंतु, उशिरा तोडणीमध्ये याचे ऊस आणि साखर उत्पादन कमी होऊ लागल्याने नवीन वाणाचा शोध सुरू झाला. को-86032 या वाणाचा संकर कोईम्बतूर येथे करण्यात आला आणि त्यानंतर संशोधनाचे काम पाडेगाव येथे पार पडले.

वाणाचा शोध

हा वाण को-62198 आणि कोसी-671 या वाणाच्या संकरातून निर्माण करण्यात आला. को-86032 या वाणाच्या अखिल भारतीय पातळीवरील द्विपकल्पीय विभागात वेगवेगळ्या संशोधन केंद्रांवर 23 चाचणी प्रयोग, पाडेगाव येथील स्थानिक पातळीवर 7 प्रयोग, विभागवार 23 प्रयोग आणि शेतकर्‍यांच्या शेतावर 27 प्रात्यक्षिके घेण्यात आली.

या सर्व चाचण्यांमध्ये ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनात हा वाण तूल्यवान 7219 पेक्षा अनुक्रमे 15.7 आणि 16.7 टक्क्यांनी सरस आढळून आला.

वाणाची वैशिष्ट्ये

प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे मध्यम उशिरा पक्‍व होणारा, अधिक गाळपालायक उसाची संख्या, चांगली उसाची जाडी व वजन आणि अधिक उत्पादन क्षमता, अधिक साखर उतारा, उत्तम खोडवा, रोग व कीड प्रतिकारक्षम, पाण्याचा ताण सहन करणारा, पूरबुडीत क्षेत्रात तग धरणारा आणि अनेक खोडवे देऊ शकणारा हा वाण शेतकर्‍यांच्या व कारखान्याच्या पसंतीस पडला आहे.

हा वाण त्याच्या तांबूस रंगामुळे, कांड्यांवरील भेगांमुळे, हिरव्यागार पानांमुळे, सहज पाचट निघत असल्याने आणि सरळ कांड्यांमुळे ओळखण्यासाठी सोपा आहे.

या वाणाखाली राज्यात 55 टक्क्यांपर्यंत आणि देशात 47.6 टक्के क्षेत्र आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यात एकराला 100 टनांपेक्षा जास्त उत्पादन शेतकरी घेऊ लागले आहेत.

वाणाचे योगदान

या वाणामुळे साखर कारखान्यांचा साखर उतारा 0.40 पासून 1.50 टक्क्याने, तर उसाचे उत्पादन हेक्टरी 17.5 ते 25 टन वाढल्याचे आढळून आले. या ऊस वाणाच्या लागवडीमुळे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना 1995-96 ते 2016-17 या 22 वर्षांत को-86032 मुळे 1.00 लाख कोटी रुपयांचा एकूण फायदा झाला असल्याचे दिसून येते.

उत्पादन क्षमता

शिफारस करते वेळी या वाणाचे सुरू, पूर्वहंगामी, आडसाली आणि खोडवा पिकाचे हेक्टरी उत्पादन अनुक्रमे 106, 138.39, 158.53 आणि 88.00 टन होते.

या वाणाची उत्पादन क्षमता अनेक शेतकर्‍यांनी तपासली असता या वाणाने एकरी 168 टन विक्रमी आडसाली उसाचे उत्पादन वाळवा येथील शेतकर्‍याच्या शेतावर मिळाले. अनेक शेतकर्‍यांनी एकराला 100 टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन घेतले आहे.

उत्तम पीक व्यवस्थापनामध्ये या वाणाचे उत्पादन अधिक मिळाल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रातील पंचगंगा, दूधगंगा, कुंभी-कासारी आणि राजाराम बापू साखर कारखान्यांना गेल्या 5 वर्षांत 12.5 टक्क्यांपेक्षा अधिक उतारा या वाणामुळे मिळाला आहे.

10 साखर कारखान्यांना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत 12 टक्क्यांपेक्षा अधिक उतारा मिळाला आहे. हंगामात साखर कारखान्यांचा साखर उतारा 0.40 पासून 1.50 टक्क्याने, तर उसाचे उत्पादन हेक्टरी 17.5 ते 25 टन वाढल्याचे आढळून आले.

महाराष्ट्रातील ऊसकरी शेतकर्‍यांचे आणि साखर कारखान्यांचे बदलत्या हवामानामुळे भविष्यातील समस्यांचे स्वरूप आव्हानात्मक राहणार आहे. अशा समस्यांना सामोरे जाण्यासाठी तसेच आणखी दर्जेदार वाण संशोधनासाठी पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राचे बळकटीकरण करणे आवश्यक ठरणार आहे. त्यासाठी आपणाला महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून विशेष आर्थिक सहाय्य मिळाल्यास अजून नवीन संशोधनाची कामे हाती घेता येतील व प्रगतीची घोडदौड अशीच पुढे चालू ठेवता येईल.

Back to top button