बहार विशेष : शिवराज्याभिषेक स्वराज्यनिर्मितीच्या कार्याचा कळस

बहार विशेष : शिवराज्याभिषेक स्वराज्यनिर्मितीच्या कार्याचा कळस
Published on
Updated on

[author title="डॉ. जयसिंगराव पवार (ज्येष्ठ इतिहास संशोधक)" image="http://"][/author]

इस्लामी लाटेपुढे यादवांचे सामर्थ्यशाली साम्राज्य हतबल होऊन नष्ट झाले होते, विजयनगरचे साम्राज्यही शेवटी नाश पावले होते आणि हिंदू समाजास एक प्रकारची अवकळा प्राप्त झाली होती. चैतन्यहीन गोळ्यासारखा हिंदू समाज पडून होता. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने चैतन्य भरले, जिवंतपणा आणला. महाराजांनी स्थापन केलेले राज्य केवळ मराठ्यांनाच प्रेरक ठरणारे होते असे नाही; तर इस्लामी वर्चस्वाखाली राहणार्‍या इतर प्रांतांतील असंतुष्ट प्रजेसही ते प्रेरक ठरणारे होते. येत्या गुरुवारी (दि. 6 जून) होणार्‍या त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विशेष लेख.

कृष्णाजी अनंत सभासद हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आद्य चरित्रकार. मराठ्यांचा राजा 'रायगडावर' 'छत्रपती' झाला, हे पाहण्याचे भाग्य लाभलेला मराठी बखरकार आहे. त्याचे लिखाण अत्यंत त्रोटक आहे; पण ते अतिशय मार्मिक आहे. राज्याभिषेकाच्या महत्त्वाबद्दल हा बखरकार दोनच वाक्ये लिहून जातो; पण त्या वाक्यांत सर्व शिवचरित्राचे सार येऊन जाते. तो म्हणतो : 'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मर्‍हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.' ही खरोखरच असामान्य गोष्ट होती. शतकानुशतकांतून एखाद्या समाजाच्या इतिहासात असा एखादा वैभवशाली दिवस येतो. हिंदू समाजाच्या इतिहासामध्ये आलेला हा असा वैभवशाली दिवस होता. या युगात सर्वत्र मुसलमान राजे. आम्हा हिंदूंना राजे होता आले नाही. नव्हे होता येणारच नाही, अशा न्यूनगंडाने पछाडलेल्या हिंदू समाजात महाराजांनी राज्याभिषेक करून नवचैतन्य निर्माण केले.

राज्याभिषेकाची आवश्यकता

गुप्तकालानंतरच्या कालात राज्याभिषेक केल्याचे हिंदू समाजाला माहीत नव्हते आणि देवगिरीच्या यादवानंतर महाराष्ट्रातील खरेखुरे राजपदही नाहीसे झाले होते. निजामशाही व आदिलशाही या दक्षिणेतील शाह्यांत व उत्तरेकडील मुगल बादशाहीत अनेक हिंदूंना 'राजा' हा किताब असे व या वेळीही होता; पण हे सर्व नावाचेच राजे असत. आपण पाहिले की, जावळी, पालवण, शृंगारपूर जहागिरीच्या प्रमुखांनाही 'राजे' असे म्हणत. खुद्द महाराजांचे वडीलही 'राजे'पद लावत; परंतु त्यांची सत्ता मुसलमान राजासारखी नव्हती. ते मुसलमान राजांचे चाकर होते. महाराजांना असे राजपद नको होते. त्यांना खरेखुरे राजपद, स्वतंत्र 'राजेपण' हवे होते.

या ठिकाणी पुढे 225 वर्षांनी युरोपात नेपोलियन बोनापार्ट याने स्वतः राज्याभिषेक करून घेतला, त्या घटनेची आठवण होते. नेपोलियन फ्रान्सचा 'फर्स्ट कॉन्सल' या नात्याने सर्वाधिकारी होता, त्याची सत्ताही तहहयात होती; पण तो राजा नव्हता. त्याची सत्ता अधिक स्थिर व कायदेशीर होण्यासाठी त्यास राजपदाची निर्मिती आवश्यक वाटत होती. तो सत्तेवर आल्यापासून त्याचा खून करण्याची अनेक कटकारस्थाने झाली. ती पाहून युरोपातील अन्य सत्ताधीश सुखाने राज्य करतात व आपणासच कटकारस्थानांना का तोंड द्यावे लागते, याचा तो विचार करू लागला. त्याला असे दिसून आले की, युरोपातील इतर सत्ताधीशांच्या राजवटी वंशपरंपरागत व कायदेशीर मानल्या गेल्या आहेत. कारण ते सिंहासनारूढ राजे आहेत.

आपलीही राजवट अशी मानली जाण्यासाठी आपण स्वतःच राज्याभिषेक करून घेतला पाहिजे. प्रजेची निष्ठा आपल्या चरणी बद्ध करण्याचा राज्याभिषेक हा उत्तम मार्ग होय, असे महाराजांप्रमाणे नेपोलियनलाही वाटले, हे नमूद केले पाहिजे. आदिलशहाच्या दृष्टिकोनातून महाराज म्हणजे आपल्या जहागीरदाराचा बंडखोर पुत्र, आपल्या राज्यातील एक बंडखोर, लुटारू मनुष्य होते. कुतुबशहा, मुगल, पोर्तुगीज, इंग्रज या सर्वांचाही महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन याहून फारसा वेगळा नव्हता. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील मोरे, सुर्वे, दळवी, निंबाळकर इत्यादी मराठे महाराजांना आपल्यासारखेच एक आदिलशहाचे चाकर समजत होते. त्यांच्या कागदपत्रांत यासंबंधी अनेक पुरावे उपलब्ध आहेत.

महाराजांना राज्याभिषेकाने हे दाखवून द्यायचे होते की, प्रस्थापित मुसलमान राजवटीविरुद्ध बंडखोरी करण्याची पायरी महाराजांनी ओलांडली असून, त्यांनी 'मराठी राज्या'ची स्थापना केली आहे व ते आदिलशहा-मुगल बादशहा यांच्यासारखे हिंदूंचे राज्यकर्ते (बादशहा) बनले आहेत. एवढेच नव्हे तर राज्याभिषेक करून महाराजांना हिंदुस्थानातील मुसलमानी सत्ताधीशांना इशारा द्यावयाचा होता की, आता हिंदूंचे राज्य निर्माण झाले आहे, त्यांना त्यांचा अभिषिक्त राजा मिळाला आहे आणि येथून पुढे हिंदूंवर होणारा अन्याय व जुलूम सहन केला जाणार नाही. तसा तो झाला, तर अन्याय व जुलूम करणार्‍यास शासन करण्यासाठी हिंदूंची सत्ता, हिंदूंची बादशाही हिंदुस्थानात प्रस्थापित झाली आहे. ती स्वतंत्र आहे. सार्वभौम आहे. राज्याभिषेक हे सार्वभौमत्वाचे लक्षणच होते.

गागाभट्टास पाचारण

अकबराच्या काळात कृष्ण नृसिंह शेष या धर्मपंडिताने शूद्राचार शिरोमणी नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यामध्ये त्याने 'या कलियुगात जगात क्षत्रियच नाहीत,' असा सिद्धांत सांगितला होता आणि त्याचाच प्रभाव हिंदुस्थानातील सर्व हिंदू प्रजेवर पडला होता. महाराष्ट्रातील काही ब्राह्मण पंडितही त्यास अपवाद नव्हते. महाराजांनी राज्याभिषेकाचा विचार बोलून दाखविताच त्यांनी दोन मूलभूत प्रश्न उपस्थित केले. (1) या जगात क्षत्रिय आहेत काय? (2) असतीलच तर महाराज क्षत्रिय आहेत काय? आता हा सामाजिक व धर्मशास्त्रीय प्रश्न महाराजांनी पाच-दहा ब्राह्मणांची डोकी कापून सोडविला जाणार नव्हता. जसा प्रश्न तसेच त्यावर उत्तर शोधणे आवश्यक होते. खुद्द महाराज व त्यांचे वाडवडील स्वत: सिसोदिया या रजपूत (क्षत्रिय) वंशातील आहोत, असे मानत होते.

त्यासंबंधी त्यांनी व इतरांनी काढलेले उद्गार कागदपत्रांत सापडतात. खुद्द महाराजांना आपण क्षत्रिय आहोत, असे मनापासून वाटत असूनसुद्धा त्यांनी कुणाही पंडिताच्या मनात काही किल्मिष राहू नये, यासाठी आपल्या पदरी असणारे बाळाजी आवजी, केशवभट पुरोहित, भालचंद्रभट इत्यादी पंडितांचे एक शिष्टमंडळ उत्तरेतील जयपूर, अंबर, काशी इत्यादी ठिकाणी पाठविले. या शिष्टमंडळाने जयपूरच्या राजघराण्यातून सिसोदिया फुलाजी, शिवाजी महाराज याच वंशातील आहेत, हे सांगणारी वंशावळ प्राप्त केली आणि रजपूत राजांच्या दरबारी होणार्‍या राज्याभिषेक समारंभाची शास्त्रीय माहिती जमा केली. पुढे हे शिष्टमंडळ काशीला गेले. तेथे हिंदू जगतामध्ये प्रसिद्ध असलेल्या गागाभट्ट या महापंडिताला त्यांनी महाराजांच्या वतीने राज्याभिषेकाचे अध्वर्युत्व स्वीकारण्याची विनंती केली आणि ती त्यांनी मानली.

विश्वेश्वर ऊर्फ गागाभट्ट यांचे मूळ घराणे महाराष्ट्रातील पैठण या गावचे होय; परंतु सोळाव्या शतकात अनेक विद्वान ब्राह्मणांनी मुसलमानी जुलमाला कंटाळून पैठण सोडून काशीला वास केला. त्यात हे भट्ट घराणे होते. या घराण्याला अनेक महापंडित होऊन गेले होते. खुद्द गागाभट्ट हा हिंदू जगतामधील एक सर्वश्रेष्ठ पंडित समजला जात असे. हिंदू धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान या क्षेत्रांत त्याच्या तोडीचा अन्य कोणी पंडित हिंदुस्थानात नव्हता. हिंदू जगतामध्ये 'ब्रह्मदेव' व 'व्यास' अशा नावांनीच तो ओळखला जाई. अशा महान पंडिताला महाराजांनी राज्याभिषेकासाठी पाचारण केले होते. खुद्द गागाभट्ट अनेक वेळा दक्षिणेत धर्मशास्त्र निर्णयासाठी येऊन गेला होता व महाराजांशी त्याचा चांगला परिचय होता. बाळाजी आवजीचे शिष्टमंडळ परतल्यानंतर महाराजांनी गोविंद भट्ट खेडकर यास गागाभट्टाला आणण्यास पाठविले. गागाभट्ट आल्यानंतर आपल्या अलौकिक विद्वत्तेने व बुद्धिचातुर्याने त्याने ज्या मंडळींनी राज्याभिषेकास विरोध केला होता, त्यांच्या शंकांचे निरसन करून समाधान केले आणि समारंभाच्या पुढच्या तयारीस तो लागला.

हा समारंभ रायगड या किल्ल्यावर होणार होता. त्या दृष्टीने राजधानीस आवश्यक असणार्‍या राजमंदिर, मंत्रिसभा, धर्मसभा, चित्रसभा, राण्यांचे महाल, गजशाला, पाकशाला, कोठ्या, सरकारकुनांचे वाडे, बाजारपेठा इत्यादी अनेक इमारती यापूर्वीच बांधून तयार होत्या. रायगड ही राजधानी म्हणून महाराजांनी का निवडली, हे सांगताना सभासद म्हणतो, 'गड बहुत चखोट, चौतर्फी गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे दीड गाव उंच, पर्जन्यकाली कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा ताशीव एकच आहे. असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड करावा.'

देवदर्शन, मुंज इत्यादी विधी

राज्याभिषेकापूर्वी आपल्या राज्यातील देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी महाराजांची स्वारी निघाली (मे 1674), प्रथम महाराज चिपळुणास गेले. तेथे श्री परशुरामाची पूजा बांधून ते रायगडास परतले. चार दिवसांनी ते प्रतापगडास आले. तेथे महाराजांनी तुळजाभवानीची मूर्ती स्थापून मंदिर बांधले होते. या मूर्तीस महाराजांनी सव्वा मण सोन्याची छत्री अर्पण केली. या छत्रीची किंमत त्या वेळी 50 हजार रुपये होती. तुळजाभवानीचे दर्शन घेऊन महाराज 21 मे रोजी रायगडास परतले. यानंतर 29 मे, 1674 रोजी गागाभट्टाने महाराजांचे क्षत्रिय पद्धतीनुसार मौजीबंधन केले. आतापर्यंत भोसले घराण्यात हा संस्कार लुप्त झाला होता. त्याचे प्रायश्चित्त म्हणून तुलादान विधी केला, तसेच लष्करी मोहिमांत झालेल्या 'ब्रह्महत्यादी पातकांच्या क्षालनार्थ' तुलापुरुषदान विधी केला गेला. यानंतर 30 मे, 1674 रोजी महाराजांचे त्यांच्याच राण्यांशी पुन्हा 'समंत्रक विवाह' लावण्यात आले. हे विवाह वैदिक पद्धतीअनुसार करण्यात आले. वरील दोन विधींनी महाराजांना आता शुद्ध क्षत्रिय म्हणून धर्मशास्त्राची मान्यता मिळाली. यानंतर राज्याभिषेकाच्या दिवसापर्यंत दररोज अनेक प्रकारचे विधी, होमहवन, दान, ब्राह्मणभोजने इत्यादी अनेक कार्यक्रम नित्य चालू होते.

राज्याभिषेक सोहळा

ज्येष्ठ शुद्ध 13 शनिवार, ता. 6 जून, 1674 रोजी रायगडावर महाराजांना राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेक समारंभास शुक्रवार सायंकाळपासून सुरुवात होऊन तो शनिवारी सकाळी संपला. या राज्याभिषेकाचे वर्णन अनेक बखरींत व परकीयांच्या पत्रांत आढळते. हा सोहळा असा साजरा झाला.

महाराज व त्यांची पट्टराणी सोयराबाई राज्याभिषेक मंडपात आल्यावर राज्याभिषेकाची सुरुवात गणेशपूजन, स्वस्तिपूजन इत्यादी पूजनांनी झाली. यानंतर मंडपपूजा करण्यात आली. मंडपामधील महावेदीच्या पूर्वेस सुवर्णकुंभ, दक्षिणेस रजतकुंभ, पश्चिमेस ताक्रकुंभ व उत्तरेस मातीचे कुंभ तुप, दूध, जल इत्यादींनी भरून ठेवले होते. त्याशिवाय देशातील पवित्र नद्यांच्या व सागरांच्या जलांनी भरलेले कुंभही तेथे होते. महावेदीवर अग्नी व ग्रह यांची प्रतिष्ठापना करून वेदमंत्रांच्या घोषात होमहवन झाले. यानंतर महाराजांनी समंत्र स्नान व त्यानंतर पंचामृतस्नान केले. शुक्ल वस्त्र परिधान केल्यानंतर वेदीवरील आसंदीवर विधीपूर्वक आरोहण केले. नंतर अग्निपूजा केल्यावर महाराज अभिषेकशालेत गेले. अभिषेक व सिंहासनारोहण असे राज्याभिषेकाचे दोन प्रमुख विधी होते. आता अभिषेकशालेत अभिषेकाला सुरुवात होणार होती.

अभिषेकशालेत सोन्याचे आसन तयार केले होते. त्या आसनावर महाराज, सोयराबाई व युवराज संभाजीराजे यांनी आरोहण केले. यावेळी अष्ट दिशांना महाराजांचे अष्ट प्रधान उभे राहिले होते. पूर्वेला पंतप्रधान मोरोपंत तुपाने भरलेला सोन्याचा कलश घेऊन उभे होते, आग्नेयेस आण्णाजीपंत सचित्र छत्र घेऊन उभे होते, दक्षिणेस हंबीरराव मोहिते सेनापती दुधाने भरलेला रौप्य कलश घेऊन उभे होते, पश्चिमेस रामचंद्रपंत अमात्य दह्याने भरलेला ताम्रकलश घेऊन व वायव्येस दत्ताजीपंत मंत्री मोरचेल घेऊन उभे होते. याशिवाय अनेक अधिकार्‍यांच्या हाती पवित्र नद्यांच्या जलांनी भरलेले कलश होते. या सर्वांनी वेदमंत्रांच्या घोषात महाराज, पट्टराणी व युवराज यांच्यावर अभिषेक केला. यावेळी वाद्यांचा गजर झाला. सोळा ब्राह्मण सुवासिनींनी महाराजांना सोन्याच्या पंचारत्या केल्या. यानंतर महाराजांनी पुन्हा स्नान करून काशाच्या परातीतील तुपात आपले मुख पाहिले. हिरे व सोने यांचे अलंकार घालून वस्त्र परिधान करून डोईस मंदिल बांधिला. त्यानंतर त्यांनी तलवार ढाल, धनुष्य, बाण व रथ यांची पूजा केली.

सत्पुरुष, मातुःश्री जिजाबाई, इतर वडीलधारी मंडळी, गागाभट्ट व इतर पंडित यांना नमस्कार करून त्यांच्यासह महाराज राजसभेत सिंहासनारूढ व्हावयास निघाले. राजसभेचे दालन अत्यंत सुशोभित करण्यात आले होते. राजारोहणासाठी अत्यंत मौल्यवान असे सिंहासन महाराजांनी तयार केले होते. त्याच्या आठ दिशांना आठ रत्नजडित स्तंभ होते. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या मस्तकावर धरावयाचे छत्र जडावयाचे मोतीलग झालरीचे होते. सभासद म्हणतो की, महाराजांनी 32 मण सोन्याचे हे सिंहासन तयार करून कोशातील मौल्यवान रत्नेे त्यामध्ये जडविली होती. सर जदुनाथ सरकार म्हणतात :'बत्तीस मण म्हणजे चौदा लक्ष रुपयांचे सोने झाले. रत्नांची किंमत निराळी, त्याशिवाय हे सिंहासन तयार करीत असता दिल्लीचे मयूर सिंहासन शिवाजीच्या दृष्टीपुढे असावे.' राजारोहणच्या प्रसंगी हजर असलेला ऑक्झिंडन हा इंग्रज वकील राजसभेचे वर्णन करताना म्हणतो, 'सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे असल्याचे आम्ही पाहिले. उजव्या हाताला दोन मोठमोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे व एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर सम पातळीत लोंबणारी सोन्याची तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती.' याशिवाय सभागृहाच्या भिंती शुभलक्षणी चिन्हांनी व चित्रांनी सुशोभित करण्यात आल्या होत्या. मोत्याच्या झालरींनी छत शृंगारला होता. सभागृहाच्या प्रवेशद्वारी दोन शुभलक्षणी हत्ती सुवर्णालंकारांसह उभे होते.'

ब्राह्मण पंडित, अष्टप्रधान, चिटणीस यांच्यासह महाराजांनी सभागृहात शुभ बळी प्रवेश केला. सिंहासनाजवळ येताच त्यास वंदन करून, त्यास पायाचा स्पर्श न करता, वेदमंत्रांचा घोष चालू असतानाच, महाराजांनी सिंहासनावर आरोहण केले. युवराज संभाजीराजे, गागाभट्ट व पंतप्रधान मोरोपंत हे सिंहासनाच्या खालच्या पायरीवर आसनस्थ झाले. इतर प्रधान, राज्यातील अधिकारी, निमंत्रित मंडळी, ब्राह्मण पंडित
वगैरे त्यांना नेमून दिलेल्या जागी उभे होते. मातुःश्री जिजाबाईंच्या समोर हा सोहळा होत होता. महाराजांनी सिंहासनारोहण करताच वाद्यांचा गजर झाला. दुंदुभी झडल्या, रायगडावर तोफांचा गडगडाट झाला; त्याबरोबर स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरून तोफा कडाडू लागल्या. त्यांनी दशदिशांना गर्जून सांगितले की, मराठ्यांचा राजा सिंहासनावर बसला. सिंहासनारोहणानंतर 16 सुवासिनी व 16 कुमारिका यांनी महाराजांना सोन्याच्या तबकांतून पंचारती केली. यानंतर गागाभट्टांनी मोत्याचा तुरा वर लाविलेला भरजरीचा राजमुकुट हातात घेऊन तो स्वहस्ताने महाराजांच्या मस्तकावर ठेविला व मोत्यांनी झालर लाविलेले रत्नजडित राजछत्र महाराजांच्या मस्तकावर धारण करून उच्च स्वरात शिवाजी महाराज हे छत्रसिंहासनाधीश्वर व संस्कारयुक्त राजे झाल्याचे घोषित केले.

यानंतर गागाभट्ट व इतर ब्राह्मणांनी महाराजांना शुभाशीर्वाद दिला. पंतप्रधान मोरोपंत यांनी महाराजांना मुजरा करून 8000 होनांचा अभिषेक केला. यानंतर प्रत्येक प्रधानाने महाराजांना असाच होनांचा अभिषेक केला. त्यानंतर इतर अधिकार्‍यांचे मुजरे झाले. इंग्लिश, डच, पोर्तुगीज इत्यादी परकीयांच्या वकिलांनी महाराजांना प्रणाम करून नजराणे दिले. लवकरच महाराजांची स्वारी अश्वारूढ होऊन वैभवाने गडावरील देवदेतांचे दर्शन घ्यायला निघाली. काही अंतर गेल्यावर महाराज सुवर्णालंकारांनी सजविलेल्या गजराजावर आरूढ झाले. या गजावर माहूत होते खुद्द सेनापती हंबीरराव ! अंबारीत महाराजांच्या मागे खुद्द पंतप्रधानाने मोरचेल धरले होते. मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने महाराजांनी गडावरील देवतांचे दर्शन घेतले. मार्गावर अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची वृष्टी करण्यात आली. पंचारत्या झाल्या. देवदर्शनानंतर राजसभेत परत येऊन कुलदैवत, मातुःश्री यांना महाराजांनी वंदन केले. यानंतर राज्याभिषेकाचा सोहळा संपला.

महाराजांनी या सोहळ्यासाठी अपार दानधर्म केला. विद्वान पंडित, ब्राह्मण, संत, महंत, तडीतापसी इत्यादींना मुक्त हस्ते दाने दिली. 24 हजार होन केवळ दक्षिणेवर खर्च झाले. गागाभट्टांना 7 हजार होन दक्षिणा देण्यात आली. 7 जून, 1674 रोजी सुरू झालेला दानधर्म पुढे बारा दिवस चालू होता. रायगडाहून कोणीही रिक्त हस्ते परत गेला नाही. या समारंभास सभासदाच्या म्हणण्याप्रमाणे 'एक करोड बेचाळीस लक्ष होन' खर्च आला, तर जदुनाथ सरकारांच्या मते एकंदर खर्च सुमार '10 लक्ष होन' आला असावा.

दुसरा राज्याभिषेक

महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या तीन महिन्यांनी त्यांना आणखी एक छोटासा राज्याभिषेकाचा समारंभ घडवून आणावा लागला. हा समारंभ रायगडावरच झाला आणि त्याच्या सोहळ्याचे पुढारीपण निश्चलपुरी नावाच्या तांत्रिक पंथीय गोसाव्याने केले. निश्चलपुरी हा तंत्रविद्यापारंगत असल्याने त्याचा वेद व वैदिक पद्धतीअनुसार होणार्‍या कार्यावर विश्वास नव्हता. गागाभट्टाने वैदिक पद्धतीअनुसार राज्याभिषेक केला होता. निश्वलपुरीच्या म्हणण्याप्रमाणे त्याने (गागाभट्टाने) तांत्रिक देवदेवतांचे पूजन केले नव्हते. ग्रामदेवता, गृहदेवता, मंडपदेवता, स्थानदेवता, स्तंभदेवता अशा अनेक देवतांचे पूजन झाले नव्हते. गागाभट्टाच्या शास्त्रात त्या देवतांचे पूजन बसत नवह्ते, त्यामुळे छत्रपती महाराजांच्या ठायी ' राजशक्ती' व सिंहासनाच्या ठिकाणी 'देवशक्ती' प्रतिष्ठित करण्यासाठी तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक होणे आवश्यक आहे, असे निश्चलपुरीचे म्हणणे होते.

राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या दहा-बारा दिवसांनीच महाराजंच्या मातु:श्री जिजाबाईसाहेब मृत्यू पावल्या. निश्चलपुरीचे म्हणणे असे की, गागाभट्टाने केलेल्या चुकांमुळेच हे दु:ख महाराजांना सहन करावे लागले. याशिवाय राज्याभिषेकाची तयारी सुरू झाल्यापासून संकटे महाराजांवर कोसळत होती, असे निश्चलपुरीचे म्हणणे होते. उदाहरणार्थ, फेब्रुवारी 1674 मध्ये स्वराज्याच्या सेनापती प्रतापराव गुजर रणांगणी ठार झाला. मार्च 1674 मध्ये महाराजांच्या राणीसाहेब काशीबाई मृत्यू पावल्या. ही मृत्यूंची संकटे झाली. याशिवाय अनेक अपशकुनही घडून आले. राज्याभिषेकानंतर महाराजांनी राजगृह सोडताच एक लाकडाचा तुकडा गागाभट्टाच्या नाकावर पडला. युवराज संभाजीराजांच्या गळ्यातील कंठ्यातून दोन मोती गहाळ झाले; महाराज तलवारीची पूजा करीत असता ती म्यानातून खाली पडली. मंत्री दत्ताजी त्र्यंबक पाय घसरून खाली पडला; राज्याभिषेकानंतर काही दिवसांनीच प्रतापगडावरील देवीच्या मंदिरास आग लागली व कित्येक घोडे व हत्ती जळून मेले. निश्चलपुरीचे म्हणणे असे की, गागाभट्टाने कुयोगावर राज्याभिषेक केला आणि अनिष्ट ग्रह बलवत्तर असता तो केला म्हणून हे असे झाले.

खरे म्हणजे गागाभट्ट व इतर वैदिक ब्राम्ह्मण यांच्या हातून हा सोहळा झाला व त्यांनाच भली मोठी दक्षिणा महाराजांकडून मिळाली, याचीच असूया निश्चलपुरीला वाटत होती. एकट्या गागाभट्टास महाराजांनी सात हजार होन दक्षिणा दिली. त्यावेळी रायगडावर हजर असणार्‍या निश्चलपुरीच्या शिष्यांना मात्र या विद्वान ब्राह्मणांनी हुसकावून लावले. निश्चलपुरीला हा खरा राग होता. म्हणून तो गागाभट्टाच्या चुका व मागची-पुढची संकटे व अपशकुन यांचा पाढा वाचत होता. वास्तविक प्रतापराव गुजराचा व काशीबाईचा मृत्यू राज्याभिषेकापूर्वीचा होता, तसेच खुद्द जिजाबाई वार्धक्याने एवढ्या थकल्या होत्या की, त्या 'पिकल्या पाना' चे स्वर्गाराहेण हे संकट मानण्याचे काही कारण नव्हते, तसेच गागाभट्टाने वैदिक पद्धतीने केलेल्या राज्याभिषेकानंतर प्रतापगडावरील मंदिरास आग लागली हे खरे; परंतु निश्चलपुरीच्या तांत्रिक राज्याभिषेकानंतर त्याच मंदिरावर वीज कोसळी त्याचे काय ?

निश्चलपुरीच्या अंतरीचा हेतू कोणता आहे, हे जाणण्याइतपत महाराज हुशार होते, ते अंधश्रद्धाळू नव्हते, तथापि, एक मुत्सद्दी होते. त्यांना आपल्या धर्मातील सर्व संत, महंत, तांत्रिक, मांत्रिक, पंडित इत्यादींना आपल्या राज्याभिषेकासंबंधी समाधानी ठेवावयाचे होते म्हणूनच त्यांनी निश्चलपुरीच्या तांत्रिक राज्याभिषेकास संमती दिली व तांत्रिक सोहळा घडवून आणला. अशाप्रकारे वैदिक पंडितांना वैदिक पद्धतीअनुसार राज्याभिषेक करावयास मिळाला व तांत्रिकांना तांत्रिक पद्धतीअनुसार तो करावयास मिळाला. सारांश, विविध पंथांची माणसे याबाबतीत समाधानी असली पाहिजेत, कोणीही काही आशंका मनात ठेवता कामा नये, हाच त्यांचा दुसर्‍या राज्याभिषेकास संमती देण्यामागे हेतू असावा, असे वाटते.

राज्याभिषेकाचे हिंदुस्थानच्या इतिहासातील स्थान

कृष्ण नृसिंहासारख्या मूढ पंडितांनी 'या जगात क्षत्रियच नाहीत, मग हिंदूंच्यामध्ये राजा कसा निर्माण होऊ शकेल,' असा अपसमज व न्यूनगंड हिंदू समाजात पसरविला होता. या न्यूनगंडाविरुद्ध महाराजांना झगडावे लागले व खुद्द क्षत्रिय असतानाही हे सिद्ध करण्यासाठी खटाटोप करावा लागला; त्यात ते यशस्वी झाले. राज्याभिषेकाने हे आता जाहीर करण्यात आले की, क्षत्रिय नाहीसे झालेले नाहीत; ते जिवंत आहेत व ते राज्यसंस्था निर्माण करू शकतात. समस्त हिंदू समाजाला दिलासा व चैतन्य देणारी ही घटना होती. सर्व हिंदुस्थानावर इस्लामी वर्चस्व निर्माण झाले असता, त्याविरुद्ध महाराजांनी बंडाचा झेंडा उभारला आणि ते वर्चस्व झुगारून देण्यात ते यशस्वी झाले.

या इस्लामी लाटेपुढे यादवांचे सामर्थ्यशाली साम्राज्य हतबल होऊन नष्ट झाले होते, विजयनगरचे साम्राज्यही शेवटी नाश पावले होते आणि हिंदू समाजास एक प्रकारची अवकळा प्राप्त झाली होती. चैतन्यहीन गोळ्यासारखा हिंदू समाज पडून होता, त्यात शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाने चैतन्य भरले, जिवंतपणा आणला. हिंदूंचे राजपद निर्माण केले. आपल्या समाजाला उन्नत केले. महाराजांनी स्थापन केलेले राज्य केवळ मराठ्यांनाच प्रेरक ठरणारे होते असे नाही, तर इस्लामी वर्चस्वाखाली राहणार्‍या इतर प्रांतांतील असंतुष्ट प्रजेसही ते प्रेरक ठरणारे होते. इस्लामी सत्तेला यशस्वीपणे आव्हान देणारी हिंदूंची एक सामर्थ्यशाली सत्ता म्हणून हिंदुस्थानातील सर्व जाती-जमाती महाराजांच्या राज्याकडे आता पाहू लागल्या.

महाराजांचे राज्य म्हणजे जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांचे राज्य नव्हते, एवढेच नव्हे तर ते आदिलशाहीसारखेही राज्य नव्हते. कारण, जावळीचा चंद्रराव हा नावाचाच 'राजा' होता व आदिलशाही सुलतानाने आता मुगलांचे स्वामित्व स्वीकारले होते. महाराजांनी स्थापन केलेले राज्य हे स्वतंत्र होते. ते सार्वभौम होते. ते विशाल अथवा अफाट नसेल; पण ते कुणाचेही स्वामित्व मानत नव्हते, हे विशेष आहे. राज्याभिषेकाने अशा राज्याची राज्यशास्त्रीय व धर्मशास्त्रीयदृष्ट्या खरी स्थापना झाली. राज्याभिषेकामधील हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराजांची सर्वांत मोठी कर्तबगारी हीच आहे. या कर्तबगारीचा खरा आविष्कार राज्याभिषेकामध्ये दिसून येतो.

राज्याभिषेकाच्या संदर्भात आणखी एका घटनेची आठवण केली पाहिजे की, महाराजांचे वडील शहाजीराजांच्या ठिकाणी स्वतंत्र शाही निर्माण करण्याचे सामर्थ्य होते, त्याप्रमाणे त्यांनी स्वतंत्र निजामशाही निर्माणही केली. अल्पवयाच्या निजामशहाला मांडीवर घेऊन स्वतंत्र शाहीचा पुकारा त्यांनी केला; परंतु स्वत:स राज्यभिषेक करून घेतला नाही; परिस्थितीमुळे म्हणा किंवा त्यांच्या विचारसरणीच्या मर्यादेमुळे म्हणा, त्यांना ते शक्य झाले नाही. महाराजांचे कार्य यापुढचे आहे. त्यांनीही शाही निर्माण केली; पण स्वत:ची शाही निर्माण केली, दुसर्‍यांची- परक्याची नाही. राज्याभिषेकाचे खरे महत्व हे आहे.

राज्याभिषेकाने महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कार्यावर कळस चढविला गेला. घटनात्मकदृष्ट्या खर्‍या अर्थाने स्वातंत्र सार्वभौम राज्य निर्माण होऊन त्याची घटना तयार झाली. अष्टप्रधानमंडळ हे घटनेचे मुख्य अंग होते. आष्टप्रधानापैकी काहींच्या नेमणूका यापुर्वीच झाल्या असल्या तरी आता त्या संस्कृत नावानिशी राज्याचे एक अंग म्हणून स्थिर झाल्या. महाराजांनी पेशव्यास 'पंतप्रधान', मुजुमदारास 'अमात्य' अशी संस्कृत नावे देऊन फारसी भाषेचे अतिक्रमण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. खुद्द स्वत:साठीसुद्धा 'विक्रमादित्य' अशा प्रकारचे बिरूद न घेता ते 'छत्रपती' असे घेतले. त्याचा अर्थ छत्र धारण करणारा राजा; या छत्राखाली सर्व प्रजेला न्यायाने व धर्माने वागविले जाईल, तिचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन या पदवीत आहे म्हणून ती पदवी घटनात्मकदृष्ट्या अधिक सार्थ आहे. महाराजांनी या समारंभाचे ऐतिहासिक महत्व चिरकाल राहावे, यासाठी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक सुरू करणे म्हणजे सामान्य बाब नाही. शक सुरू करणे म्हणजे नवे युग सुरू करणे. अखिल हिंदू समाजात व हिंदवी राजकारणात या राज्याभिषेकाने नवे युग सुरू झाले आहे, हेच महाराजांना या शकाच्या निमिर्तीने घोषित करावयाचे होते. हा घटनात्मक बदल महत्वाचा आहे. तसेच स्वतंत्र राज्याचे चलनही स्वतंत्र असेच पाहिजे म्हणून महाराजांनी आपल्या राज्याची नवी नाणी पाडावयास सुरूवात केली. तांब्याचा पैसा, शिवराई व सोन्याचा शिवराई होन ही महाराजांची नवीन नाणी या वेळी प्रचारात आली.

महाराजांच्या राज्यकारभारात राज्याभिषेकाने नवे पर्व सुरू झाले. धर्मशास्त्रानुसार जे कायदे योग्य होते. ते तसेच ठेवले गेले. काही नवे केले गेले. या कायद्यांचे स्वरूप मुलकी, लष्करी, धर्मविषयक व न्यायविषयक असे होते. पूर्वीची लेखनपद्धती मुसलमान धाटणीची होती. ती बदलून महाराजांनी मराठी धाटणीची लेखनपद्धती निर्माण केली. त्यासाठी महाराजांच्या अज्ञेने बाळाजी आवजी चिटणीस या हुशार चिटणिसाने लेखनप्रशस्ती नावाचा ग्रंथ लिहिला, तसेच मराठी भाषेचा राज्यकारभारात अधिकाधिक पुरस्कार करण्यात आला. मराठी भाषेवरील फारसीचे अतिक्रमण दूर करण्यासाठी रघुनाथ पंडिताने महाराजांच्या अज्ञेवरून राज्यव्यवहारकोश निर्माण केला आणि राज्यकारभारातील फारसी नावांना संस्कृत नावे रूढ केली.
( शिवराज्याभिषेक : भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या ग्रंथामधून साभार.)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news