मविआ महामोर्चा : महापुरूषांबद्दल गरळ ओकणाऱ्यांचा मास्टर माईंड शोधावा लागेल : अजित पवार | पुढारी

मविआ महामोर्चा : महापुरूषांबद्दल गरळ ओकणाऱ्यांचा मास्टर माईंड शोधावा लागेल : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचा अभिमान कायम ठेवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. महापुरूषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र पेटून उठला आहे, शांत बसलेला नाही, हे या मोर्चातून दिसून येत आहे. महापुरूषांबद्दल गरळ ओकणाऱ्यांचा मास्टर माईंड कोण? हे शोधावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवले पाहिजे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

महापुरूषांचा भाजप नेत्यांकडून केला जाणारा अवमान, राज्यपालांचे छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज (दि. १७) मुंबईत महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात महाविकास आघाडीतील ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत. यावेळी जाहीर सभेत अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.

महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी जे मंत्री दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करून अजित पवार यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला. राज्यात शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महापुरूषांचा अवमान करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी वेळ पडली तर कायदा करा, अशी मागणी करून कायद्याचा विसर सरकारला पडला आहे, अशी टीका पवार यांनी यावेळी केली.

पुन्हा पुन्हा चूक कशी होते? ती चॉईस असते : सुप्रिया सुळे

एखाद्याने कुठली चूक एकदा केली ठीक आहे, दोनदा केली तर ठीक आहे. पण पुन्हा पुन्हा चूक कशी होते? ती चॉईस असते, मग ती चूक नसते. राज्यपालांनी अद्याप दिलगिरी व्यक्त केलेली नाही. त्यामुळे निवडकपणे दिलगिरी व्यक्त केली जात आहे, असा टोला राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला.

भीक मागायचे असे बोलणे म्हणजे संबंधित व्यक्तीला लहान दाखवणे असते. पण त्याचवेळी लोक भीक मागतात म्हणून त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलणेही वाईट आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी असे बोलणे, तर अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका सुळे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.

भाजपाला मी आत्तापर्यंत सुसंस्कृत पक्ष समजत होते. मी स्वत: भाजपाला अनेक वर्षं जवळून पाहिले आहे. पण इतकी शिस्त असणाऱ्या पक्षाला काय झाले आहे, हे मला माहिती नाही. भाजप सुसंस्कृत पक्ष होता, तो तसा राहिलेला नाही. सत्ता येत जात असते, पण राज्याची आणि देशाची संस्कृती राहिली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचलंत का ? 

 

 

Back to top button