Raigad Fort : राष्ट्रपतींचे रायगडवर स्वागत मात्र हेलिपॅडला विरोध कायम – आ. भरतशेठ गोगावले | पुढारी

Raigad Fort : राष्ट्रपतींचे रायगडवर स्वागत मात्र हेलिपॅडला विरोध कायम - आ. भरतशेठ गोगावले

रायगड; पुढारी वृत्तसेवा

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे व मिलेनियम प्रॉपर्टीज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पंचवीस वर्षांपासून पाचाड हिरकणी वाडी ते रायगड किल्ल्यावर रोप वे सुरू आहे. (Raigad Fort) या रोपवेच्या नवीन ट्रॉलीचे आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला पद्मश्री मुरलीकांत पेटकर, आमदार भरतशेठ गोगावले, रायगड प्राधिकरणचे विश्वस्त सुधीर थोरात, सरपंच प्रेरणा सावंत, राजू जोग, वैशाली जोग आदी मान्यवर उपस्थित होते

याप्रसंगी बोलताना महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी, येत्या चार दिवसांत रायगड किल्ल्यावर (Raigad Fort) राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद यांचे एक शिवभक्त म्हणून आपण स्वागत करतो. मात्र होळीच्या माळावरील छत्रपतींचा असलेला सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासमोर हेलिकॉप्टर उतरवण्यास आपला विरोध कायम असल्याचे मत स्पष्ट केले.

पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी रोपवे प्रशासनामार्फत पुढील वर्षभरासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत सेवा सुरू केल्याबद्दल आभार मानले. त्याचबरोबर यावर लावण्यात आलेला शासकीय कर रद्द करण्यासाठी आमदार गोगावले यांनी विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

महाराष्ट्रातील शिवभक्तांनी वर्षातून एकदा तरी पंढरपूर प्रमाणेच रायगडचीही वारी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नियोजित दौरा पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून नवीन ट्रॉलीज शिवभक्तांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा

Back to top button