Vegetables Nursery : भाज्यांच्या नर्सरीचे नवे तंत्रज्ञान | पुढारी

Vegetables Nursery : भाज्यांच्या नर्सरीचे नवे तंत्रज्ञान

- जगदीश काळे

Vegetables Nursery :  सध्या अन्‍नधान्यांबरोबरच भाज्यांची महागाई हा चिंतेचा विषय ठरला आहे. भाज्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शेतकर्‍यांना बाजारातील या स्थितीचा फायदा उठवता येऊ शकतो.

बहुतांश भाज्यांची बियाणे महाग आहेत. याचे कारण त्यांची नर्सरीमध्ये खूपच काळजी घ्यावी लागते. भेंडी, तूर यासारख्या भाज्यांच्या रोपांचे नर्सरीमध्ये उत्पादन घेऊन शेतकर्‍यांना चांगला फायदा मिळवता येईल.

नर्सरीचे व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करावे याची माहिती शेतकर्‍यांनी करून घेणे आवश्यक आहे. नर्सरीमध्ये भाज्यांची बियाणी अत्यंत काळजीपूर्वक उत्पादित केली जातात.

Vegetables Nursery : नर्सरीचे करा अशा पद्धतीने व्यवस्थापन

टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, फ्लॉवर, भोपळा या भाज्यांचे बियाणे नर्सरीमध्ये तयार करता येते. त्यासाठी शेतकर्‍यांनी कोणत्या पद्धतीने नर्सरीचे व्यवस्थापन केले पाहिजे याविषयी तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन.

शेतामध्ये थेट बियाणे लावल्यास त्याचा खर्च शेतकर्‍याला झेपणे शक्य नाही. याचे कारण या बियाणांवर, रोपांवर पडणारी कीड, रोग. रोग आणि किडीपासून बियाणांचे संरक्षण करणे अत्यंत अवघड असते. त्याकरिता शेतकर्‍यांना अत्याधुनिक कीटक नाशके (पेस्टीसाईटस्) फवारावी लागतात.

नर्सरीमध्ये कीड प्रतिबंधक आणि रोग प्रतिबंधक फवारण्या बियाणांवर करता येतात. त्यामुळे अशी बियाणी चांगल्या दर्जाची होतात. साहजिकच, त्यातून उत्पादनही उत्तम दर्जाचे मिळते.

अशा बियाणांची लागवड केल्यास पाणी, औषधे, बुरशीनाशके यांची बचत होते. नर्सरीचे व्यवस्थापन करताना ही नर्सरी आपल्या घराजवळ असणे आवश्यक आहे. रोपवाटिकेजवळ पाण्याचा स्रोत असला पाहिजे.

याचे कारण रोपवाटिकेला वारंवार पाणी द्यावे लागते. रोपवाटिका खुल्या जागेवरच असली पाहिजे. रोपांना आवश्यक त्या प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध झाला पाहिजे. सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात मिळाला नाही तर रोपांची वाढ योग्य पद्धतीने होत नाही. त्याचबरोबर रोपवाटिकांसाठीची जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असली पाहिजे. त्या जमिनीचा पोत उत्तम असला पाहिजे.

रोपवाटिकेच्या आसपास स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. तसेच ती जमिनीपासून काही उंचीवर असणेही गरजेचे असते. पावसाळ्याच्या काळात रोपवाटिकेच्या जागी पाणी साठले तर ते हानिकारक ठरते. हा विचार करून रोपवाटिकेची जागा तयार केली पाहिजे.

दलदलीच्या ठिकाणी रोपवाटीका नकोच

रोपवाटिकेची जमिनी पाणी शोषून घेणारी असली पाहिजे. ज्या जमिनीत पाणी साठते अशी जमीन रोपवाटिकेसाठी वापरू नये. अशी जमीन पलटी नांगराद्वारे चांगली तयार करून घ्यावी. त्यात प्रतीचौरस मीटरमध्ये तीन-चार किलो चांगले कुजलेले शेणखत मिसळून घेतले पाहिजे.

मातीमुळे रोपांना कोणत्याही प्रकारचे रोग होऊ नये याकरिता ट्रायकोडमीद्वारे फवारणी करणे आवश्यक असते. रोपवाटिकेतील मातीवर
फार्मेलिन, शेल आम्ल, फम्युमिएट, फ्लोरापिकरिन, सोडियम हायड्रोक्लोराईड आदींचा वापर केला जातो.

या घटकांचा वापर केल्यामुळे मातीमध्ये काही कीड आणि रोगाचे अंश असल्यास ते नष्ट होऊन जातात. त्यानंतर दहा-पंधरा दिवसांनंतर रोपे लावली पाहिजेत. रोपवाटिकेतील वाफ्यांचा आकार हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार निश्‍चित करावा.

पावसाळ्यात वाफ्यांमध्ये अतिरिक्‍त प्रमाणात पाणी साठणार नाही, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. रोपे लावल्यानंतर त्यावर बुरशी नाशक, कीडनाशक औषधांची फवारणी केली पाहिजे.

Vegetables Nursery : रोपांना वाचवण्यासाठी या औषधांचा वापर करावा

बुरशी आणि किडीपासून रोपांवर प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एक किलो बियाणांमध्ये ट्रायकोडमा 8 ग्रॅम या प्रमाणात मिसळले पाहिजे. ट्रायकोमटा उपलब्ध नसेल तर, कॅप्टन, थायरम, बॅविस्टिन यासारख्या औषधांचा वापर केला पाहिजे.

बियाणे या औषधांच्या द्रावणात भिजवून ठेवावी लागतात. प्लास्टिक ड्रममध्ये किंवा खापराच्या भांड्यात हे औषध टाकून त्याला वरून कापड बांधले पाहिजे. कापड बांधल्यानंतर द्रावणात टाकलेले बियाणे व्यवस्थित हलवले पाहिजे. रोपवाटिकेमध्ये बियाणे विखरून टाकले जाते.

मात्र, असे करण्यापेक्षा जर रांगेमध्ये लागवड केली तर रोपांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. तसेच रोपांची निगराणी करणेही सोपे होते. रोपांच्या ओळीमधील अंतर पाच ते सहा सेंटिमीटर एवढे असले पाहिजे.

रोपे तयार करून लागवड केली जाणार्‍या भाज्यांची बी-बियाणी छोटी असतात. बियाणे टाकल्यानंतर शेणखत पुन्हा दिले पाहिजेत. त्यानंतर झारीने पाण्याची हलक्या पद्धतीने फवारणी केली पाहिजे. असे केल्यानंतर रोपवाटिकेतील वाफ्यांना गवत अथवा प्लास्टिकचे आच्छादन दिले पाहिजे. हे आच्छादन दोन दिवस ठेवले पाहिजे. त्यामुळे बियांणांची वाढ निरोगी पद्धतीने होण्यास मदत होते.

रोपवाटिकेला सकाळी आणि संध्याकाळी झारीनेच पाणी दिले पाहिजे. पावसाळ्यात रोपवाटिकेतील रोपांवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात रोपवाटिकेत पॉलिहाऊसचा वापर केला पाहिजे.

पॉलिहाऊस तयार करताना कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. या पद्धतीने जर रोपवाटिकेचे व्यवस्थापन केले तर बियाणांचा दर्जा आणि गुणवत्ता राखली जाते. पॉलिहाऊसचे आवरण योग्य पद्धतीने राहावे. याकरिता तंत्रज्ञांचे मार्गदर्शन घेण्यास विसरू नका.

Back to top button