वाढत्या वयाबरोबर जगण्याचा गुंता वाढवायचा नसेल, वयाची साठी ओलांडल्यावरही छान, हसत खेळत राहायचं असेल, तर आपण काय खातो, काय पितो याकडं अगदी लहानपणापासूनच लक्ष देणं आवश्यक आहे. बालपणातच घरी बनवलेलं, चांगलं, पोषण करणारं खाण्याची सवय असली, तर त्यामुळं शरीर दणकट बनतंच; पण म्हातारपणही सुखाचं होतं. हातपाय धड राहतात. डोकं शाबूत राहतं. नवीन सिनेमा पाहण्याची, नवीन पुस्तक वाचण्याची, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याची, हसत खेळत राहण्याची वृत्ती कायम राहते.
गंमत अशी आहे की, आपल्याला अनेक गोष्टी माहीत असतात. त्या गोष्टी आपल्या हिताच्या आहेत, फायद्याच्या आहेत, आपलं भलं करणार्या आहेत, हेसुद्धा माहीत असतं. ‘जसा आहार, तसं आरोग्य’ हेसुद्धा ठाऊक असतं. पण तरीही या सर्व गोष्टी नजरेआड केल्या जातात आणि आपण आपल्याला पाहिजे तसंच वागतो. याचं कारण तसं वागणं आपल्या सोयीचं असतं. आता हेच बघा ना, शाळांमध्ये जाणार्यांच्या डब्यात पूर्वी घरीच केलेली पोळी, चपाती किंवा भाकरी आणि भाजी किंवा घट्ट डाळ, पिठलं किंवा झुणका असायचा. पण काळ बदलला, तोंडाच्या चवीसुद्धा पालटल्या. ‘फास्ट फूड’चे दिवस आले. त्याचीच आपल्याला सवय लागली. मुंबईसारख्या महानगरात आणि त्याच्या आसपासच्या शहरांत आता डब्यात घरचं बनवलेलं क्वचितच असतं. डोनेटस्, बर्गर, पिझ्झा वगैरे असतं. कित्येकजण शाळेत जाताना लहान हॉटेलातून इडली किंवा मेदूवडा घरून आणलेल्या आपल्या डब्यात घेतात आणि शाळेत जातात. कित्येकदा अशा मुला-मुलींबरोबर त्यांच्या आयासुद्धा असतात! याचे परिणाम त्या शाळकरी मुला-मुलींच्या आरोग्यावर होत असतात. होणारे परिणाम लगेचच दिसले नाहीत, तरी त्यांचा शरीरावर व्हायचा तो वाईट परिणाम होत असतोच. अनेकदा त्याचे दुष्परिणाम उशिरानं दिसू लागतात.
म्हणजे वयाची साठी ओलांडली, समोरची एसटीची गाडी सुटणार आहे हे दिसत असतानाही धावायचं आपण टाळायला लागलो, संध्याकाळी उगाचंच उदास वाटायला लागलं की ते लक्षात येतात. नवीन काही करण्याची इच्छाच होत नाही. मित्रमंडळींमध्ये रमावंसं वाटत नाही. मनमुराद भटकण्याची आस उरत नाही. असं सपक जगणं आपल्या वाट्याला येऊ नये असं वाटत असेल, तर त्याची काळजी अगदी लहानपणापासूनच घ्यायला लागते. बालपणातच घरी बनवलेलं, चांगलं, पोषण करणारं खाण्याची सवय असली, तर त्यामुळं शरीर दणकट बनतंच; पण म्हातारपणही सुखाचं होतं. हातपाय धड राहतात. डोकं शाबूत राहतं. नवीन सिनेमा पाहण्याची, नवीन पुस्तक वाचण्याची, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याची, हसत खेळत राहण्याची वृत्ती कायम राहते. ‘आता काय बाबा, वय झालं! आता हे असंच होणार!!’ असं बोलण्याचं मनातसुद्धा येत नाही. मात्र त्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयी अगदी पहिल्यापासूनच चांगल्या असण्याची गरज आहे आणि हे आता एका बरीच वर्षं करण्यात आलेल्या एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
हा अभ्यास इंग्लंडमध्ये करण्यात आला आहे. पण त्याचे निष्कर्ष मात्र फक्त त्याच देशातल्या लोकांसाठी नाहीत, तर सर्वांसाठीच उपयोगी पडणारे आहेत. ते निष्कर्ष असं सांगतात की, अगदी पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासूनच चांगलं खाण्याची सवय लागली आणि आयुष्यभर ती पाळली, तर वयाच्या 70 वर्षांनंतरसुद्धा मनानं अगदी ताजेतवाने राहण्यासाठी, डोकं नीटपणं काम करत राहण्यासाठी ती सवय उपयोगी पडते. इंग्लंडमधल्या 3059 लोकांची पाहणी केल्यानंतर संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. हा निष्कर्ष अतिशय महत्त्वाचा आहे, याचं कारण हा अभ्यास थोडीथोडकी नाहीत, तर 70 वर्षं करण्यात आला आहे. म्हणजे या पाहणीत ज्या लोकांचा समावेश केला होता, ते सर्व लोक त्यांच्या वयाच्या चार वर्षांचे असतानापासूनच त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीचा, त्यांच्या जीवनशैलीचा माग ठेवण्यात आला होता. या लोकांची अशी कसून पाहणी या संशोधकांनी केली आणि म्हणूनच ते आता म्हणत आहेत की, पहिल्यापासूनच चांगलं, सकस खाणार्या लोकांना, वाढत्या वयानुसार होऊ शकणार्या अल्झायमर्स आजारानं गाठण्याचा धोका खूपच कमी असतो. इतकंच नाही, तर माणूस जसजसा म्हातारा होत जातो, तसतसा त्याच्या आकलनक्षमता कमी होऊ लागण्याचा धोका असतो. पण बालपणापासूनच सकस खाणार्यांच्या बाबतीत असं होण्याची संभाव्यतासुद्धा कमी असते.
आता काहीजणांच्या बाबतीत असंही होऊ शकतं की, लहानपणी परिस्थितीमुळं त्यांना आवश्यक तेवढं चांगलं अन्न मिळत नाही. पण अशी माणसं शिकली, नोकरीला लागली, त्यांचा आर्थिक काच कमी झाला आणि त्यांनी घरी बनवलेलं सकस अन्नच खायला सुरुवात केली, तरीही त्याचा त्यांना फायदा होतो, असंही या अभ्यासात दिसून आलं आहे. मात्र वयाची चाळिशी ओलांडायच्या आतच पुरेसा सकस आहार घ्यायला लागण्याची सुरुवात करायला हवी, असं संशोधकांचं म्हणणं आहे. ते केलं नाही, तर 65 वर्षांचं वय होऊन गेलं की आकलनक्षमता कमी व्हायला लागतात. नवीन काही वाचावं, पाहावं, ऐकावं अशी इच्छाच जणू मरून जाते. एकाच पद्धतीनं आलेला दिवस जावा, असं वाटायला लागतं. ते टाळायचं तर वयानं चाळिशीचा टप्पा गाठायच्या आतच खाण्याच्या सवयींमध्ये चांगला, हितकारक बदल करणं आवश्यक आहे. याच पाहणीत असंही दिसून आलं की, ज्यांना वर्षानुवर्षं चांगलं खायला मिळालं नाही, त्यांच्यापैकी आठ टक्के लोकांच्या आकलनशक्तीवर वाढत्या वयाचा काहीही वाईट परिणाम झालेला नाही! तर सतत उत्तम आहार घेणार्या लोकांतील सात टक्के लोकांच्या मात्र आकलनशक्ती कमी झालेल्या आहेत! असं का होतं याचा आता अभ्यास करण्यात येणार आहे.
दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, काही जणांच्या बाबतीत सकस खाणं शक्यच होत नाही. त्याला अनेक कारणं असू शकतात. पण कारणं काहीही असली, तरी परिणाम तोच असतो. यासंदर्भात आपल्या देशाचा विचार केला, तर असं दिसतं की, विविध क्षेत्रांमध्ये आपल्या देशानं चांगली प्रगती केली असली, तरी देशात सर्वांनाच पुरेसं सकस अन्न मिळत नाही. त्यामुळंच कुपोषणाचा प्रश्न सुटलेला नाही. आकडेवारी असं सांगते की, आज घटकेस देशात 43 लाख बालकं कुपोषित आहेत. त्यातील 14 लाख तर अतिकुपोषित म्हणता येतील अशी आहेत. ही अर्थातच अतिशय वाईट गोष्ट आहे. या कुपोषित मुलांचं भविष्य काय असेल, असा विचार करायला लागलं तरी आपलं काळीज पिळवटून जातं. एका बाजूला लग्न, वाढदिवस, स्नेहसंमेलन अशा ठिकाणी अन्नाची प्रचंड नासाडी होत आहे आणि त्याचवेळी आपल्याच समाजात ज्यांना पुरेसं सकस अन्न मिळत नाही, अशी लाखो माणसं आहेत. लहान मुलं आहेत. खाण्या-पिण्याच्या वयातच जर अन्न पुरेसं मिळालं नाही, तर त्याचा दुष्परिणाम पुढच्या सर्व आयुष्यावर होतो. यासंदर्भात युनिसेफ या संस्थेनं केलेल्या पाहणीत असं दिसून आलं आहे की, जगातल्या दर चार मुलांपैकी एका मुलाला चौरस आहारच मिळत नाही. याच संस्थेनं वय वर्षं पाचपर्यंतची मुलं काय खातात, याचाही एकंदर 100 देशांमध्ये शोध घेतला. तेव्हा उभं राहिलेलं चित्र धक्कादायक आहे. म्हणजे असं की, या देशातल्या एकंदर मुलांपैकी 18 कोटी बालकांना दूधभात (किंवा दूध आणि मका किंवा गहू यांच्यापासून बनवलेला पदार्थ) याशिवाय दुसरा पदार्थच खायला मिळत नाही! युनिसेफनं याला ‘अन्नाची अतिगरिबी’ असं म्हटलं आहे. इतकंच नाही, तर ही सारी मुलं आज एका धोकादायक अशा कड्याच्या काठावर उभी आहेत. चौरस आहार मिळत नसल्यानं त्यांच्या एकंदर वाढीवर वाईट परिणाम होणार आहेत. या मुलांपैकी कितीजणांना वयाची 30 वर्षं ओलांडता येईल, सांगता येत नाही. जे तग धरून राहतील, त्यांच्या शरीराची एकंदर वाढ खुरटलेलीच राहील. सगळ्यात महत्त्वाची आणि काळजी वाटावी अशी गोष्ट म्हणजे त्यांच्या मेंदूचा विकासही नीट होणार नाही!
अन्नाची गरिबी ही पुरेसा पैसा हाती नसल्याचाच परिणाम आहे, याबाबत शंका नाही. मात्र युनिसेफ म्हणते की, कोव्हिडची महामारी, हवामानात होत असलेले घातक बदल आणि जगातल्या अनेक ठिकाणी होत असलेल्या हिंसात्मक चकमकी यामुळं अन्नधान्याचे भाव सतत चढतेच राहिले आहेत. साहजिकच मर्यादित उत्पन्न असणार्या कुटुंबांची पंचाईत होत आहे. मात्र याबरोबरच पोषणमूल्यं नसलेले अन्नपदार्थ प्रचंड प्रमाणात सहजपणाने मिळत आहेत आणि तेच खाल्ले जात आहेत, हेसुद्धा नजरेआड करता कामा नये. असे पदार्थ खाण्यात फायदा काहीच नाही; उलट दूरवरचा विचार करता ते अपायकारकच आहेत, याची जाणीवच मुळी अनेक लोकांना नसते. त्यामुळं ते आपल्या मुलांना खुशाल असे पदार्थ खायला देतात. या मुलांच्या आयुष्याशी आपण खेळत आहोत, याची जाणीवच नसणं, ही किती भयंकर गोष्ट आहे! पण ती आहे, हे मान्य करायला हवं. या सार्याचं सार काय? तर वाढत्या वयाबरोबर जगण्याचा गुंता वाढवायचा नसेल, वयाची साठी ओलांडल्यावरही छान, हसत खेळत राहायचं असेल, तर आपण काय खातो, काय पितो याकडं अगदी लहानपणापासूनच लक्ष देणं आवश्यक आहे. याचं कारण, ‘चांगलं खाणार, तोच दणक्यात राहणार’, हेच खरं!