अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक सध्या एका आवर्तात सापडली आहे. जो बायडेन यांच्या जाहीर टीव्ही डिबेटमधील खराब कामगिरीने ही स्थिती ओढवली असून त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, असा दबाव वाढत आहे. पण तरीही ते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यांनी माघार घेतली नाही तर डोनाल्ड ट्रम्प ही निवडणूक सहज जिंकू शकतात. त्यामुळे परिस्थिती सावरण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाने बदलत्या स्थितीचा रेटा लक्षात घेऊन धाडसी निर्णय घेण्याची आणि आपले डावपेच बदलण्याची गरज आहे.
अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक अनपेक्षितरीत्या सध्या एका झंझावातात सापडली असून अनिश्चिततेच्या वादळी वार्यात तिचा निकाल काय लागणार, हे सध्या तरी कोणीच काही सांगू शकत नाही. अध्यक्षीय निवडणुकीत टेलिव्हिजन आणि सोशल मीडिया या गेमचेंजर झाल्या असल्याने उमेदवाराचे भवितव्य ठरविण्यात त्या महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपला उमेदवार किती स्मार्ट आहे, तो उत्तरे किती तयारीने देतो, वक्तृत्वातील त्याचा वकूब कसा आहे, प्रतिस्पर्ध्याचा युक्तिवाद खोडून काढण्यात तो किती वाक्बगार आहे, पुढील 4 वर्षे या पदाचा कारभार सांभळण्यास किती सक्षम आहे इत्यादी व्यक्तिमत्त्वाच्या बाजू मतदार त्यांच्या टेलिव्हिजनमधील संभाषणातून जोखत असतात. त्याचे दिसणे, देहबोली, पेहराव याही छोट्या छोट्या वाटणार्या बाबी त्यांना दुर्लक्षिता येत नाहीत. या निवडणुकीत दोन्हीही उमेदवार वयोवृद्ध आहेत. बायडेन हे 81 वर्षांचे असून अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध अध्यक्ष आहेत; तर डोनाल्ड ट्रम्प 78 वर्षांचे आहेत. त्यामुळे मतदारांना निवडीला फारच मर्यादा आहेत. तरीही या देशातील मतदारांना हे दोन्ही उमेदवार त्यांच्या यावेळच्या पहिल्यावहिल्या टीव्हीवरील जाहीर वादविवादाला (डिबेट) कसे सामोरे जातात, याविषयी खूपच उत्सुकता होती. त्यामुळे सीएनएन या टीव्ही चॅनेलतर्फे झालेला हा कार्यक्रम तब्बल 5 कोटी 10 लाख मतदारांनी आणि जगभरात कोट्यवधी लोकांनी पाहिला. यात ट्रम्प अनेकवेळा खोटे पण रेटून बोलले. त्या तुलनेत जो बायडेन यांची कामगिरी खूपच निराशाजनक होती. त्यांना बोलताना योग्य शब्द सापडत नव्हते. ते अडखळत होते. या वादविवादात आपल्या स्मार्ट शैलीच्या जोरावर ट्रम्प यांनी बाजी मारली; तर आपल्या अध्यक्षीय कामगिरीच्या जमेच्या बर्याच बाजू असूनही बायडेन त्या मांडायला असमर्थ ठरले. हा ‘डिझास्टर्स परफॉर्मन्स’ आहे, अशी टीका सध्या त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षात केली जात असून आधी दबक्या आवाजात खासगी संभाषणात बोलणारे आता उघडपणे हे बोलून दाखवत आहेत. मुळात प्रश्न एका डिबेटपुरता मर्यादित नाही. पुढील चार वर्षांच्या जबाबदारीचा आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करिन जॉन पिअरे यांनी बायडेन स्पर्धेतून अजिबात माघार घेणार नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. परदेश दौर्यातील थकवा आणि सर्दीचा त्रास यामुळे बायडेन यांची डिबेटमधील कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. इथे स्वत: बायडेन पत्रकारांना सामोरे गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयीच्या शंका अजूनही दूर झालेल्या नाहीत. अर्थात असे असले तरी अजूनही निर्णय बदलू शकतो. निवडणुकीला निधी देणारे पण आता साशंक आहेत. टाईम्स - सिएनाने संभाव्य मतदारांचा जो राष्ट्रीय पातळीवर पोल अलीकडेच घेतला, त्यात ट्रम्प हे बायडेन यांच्यापेक्षा 6 पर्सेंटेज पॉईंटस्ने आघाडीवर असल्याचे चित्र आहे. म्हणजे ट्रम्प हे 49 टक्क्यांवर तर बायडेन हे 43 टक्क्यांवर आहेत. डिबेटपूर्वी हा फरक 3 टक्क्यांचा होता. सुमारे 74 टक्के संभाव्य मतदारांनी बायडेन हे त्यांच्या वयपरत्वे येणार्या शारीरिक मर्यादेमुळे अध्यक्षपद सांभाळण्यास असमर्थ असल्याचे मत नोंदविले आहे. हे वास्तव असूनही बायडेन यांचे कुटुंबीय आणि त्यांचे निकटवर्तीय त्यांनी उमेदवारी कायम ठेवावी, या मताशी चिकटून आहेत. अर्थात पायउतार होण्यासाठी दबाव वाढत गेला तर हा निर्णय बदलू शकतो. त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब येत्या ऑगस्टमध्ये शिकागो येथील पक्षाच्या अधिवेशनात होणार आहे. त्यांनी स्वत:हून माघार घेण्याचे ठरविले तरच पर्यायी उमेदवाराची निवड होऊ शकते. पण ही प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची आहे.
‘अ वीक इज अ लाँग टाईम इन पॉलिटिक्स’ असे म्हटले जाते. परिस्थितीची गतिशीलता (डायनॅमिक्स) लक्षात न घेता निर्णय घेणे टाळले तर त्याची मोठी किंमत द्यावी लागते, हे राजकारणात अनेकदा अनुभवायला मिळते. बदलत्या परिस्थितीला अनुकूल असे धाडसी निर्णय घेण, आपल्या पक्षाचे डावपेच आणि पवित्रा बदलणे हा संभाव्य संकट टाळण्याचा मार्ग असतो. कितीही अवघड, क्लेशदायी असले तरी ते करण्याशिवाय पर्याय नसतो. बायडेन यांच्या डिबेटमधील वाईट कामगिरीमुळे अशीच परिस्थिती डेमोक्रॅटिक पक्षावर ओढवलेली आहे. केवळ अमेरिकेचेच नव्हे तर जगापुढील संघर्ष रशिया विरुद्ध युक्रेन आणि इस्रायल विरुद्ध हमास यासारख्या युद्धाने बिकट झाले असताना जागतिक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी सदैव सज्ज असलेल्या अमेरिकेचे नेतृत्वच सक्षम नसेल तर काय परिस्थिती ओढवेल, हे सांगता येत नाही. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाच्या कॉन्झर्वेटिव्ह न्यायमूर्तींमुळे खटल्यांपासून अंशत: का होईना, अभयाचे कवच मिळाले आहे. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेली कृती या संरक्षणास पात्र आहे. अध्यक्षाला अशी निरंकुश सत्ता मिळालेली असताना ट्रम्प सत्तेवर येण्याचे किती तरी धोके आहेत. कायद्यापुढे सर्व समान असले तरी अध्यक्ष त्याच्यापेक्षा किती तरी अधिक पटींनी समान आहेत, असा याचा अर्थ होतो. ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टावर नेमलेल्या तीन न्यायमूर्तींमुळे त्यांना अनुकूल निर्णय मिळाला, हे वास्तव आहे. पण त्याचे परिणाम अमेरिकेच्या भावी राजकारणावर होणार आहेत. ट्रम्प यांनी आपण सत्तेवर आलो तर आपल्या राजकीय विरोधकांचा सूड घेणार आहोत, तसेच निवडणुकीचे निकाल आपल्या बाजूने लागला नाही तर रक्तपात होईल, असे इशारे यापूर्वीच देऊन ठेवले आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टाने आता इम्युनिटीच्या रूपात आयते कोलित दिले आहे. ते सत्तेवर आले तर राष्ट्रीय स्तरावर गर्भपात बंदी कायदा अंमलात आणू शकतात, नेटोबाबतच्या अमेरिकेच्या संबंधांची समीकरणे बिघडू शकतात. बेकायदेशीर स्थलांतरितांची सरसकट त्यांच्या मायदेशी हकालपट्टी करण्यासाठी लष्कराची मदत घेऊ शकतात. श्रीमंतांसाठी करकपात करू शकतात. त्यांची पावले हुकूमशाहीकडे जाणारी असतील, अशी भीती पूर्वीपासूनच व्यक्त करण्यात आली आहे. अशा स्थितीत बायडेन यांच्या साडेतीन वर्षांच्या कामगिरीच्या दाखल्याचे फारसे महत्त्व नाही. एकूण 1461 दिवस ही जबाबदारी सांभाळण्याचा हा विषय आहे. या निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी प्रवृत्त करण्याची गरज आहे.
बायडेन यांनी इस्रायलला जो मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आणि पॅलेस्टिनींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यावर बहुसंख्य तरुण वर्ग नाराज आहे. मध्यंतरी अमेरिकेतील बर्याच विद्यापीठांत या प्रश्नावर मोठी आंदोलनेही झाली. अशा स्थितीत बायडेन यांनी पक्ष आणि देशहितासाठी आपली भूमिका न बदलल्यास प्रतिनिधीगृहात आपल्या पक्षाचे बहुमत प्रस्थापित क रण्याची आणि सिनेटमधील बहुमत आपल्या पक्षाकडे राखण्याची संधीही गमावण्याची वेळ डेमोक्रॅटिक पक्षावर येऊ शकते. खरे तर या पक्षात बायडेन यांची जागा घेऊ शकेल, असे काही तरुण, अनुभवी उमेदवारही आहेत. त्यांना अधिवेशनापूर्वी मतदारांपुढे आणून त्यातील योग्य पर्याय निवडता येणे अशक्य नाही. सध्या बायडेन यांना निवडीसाठी आवश्यक असलेल्या प्रतिनिधींचा पाठिंबा आहे. पण बायडेन यांनी माघार घेतल्यास हे प्रतिनिधी योग्य उमेदवार निवडू शकतात. यात अर्थातच जोखीम आहे, हे नि:संशय. पण सद्य:स्थिती आहे तशी ठेवण्यात अधिक धोका आणि जोखीम आहे. मागचा इतिहास इथे लक्षात घेतला पाहिजे. हिलरी क्लिटंन यांचा आता हक्क आहे, असे सांगून बराक ओबामा यांनी 2016 मध्ये बायडेन यांना या स्पर्धेतून बाजूला राहायला सांगितले. देशाचा एकूण कल त्यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाच्या लक्षात आला नाही. आपण सहज जिंकू असा फाजील विश्वासही होता. पण त्यामुळे क्लिटंन पराभूत होऊन सत्ता ट्रम्प यांच्या हाती आली. आता देखील परिस्थिती त्यांना न्यूयॉर्कयेथील कोर्टाने दोषी ठरविले असले तरी अनुकूल आहे, हे वास्तव बायडेन विचारात घेतील का?
डेमोक्रॅटिक पक्षात प्लॅन बीची जी चर्चा चालू आहे, त्यात संभाव्य उमेदवारात मूळ भारतीय तसेच कृष्णवर्णीय वंशाच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे नाव घेतले जाते. रिपब्लिकन पक्षाने तर बायडेन यांना मत म्हणजे कमला हॅरिस यांना मत, अशी जाहिरात करून पुढे काही अनपेक्षित घडल्यास त्याच कायद्यानुसार अध्यक्षपदी येणार, असा प्रचार चालविला आहे. इतरही काही नावे असली तरी हॅरिस यांना सहजासहजी डावलणे अवघड आहे. कारण महिला आणि कृष्णवर्णीय मतदारांच्या पक्षाच्या हक्काच्या मतपेढीवर त्यांची पकड आहे. शिवाय अलीकडे बायडेन यांच्यापेक्षा जनमत चाचणीतील त्यांचे ट्रम्प यांच्या तुलनेतील स्थान वरचे आहे. पण बायडेन यांची डिबेटमधील खराब कामगिरीनंतर त्यांचे जोरदार समर्थन करण्यात त्या आघाडीवर आहेत. एका डिबेटच्या कामगिरीवर बायडेन यांच्या कामाचे मूल्यमापन करता येणार नाही. त्यांनी जी साडेतीन वर्षात कामगिरी केली त्याचे स्मरण त्या करून देतात. विशेषत: त्यांनी दीड कोटी रोजगार आणि नोकर्या निर्माण केल्या हे त्या निदर्शनास आणतात. अलीकडे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक ठिकाणी नेतृत्व केल्याची उदाहरणे आहेत. तसेच टीव्हीवरही त्यांच्या मुलाखती वारंवार घेतल्या जात असल्याचे आढळून येते. अर्थात त्यांना पक्षात एकमुखी पाठिंबा मिळणे अवघड आहे. त्यांच्याबरोबर हिलरी क्लिटंन आणि बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्या नावाचीही चर्चा आहे. पण मिशेल यांना ही निवडणूक लढण्यात स्वारस्य दिसत नाही. तसेच 2016 मध्ये जो उत्साह हिलरी क्लिटंन यांच्याकडे होता तो आता त्यांच्यात राहिलेला नाही. याखेरीज काही सिनेटर्स आणि राज्यांचे गव्हर्नरही संभाव्य उमेदवारांच्या यादीत दिसतात. मिशिगनच्या ग्रेत्वेन व्हिटमर आणि कॅलिफिर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांचा यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यापैकी ग्रेत्वेन या स्मार्ट आणि टफ म्हणून ओळखल्या जातात. त्या ट्रम्प यांच्याशी चांगली लढत देतील, असा पक्षातील काहींना विश्वास आहे. इकडे ट्रम्प यांनीही अद्याप त्यांच्या उपाध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. डेमोक्रॅटिक पक्षातील घडामोडी कोणत्या दिशेने जातात, हे पाहूनच त्याबाबातचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. अर्थात डेमोक्रॅटिक पक्षात बायडेन यांच्या निर्णयावरच पर्यायांचा विचार होऊ शकणार आहे, तोपर्यंत अनिश्चिततेचे सावट दुंभगलेल्या अमेरिकेच्या राजकारणावर कायम राहणार, यात शंका नाही.
जो बायडेन यांनी अध्यक्षपदाचा पहिला कार्यकाल कार्यक्षमतेने पूर्ण केला. त्याविषयी अनेकांना आदर आहे. पण आता वयामुळे त्यांना यापुढे ही जबाबदारी पेलवणार की नाही याविषयी शंका आहे. त्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी आपणहून उमेदवारी मागे घ्यावी, असे आवाहन ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने संपादकीयात केले आहे. ‘टू सर्व्ह हिज कंट्री, प्रेसिडेंट शुड लीव्ह द रेस’ या शीर्षकाच्या या संपादकीयात ट्रम्प सत्तेवर येणे धोक्याचे आहे; पण त्यांना पराभूत करणे बायडेन यांना शक्य नाही. चार वर्षांपूर्वीचे बायडेन आता राहिलेले नाहीत. त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक क्षमता उरलेली नाही. त्यामुळे त्यांनी आपणहून पायउतार व्हायला पाहिजे, अशा आशयाचे सडेतोड मत त्यात व्यक्त केले आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘द न्यूयॉर्कर’ आदी वृत्तपत्रांनीही अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे बायडेन यांच्या गोटात सध्या ‘डॅमेज कंट्रोल’चे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ते एबीसीच्या प्रतिनिधीला मुलाखत देणार आहेत. आपण अजूनही अध्यक्षपद सांभाळण्यास सक्षम आहोत, हे दाखवून देण्यासाठी ही धडपड आहे.