Rabi crops : रब्बी पिकांची घ्या योग्य काळजी | पुढारी

Rabi crops : रब्बी पिकांची घ्या योग्य काळजी

रब्बी पिकांची वेळेवर पेरणी केल्यानंतर लेंडीखत, शेणखतासारख्या पारंपरिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला पाहिजे. त्यानंतर जलसिंचन केल्यानंतर युरिया खत टाकावे. रासायनिक खते टाकताना योग्य प्रमाणात टाकली गेली पाहिजेत. तरच त्या खतांचा उपयोग होतो. अन्यथा अति रासायनिक खतांमुळे पिके करपू लागतात. याचदरम्यान शेतातील तणही वेळोवेळी काढून टाकले पाहिजे. तणकाढणीनंतर जलसिंचन करणे आणि त्यानंतर युरिया खत वापरल्यास पिकांना भरपूर फायदेशीर ठरतो. ( Rabi crops )

 Rabi crops : तण काढून टाकणे गरजेचे

शेती हा व्यवस्थापनाचा उत्कृष्ट आदर्श मानला जातो. सुयोग्य व्यवस्थापन केल्यास शेतीतून मिळणारे उत्पन्न नक्कीच चांगले असते. यासाठी पेरणीपासून पीक काढण्यापर्यंतच्या दीर्घकाळात पिकांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. बीज अंकुरणापासून शेतात तण, गवत वाढायला सुरुवात होते. त्यामुळे बीज अंकुरणाच्या 30-35 दिवसांच्या आतच शेतातील सर्व तण उपटून टाकले पाहिजे. दोन पिकांदरम्यानचे तण काढून टाकल्यास पिकांभोवती हवा खेळती राहते. मात्र शेतात तण मोठ्या प्रमाणात वाढल्यास पिकांच्या वाढीसाठी हानिकारक ठरतात. शेतात अधिक गवत उगवल्यास ते पिकांसाठी असलेले पोषकद्रव्य शोषून घेतात, त्यामुळे हे तण काढून टाकणे गरजेचे असते.

शेतातील पिके हातभर उगवतात तेव्हा युरिया फवारणी देणे गरजेचे असते. पहिल्या सिंचनादरम्यानच गव्हाच्या शेतातसुद्धा तण मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे पहिल्या सिंचनादरम्यान गव्हाची पेरणी झाल्यानंतर 30-35 दिवसांच्या आत तण काढून टाकून युरियाचे खत देणे गरजेचे आहे. बरेच शेतकरी सिंचनाच्या अगोदरच युरिया खत शेतात टाकतात. मात्र त्याचा फारसा फायदा होत नाही. कारण सिंचनानंतर युरिया वाहून जातो. त्यामुळे पहिले सिंचन केल्यानंतरच युरिया फवारणी करावी.

वेळेवर पेरणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात लेंडीखत, शेणखतासारख्या पारंपरिक खतांचा वापर केला गेला पाहिजे. रासायनिक खते टाकताना योग्य प्रमाणातच टाकली गेली पाहिजे. तरच त्या खतांचा उपयोग होतो. अन्यथा अतिरासायनिक खतांमुळे पिके करपू लागतात. याचदरम्यान शेतातील गवतही वेळोवेळी कापले गेले पाहिजे.

गव्हाची पेरणी उशिरा झाली असेल तर म्हणजे 25 डिसेंबरनंतर पेरणी केली गेली तर प्रत्येक दिवसागणिक उत्पादन 30-35 किलो घटू शकते. गव्हाच्या योग्य उत्पादनासाठी थंडीचे 90 दिवस गरजेचे असतात. मात्र उशिरा पेरणी झाल्यास असेच बियाणे वापरावे जे उशिरा पेरण्यासाठी शिफारस केलेले असतात. बियाणांच्या प्रमाणात 25 टक्क्यांची वाढ आणि खते 25 टक्क्यांनी कमी केल्यास योग्य लाभ मिळेल. रब्बीच्या इतर पिकांमध्ये म्हणजे भूईमुगाच्या पेरणीनंतर पहिले सिंचन 40-45 दिवसांनंतर तसेच दुसर्‍यांदा सिंचन 60-65 दिवसांनंतर केले पाहिजे. मोहरीच्या पिकांचीही योग्य काळजी घ्यायला पाहिजे. मोहरीवरील किडीचे नियंत्रण केल्यास मोहरीचे मोठे उत्पादन घेता येते. मटाराच्या पिकासाठीही किडीचा मोठा धोका असतो. त्यावरही योग्य फवारणी केल्यास कीड नष्ट होऊन मटारचे उत्पादन वाढते.

 विलास कदम

 

हेही वाचा :

Back to top button