

भारतीय लष्कराच्या भात्यात ‘नागास्त्र-1’ हे स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन समाविष्ट झाले आहे. लक्ष्याभोवती घिरट्या घालत त्याचा वेध घेणारी हवाई शस्त्र प्रणाली, अशी ‘नागास्त्र-1’ची साधी, सोपी ओळख सांगता येईल. एकदा लक्ष्य सापडले की, ते त्याच्यावर धडकून विस्फोट घडवते. नागास्त्रची रचना हे त्याचे बलस्थान आहे. लक्ष्य न सापडल्यास नियोजित हल्ला रद्द करून ते आपल्या तळावर परतू शकते. हवाई छत्रीच्या मदतीने जमिनीवर त्याचे अवतरण करता येते. अतिशय कमी आवाजामुळे शत्रूला त्याचा माग काढणे अवघड होते.
बदलत्या काळानुसार युद्धपद्धतींमध्येही बदल झाले आहेत. आधुनिक काळातील युद्धे ही नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने लढली जात आहेत. यामध्ये ड्रोन अर्थात अनमॅन्ड एरियल व्हेईकल्सना प्रचंड महत्त्व आले आहे. काही आठवड्यांपूर्वी इराणने इतिहासात प्रथमच इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची जगभरामध्ये चर्चा झाली. या हल्ल्यामध्ये ड्रोन क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता. त्यापूर्वी अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील युद्धामध्येही ड्रोनचा वापर करण्यात आला होता. भारताचा पारंपरिक शत्रू असणारा पाकिस्तान हा ड्रोनच्या माध्यमातून पंजाब आणि काश्मीर या भागामध्ये शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ पाठवून दहशतवाद पसरवण्याचे तसेच अंतर्गत सुरक्षेला आव्हान देण्याचे काम करत आहे. दुसरीकडे ड्रोन या संकल्पनेवर आधारित आधुनिक अस्त्रेही आता विकसित होऊ लागली आहेत. अलीकडेच ‘नागास्त्र-1’ हे स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल झाले आहे. या ड्रोनची स्ट्राईक रेंज 30 कि.मी. आहे आणि ते दोन किलो दारूगोळा वाहून नेण्यास सक्षम आहे. या नव्या अस्त्रामुळे लष्कराची मारक क्षमता वाढणार आहे. हे ड्रोन सोलर इंडस्ट्रीज नागपूरच्या इकॉनॉमिक्स एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड युनिटने बनवले आहेत. लष्कराने सोलर इंडस्ट्रीजला 480 आत्मघाती ड्रोनची ऑर्डर दिली होती. यापैकी त्यांनी 120 ड्रोन लष्कराला दिले आहेत. या ड्रोनमुळे शत्रूच्या प्रशिक्षण केंद्राला लक्ष्य करून त्यावर हल्ला चढवणे शक्य होणार आहे. त्यामुळे सैनिकांच्या जीवाला असणारा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. हे ड्रोन हवेत आपल्या ‘टार्गेट’च्या आजूबाजूला फिरून आत्मघातकी हल्ला करतात. सेन्सर बसवलेले हे ड्रोन 1200 मीटर उंचीपर्यंत नेले जाऊ शकते. नागास्त्रचे वजन 12 किलो असून 2 किलो स्फोटके नेण्याची त्याची क्षमता आहे. हे ड्रोन एक तास हवेत राहू शकतात. तसेच ‘टार्गेट’ न मिळाल्यास हे ड्रोन परत येतात किंवा पॅराशूटच्या सहाय्याने त्यांचे लँडिंग केले जाऊ शकते. हे ड्रोन विशिष्ट प्रकारच्या स्टँड अथवा हातानेही मार्गक्रमित करता येते. जीपीएसने सज्ज असलेले हे ड्रोन दोन मीटरच्या अचूकतेने लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे.
चार महिन्यांपूर्वी अमेरिकेने भारताला 31 एमक्यू 9 बी ड्रोन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची किंमत सुमारे 3.99 अब्ज डॉलर्स आहे. चीन आणि भारताच्या सागरी सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (ङअउ) पाळत ठेवण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जाईल. हे ड्रोन सुमारे 35 तास हवेत राहू शकतात. हे पूर्णपणे रिमोट कंट्रोल्ड आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्यादरम्यान या कराराची घोषणा करण्यात आली होती. नागास्त्रचे वैशिष्ट्य म्हणजे या ड्रोनमध्ये 75 टक्क्यांहून अधिक देशी सामग्री आहे. या ड्रोनच्या समावेशामुळे सीमेपलीकडे शत्रूच्या गुप्त ठिकाणांवर हल्ले करण्याची भारतीय लष्कराची क्षमता वाढेल. त्यामुळे अशा हवाई शस्त्र प्रणालीवरील परकीय अवलंबित्व कमी होणार आहे. कारण यापूर्वी सैन्याला परदेशातून बरीच किंमत मोजून ती खरेदी करावी लागली आहेत.
‘नागास्त्र’चे वर्णन सायलेंट किलर असेही केले जाते. या ड्रोनना आत्मघाती ड्रोन म्हणण्याचे कारण म्हणजे शत्रूचे कोणतेही वाहन आपल्या क्षेत्रात चाल करून आल्यास हे ड्रोन त्याच्यावर आदळते आणि स्वतःसह त्याचाही नाश करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4500 मीटर इतक्या उंचीवर उड्डाण करण्याच्या क्षमतेमुळे शत्रूच्या रडार यंत्रणांना ते शोधणे कठीण होते. परिणामी हे ड्रोन शत्रूच्या प्रदेशात पाठवून त्यांना थांगपत्ताही न लागू देता निर्धारित लक्ष्यपूर्ती करू शकते. एप्रिल 2023 मध्ये माणेकशॉ सेंटरमध्ये हे ड्रोन पहिल्यांदा दाखवण्यात आले होते. या ड्रोनमध्ये रात्रंदिवस निरीक्षणासाठी पाळत ठेवणारे कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासही हे ड्रोन सक्षम आहे.
2020 मध्ये नागोर्नो-काराबाख यांच्यातील संघर्षाने पारंपरिक रणांगणात ड्रोनचे महत्त्व अधोरेखित केले. या युद्धाच्या पहिल्या काही तासांमध्ये अझरबैजानच्या ड्रोन्सनी सुमारे 50 टक्के आर्मेनियन एअर डिफेन्स प्रणाली आणि जवळपास 40 टक्के तोफखाने नष्ट केले होते. हवाई क्षेत्रावर नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर, अझरबैजानच्या यूएव्हीने आर्मेनियन ग्राऊंड फोर्सना लक्ष्य केले. रशिया-युक्रेन युद्धात पाळत ठेवण्यासाठी तसेच स्ट्राईकसाठी ड्रोनच्या वापरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ड्रोनची ऑपरेशनल क्षमता वाढविण्यासाठी रशियन आणि युक्रेनियन सैन्याने ज्या प्रकारे अख चा वापर केला आहे त्यामुळे ड्रोन युद्धाला एका नवीन स्तरावर नेले आहे.
ड्रोनचा युद्धपद्धतीतील वापर हा संरक्षणसिद्धतेला भक्कम बनवणारा तर आहेच; पण त्याचबरोबरीने तो संरक्षणावर होणार्या आर्थिक खर्चाच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. कारण चौथ्या आणि पाचव्या पिढीतील विमाने आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसाठी अब्जावधी डॉलर्स मोजावे लागतात. त्या तुलनेत मानवरहित ड्रोन्ससाठी अत्यंत कमी खर्च येतो. तसेच त्यांची परिणामकारकता, भेदकताही अधिक ठरू शकते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यामुळे देशाच्या रक्षणात मोलाची भूमिका बजावणार्या सैनिकांचे बळी जाण्याचा धोका नसतो. हे लक्षात घेऊनच भारतासह सर्वच देश आज विविध प्रकारच्या ड्रोन्सचा विकास आणि वापर करण्यावर भर देत आहेत. नागास्त्र-1 ची देशांतर्गत साहित्याद्वारे झालेली निर्मिती ही भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या निर्यातीलाही सहाय्यभूत ठरू शकते. आज ‘ब्राह्मोस’सारखे मिसाईल आणि अन्य संरक्षण साधनसामग्री निर्यात करून भारत संरक्षण क्षेत्राच्या जागतिक बाजारपेठेमध्ये सहभागी झाला आहे. येणार्या काळात संरक्षण क्षेत्रातील निर्यात दहा हजार कोटींच्या पुढे नेण्याचा संकल्प केंद्र सरकारने ठेवला आहे. त्यादृष्टीने नागास्त्रसारख्या स्वदेशी बनावटीच्या ड्रोन्सच्या निर्मिती आणि निर्यातीवर येणार्या काळात निश्चितपणे लक्ष देता येईल.
आजघडीला भारत हा जागतिक आर्थिक सत्ता म्हणून उदयास येत असताना दक्षिण आशियातील शेजारी देशांमध्ये चीनकडून सुनियोजितपणे भारतद्वेष वाढवण्याचे काम सुरू आहे. पाकिस्तानने मोदी 3.0 सरकार स्थापन झाल्यापासून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया अधिक जोमाने सुरू केल्या आहेत. एलएसीसह अरुणाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये चीनच्या कुरापतींची टांगती तलवार आजही कायम आहे. या सर्व तणावाच्या परिस्थितीमध्ये भारताने आपली सामरिक सज्जता वृद्धिंगत करणे अपरिहार्य आहे. त्यादृष्टीने नागास्त्र-1 सारखी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.