कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखाल? | पुढारी

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखाल?

– विकास पाटील

गुलाबी बोंड अळीचे पतंग निशाचर असल्यामुळे मीलन होऊन ते अंडी घालतात. या प्रक्रियेत गडद अंधार्‍या रात्रीत जास्त वाढ होते व त्यानंतर तीन ते चार दिवसांत या अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात. राज्यात सध्या कापूस पीक पाते व बोंडे लागण्याच्या अवस्थेत, तर काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत असून, पहिली वेचणी सुरू आहे. काही तुरळक ठिकाणी कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्यःस्थितीत कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 2 ते 3 टक्क्यांपर्यंत आहे. मात्र, हा प्रादुर्भाव पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र व किडीमुळे होणार्‍या नुकसानीचे स्वरूप :

गुलाबी बोंड अळीचे मादी पतंग पात्या, फुले व बोंडावर लांबुळकी चपटी, मोत्यासाखी चकचकीत पांढरी अंडी घालतात. अंड्यांतून बाहेर पडलेली अळी प्रथम पांढूरकी असते व मोठी झालेली अळी गुलाबी रंगाची होते. अंड्यातून बाहेर पडल्यावर अळी सुरुवातीला पात्या, फुलांचे नुकसान करते व पुढील अवस्थेत बोंडात शिरते व आतील सरकी व कापूस खाऊन उपजीविका करते.

गुलाबी बोंड अळीचे पतंग निशाचर असल्यामुळे रात्री (12.00 ते 4.00 वा. दरम्यान) मीलन होऊन ते अंडी घालतात. या प्रक्रियेत गडद अंधार्‍या रात्रीत जास्त वाढ होते व त्यानंतर तीन ते चार दिवसांत या अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. या किडीच्या वाढीसाठी दिवसाचे तापमान 290 ते 320 से. व रात्रीचे तापमान 110 से. ते 140 से. तर दिवसाची आर्द्रता 71 ते 80 टक्के, तर रात्रीची आर्द्रता 26 ते 35 टक्के अत्यंत पोषक आहे. असे वातावरण ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित आहे व तसेच कपाशीचे 15 ते 20 दिवसांचे बोंड हे गुलाबी बोंड अळीचे आवडते खाद्य आहे.

या सर्व कारणांमुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.आपल्या पिकाची नियमित पाहणी करून या किडीच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात.

1. एकरी दोन याप्रमाणे पिकाच्या उंचीच्यावर एक फूट याप्रमाणे फेरोमोन सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामध्येे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.

2. दर आठवड्याला एकरी शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडांची संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी 5 टक्क्यांपेक्षा जास्त आढळल्यास खालील रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.

5 ते 10 टक्के प्रादुर्भाव असल्यास : 

इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 3.8 ते 4.4 ग्रॅम किंवा इथिऑन 50 टक्के प्रवाही 15 ते 20 मि.ली किंवा थायोडिकार्ब 75 टक्के भुकटी 20 ग्रॅम किंवा फेनव्हलरेट 20 टक्के प्रवाही 5.5 मि.लि. किंवा फेनव्हलरेट 20 टक्के प्रवाही 5.5 मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन 10 टक्के प्रवाही 7.6 मि.लि. यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

10 टक्क्यांच्यावर प्रादुर्भाव असल्यास :

अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालीलपैकी कोणत्याही एका मिश्र कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. क्लोरॅट्रॉनिलीप्रोल 9.3 टक्के + लॅब्डासायहॅलोथ्रीन 4.6 टक्के – 5 मि.लि. किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के – 20 मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के + अ‍ॅसिटामाप्रिड 7.7 टक्के – 10 मिलि.

3. सद्यःस्थितीत बहुतांश ठिकाणी कपाशीचे पीक चार ते पाच फूट उंचीचे असून पिकाच्या फांद्या दाटलेल्या आहेत, अशा परिस्थितीत कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा होऊ शकते म्हणून कपाशीवर फवारणी करताना कटाक्षाने फवारणी कीटचा वापर करूनच फवारणी करावी. तसेच फवारणी करताना सकाळी व वार्‍याच्या दिशेने फवारणी करावी.

 

Back to top button