घातक विळख्यात तरुणाई

तरुणाईच्या भविष्यावर घातक व्यसनांचे सावट
drug abuse on children
नशेच्या विळख्यात अडकलेली तरुण पिढी.Pudhari File Photo
Published on
Updated on
मुक्ता पुणतांबेकर

पुण्यातील ‘हीट अँड रन’ प्रकरणामुळे आणि पोलिसांच्या छाप्यात सापडलेल्या अमली पदार्थांच्या मोठ्या साठ्यांमुळे समाजामध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. व्यसनाधीनता हा एक आजार आहे, हे मुळात लक्षात घ्यायला हवे. त्याचबरोबर समाजामध्ये व्यसनांना लाभलेली प्रतिष्ठा कमी होणे गरजेचे आहे. पालकांचा सुसंवादही यामध्ये महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांगीणद़ृष्ट्या या प्रश्नाकडे, समस्येकडे पाहणे आवश्यक आहे.

पुण्यामध्ये सापडलेल्या ड्रग्जच्या साठ्यांमुळे आणि अलीकडील काळात घडलेल्या काही घटनांमुळे समाजामध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे. अलीकडील काळात याबाबतची चिंतेची बाब म्हणजे, व्यसनासाकडे ओढले जाण्याचा किंवा अमली पदार्थांच्या आहारी जाण्याचा वयोगट कमी होत आहे. ‘मुक्तांगण’मध्ये पूर्वी 30 वर्षांपुढचे रुग्ण अधिक प्रमाणात येत असत. आता 13-14 वर्षांपासून ते पंचविशीपर्यंतचे रुग्ण वाढत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, पूर्वी व्यसन हे प्रामुख्याने मुलांमध्ये दिसायचे; आता मात्र मुलींमध्येही व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. या मुलांशी चर्चा केली असता असे लक्षात येते की, सिगारेट ओढणे, दारू पिणे, ड्रग्ज घेणे या सर्वाला आता खूप सोशल अ‍ॅक्सेप्टन्स किंवा सार्वजनिक मान्यता मिळू लागली आहे आणि ही सामाजिकद़ृष्ट्या अत्यंत चिंतेची बाब आहे. पूर्वी दारू पिणार्‍या माणसाकडे पाहण्याचा लोकांचा द़ृष्टिकोन नकारात्मक असायचा; पण आता याउलट स्थिती दिसते. जो दारू पीत नाही तो काही तरी चुकीचे करतोय किंवा पुढारलेल्या जगापासून लांब आहे, असा द़ृष्टिकोन आज मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.

drug abuse on children
Delhi liquor scam : केजरीवालांना दिलासा नाहीच, काेठडीत १२ जुलैपर्यंत वाढ

माझे बाबा डॉ. अनिल अवचट नेहमी असे म्हणायचे की, पूर्वी घर बांधल्यानंतर आमचे देवघर कसे आहे, हे येणार्‍या पाहुण्या-रावळ्यांना दाखवले जात असे. आज हॉलमध्येच आम्ही बीअरबार कसा तयार केला आहे, हे दाखवले जाते. याचे कारण व्यसनाला खूप प्रतिष्ठा आलेली आहे. मुले ही बाब लहानपणापासून पाहत असतात. त्यामुळे त्यांच्या मनातही व्यसनाचे आकर्षण लवकरच निर्माण होऊ लागले आहे. मनोरंजनाचे माध्यम म्हणून आपण चित्रपट, मालिका पाहिल्यास त्यामधील नायक दारू पिऊन पार्टी करताना दाखवले जातात. पूर्वीच्या काळच्या चित्रपटात खलनायक दारूडा असायचा. आता एखाद्या हीरोला आनंद झाला की, तो दारू पिऊन पार्टी करतो किंवा खूप दु:ख झाले, प्रेमभंग झाला की, तो मद्यपान करून आपले दुःख शमवण्याचा प्रयत्न करतो, असे दाखवले जाते. यातून समाजामध्ये विशेषतः मुलांमध्ये चुकीचा संदेश जातो. आनंद झाल्यास एन्जॉय करण्यासाठी दारू प्या आणि दुःख झाल्यास ते विसरण्यासाठी दारू प्या, हा उघडउघड संदेश आज सिनेमा आणि मालिकांमधून दिला जातोय. इतकेच नव्हे, तर गेल्या दशकभरातील चित्रपटांमध्ये नायिकाही सर्रास मद्यपान करताना दाखवल्या जातात. सिनेमातील नायक-नायिकांचे तरुण पिढीमध्ये- मुला-मुलींमध्ये मोठे आकर्षण असते. बरेचदा ते आयडॉल किंवा आदर्श असतात. या कलाकारांच्या फॅशन कशा आहेत, त्यांचे राहणीमान कसे आहे, त्यांची बोलण्याची पद्धत कशी आहे, ते गाड्या कोणत्या वापरतात, त्यांची घरे कशी आहेत, या सर्वाचे तरुणाई अनुकरण करत असते. अशावेळी हेच नायक-नायिका जर दारू पिणारे असतील, सोशल मीडियावरील त्यांच्या घरांच्या छायाचित्रांमध्ये दारूचे ग्लास आणि बाटल्या दिसत असतील, तर त्याचा किशोरवयीनांवर, तरुण पिढीवर परिणाम होणे स्वाभाविक असते.

drug abuse on children
मान्सूनचा जोर वाढणार! देशातील 'या' भागाला मिळणार दिलासा

पूर्वीच्या काळी घरामधील पुरुष दारू पीत असत, अशी ढोबळमानाने स्थिती होती. आता बायकांमध्येही हे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत आहे. बालवयातील मुलांमध्ये यातून कोणता संदेश जात असेल? विविध पालकांशी बोलताना असे लक्षात येते की, मुलांना या गोष्टीचे आकर्षण वाटू नये किंवा त्यांनी बाहेर जाऊन काही करू नये, यासाठी आम्ही घरीच त्यांना हे एण्ट्रोड्युस करतो. मुलगा मोठा झाला, त्याची दहावीची परीक्षा झाली की, त्याला बीअरची टेस्ट दिली जाते आणि त्याला सांगितले जाते की, तू बाहेर जाऊन पिऊ नको. आपण घरीच घेत जाऊ. जन्मदाते पालकच मुलांना या घातक पेयांची ओळख करून देणार असतील, तर मुलांना त्यात गैर कसे वाटू शकेल? बहुतेक मुलांमध्ये वाहवत जाण्याची प्रवृत्ती निसर्गतः असते. या वयात त्यांनी दारू किंवा ड्रग्ज घेतल्यास ते वाहवत जाऊन या व्यसनामध्ये गुरफटून जाण्याचा धोका अधिक असतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक त्या वयामध्ये जास्त केला जातो. यातून मुले व्यसनाधीन बनतात. कुठल्याही प्रकारचे व्यसन केले जाते तेव्हा काही काळासाठी बरे वाटते. कारण, मेंदूवरची बंधने काही काळासाठी का होईना सैल होतात. त्याला खोटा आत्मविश्वास येतो. तो थोडा वेळ का होईना मोठ्याने बोलतो. ज्यांना इंग्लिश येत नाही ते बोलायला लागतात. पार्टी असेल तर तो नाच वगैरे करतो. शुद्धीत असताना त्याला या गोष्टीची खूप लाज वाटत असते; पण एकदा मद्याचा किंवा अन्य अमली पदार्थांचा शरीरावर-मेंदूवर अंमल चढला की, भान हरपते. ही नशा उतरली की, या व्यक्ती पूर्ववत होतात किंवा त्यांना हँगओव्हर येतो. डोकं जड होतं. हात-पाय थरथरतात. अन्य अनेक प्रकारचे त्रास होतात. अशावेळी मी पुन्हा दारू प्यायलो किंवा ते व्यसन केले तर माझा हा त्रास जाईल, असे त्यांना वाटते आणि ते व्यसनाच्या दुष्टचक्रात अडकतात.

drug abuse on children
T20 World Cup Final | टीम इंडिया जगज्जेता; दक्षिण आफ्रिकेला नमवले - फोटो

वस्तुतः, दारू, ड्रग्ज, अफू, चरस, गांजा यामुळे मिळणारा आनंद अत्यंत क्षणिक असतो, तात्कालिक असतो. या क्षणभराच्या आनंदासाठी इतकी मोठी किंमत देणे आपल्या कारकिर्दीसाठी, पुढील आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकते. व्यसनाधीनतेमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होण्याबरोबरच करिअरचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. कौटुंबिक आयुष्यावर याचे अत्यंत प्रतिकूल दुष्परिणाम होतात. ज्या ताणतणावांपासून मुक्तता मिळवण्यासाठी व्यसन केले जाते ते शतपटींनी वाढतात. कारण, त्या ताणाचे मूळ कारण घालवण्यासाठी काहीच केलेले नसते. ‘मुक्तांगण’मध्ये अशी असंख्य उदाहरणे आम्ही पाहिली आहेत. मध्यंतरी एक व्यक्ती सांगत होती की, माझ्यावर खूप कर्ज होते. त्यामुळे सारखी आर्थिक गणिते माझ्या डोक्यात असायची. त्यातून येणारा ताण शमवण्यासाठी मी दारू प्यायला लागलो. यामुळे तुझा प्रॉब्लेम गेला का? असे विचारले असता तो अनेक पटींनी वाढल्याचे त्यांनी सांगितले. कारण, जे पैसे तो कर्ज फेडण्यासाठी वापरू शकत होता, त्याच पैशांनी तो दारू पीत होता. या व्यसनामुळे त्याच्या नोकरीवरही परिणाम झाला. नोकरी गेल्यामुळे कर्ज आणखी वाढले. बहुतेक व्यसनाधीनांच्या बाबत ही स्थिती दिसते.

drug abuse on children
Virat Kohli Retirement : कोहलची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, ‘ही माझी शेवटची टी-20..’

सोशल ड्रिंकर्समधील किती लोक पुढे जाऊन अल्कोहोलिक बनतात, या विषयावर जागतिक आरोग्य संघटना नेहमी संशोधन करत असते. 1988 मध्ये याबाबत संशोधन केले गेले तेव्हा असे दिसले की 100 व्यक्तींमधील 3 लोक पुढे जाऊन अल्कोहोलीक बनतात. पण काही वर्षांपूर्वी हे प्रमाण 13 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे आढळून आले. कोरोनानंतरच्या काळात ते 25 टक्क्यांवर गेलेले आहे. सोशल ड्रिंकर्स म्हणजे ऑकेजनली मद्य घेणारे किंवा कधीतरी पार्टीमध्ये दारु पिणारे. अशा 100 व्यक्तींपैकी 25 जण पुढे जावून अल्कहोलीक ड्रिंकर्स बनतात. चिंताजनक बाब म्हणजे अलीकडील काळात सोशल ड्रिंकर्सची संख्या वाढत आहे. त्यामुळे अल्कहोलीकांचे प्रमाणाही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सोशल ड्रिंकर पुढे जावून अल्कहोलीक बनू शकतो का, हे समजण्यासाठी सध्या कुठलीच टेस्ट उपलब्ध नाही. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेचे असे म्हणणे आहे की सोशल ड्रिंकींगही घातक असून त्यापासूनही लांब राहिले पाहिजे. कारण कधी तरी प्यायली तरी दारुचे शरीरावर होणारे परिणाम टळत नाहीत. तसेच कुटुंबावर, नोकरीवर, तुमच्या चारित्र्यावर यामुळे होणारे नकारात्मक परिणाम गंभीर स्वरुपाचे असू शकतात. आम्ही मुक्तांगणमध्ये याबाबत काही प्रश्न विचारत असतो. तुमचे दारु पिण्याचे प्रमाण वाढले आहे, असे तुमच्या घरच्यांना वाटते का? त्याचा त्रास घरच्यांना होतोय का? तुम्ही पूर्वी महिन्यातून एकदा पित असाल, तर आता ते आठवड्यातून एकदावर आले आहे का? सकाळी उठल्यावर तुम्हाला त्रास होतो का? अशी साधारण 20 प्रश्नांची प्रश्नावली असते. यापैकी एका जरी प्रश्नाचे उत्तर हो असल्यास सदर व्यक्ती अल्कोहोलीक बनण्याची शक्यता असते.

drug abuse on children
T20 World Cup Final : टीम इंडियाने रचला सर्वाधिक धावांचा विक्रम!

मुळात मद्यपान करणार्‍या व्यक्ती तुझे दारु पिण्याचे प्रमाण खूप वाढले आहे, तू जरा कमी कर, असे सांगितलेले अजिबात आवडत नाही. तसे सांगितल्यास तो चिडचिड करतो. अशी चिडचिड करणे ही त्याचे पिणे कुठेतरी धोकादायक अवस्थेकडे जात असल्याचे लक्षण असते. आणखी एक बाब म्हणजे, ताणतणावांबाबत किंवा नैराश्य आले असता सायकॉलॉजिस्टकडे जाण्याबाबतचा अवेअरनेस अलीकडील काळात काही प्रमाणात वाढत आहे. मानसिक आरोग्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यायला हरकत नाही, ही बाब हळूहळू का होईना, समाजात रुजते आहे. पण व्यसनासंदर्भात ती दिसत नाही. कारण व्यसनासंदर्भात कुटुंबियांना खूप लाज वाटते किंवा सामाजिक प्रतिष्ठेची त्यांना काळजी असते. माझा मुलगा, माझा नवरा दारू पितोय किंवा ड्रग्ज घेतोय हे समाजात कळले तर माझे कसे होईल, समाजात नाचक्की होईल ही खूप भिती असते. व्यसनाचा आजार नाकारण्याची ही मानसिकता पुढे जाऊन धोक्याची ठरू शकते. व्यसन करणारी व्यक्ती माझे प्रमाण वाढते आहे, त्यामुळे मला त्रास होतोय हे कधीच मान्य करत नाही. उलट मी थोडीशीच पितो, असे म्हणत त्याचे समर्थन करत राहतो. सुरूवातीच्या अवस्थेत हा स्विकार नसल्यामुळे समुपदेशकाची मदत खूप उशिरा घेतली जाते. अशाच प्रकारची भूमिका कुटुंबांकडूनही घेतली जाते. तेही आजकाल सगळेच पितात, मित्रांनी पाजली असेल अशा प्रकारची कारणे देत मद्यपान करणार्‍या व्यक्तीचे समर्थन करतात. यातून कुटुंबियही त्याचा आजार नाकारत असतात. पण त्याचे पिणे खूप वाढते, त्याचा त्रास कुटुंबियांना सुद्धा व्हायला लागतो, नोकरीत काही अडचणी निर्माण होऊ लागतात तेव्हा ते या गोष्टीचा स्वीकार करतात आणि मदत घ्यायला तयार होतात. वास्तविक, कोणत्याही आजाराच्या बाबतीत जसे सुरुवातीच्या टप्प्यावरच उपचार केल्यास ती व्याधी नियंत्रणात आणण्याची शक्यता अधिक असते, तसेच व्यसनाधिनतेबाबत आहे.

drug abuse on children
T20 WC INDvsSA Final : भारत विश्वविजेता, द. आफ्रिका पुन्हा चोकर्स

साधारणतः व्यसनाची सुरूवात ही सिगारेट किंवा तंबाखूयुक्त पदार्थांपासून होते. पुढे जाऊन ही मुले दारू प्यायला सुरूवात करतात. नंतर त्यांना दारूची नशाही फिकी आहे असे वाटू लागते. मग ते ड्रग्जसारख्या घातक अमली पदार्थांकडे वळतात. याबाबत एक धक्कादायक प्रसंग मला सांगावासा वाटतो. आमच्याकडे एक छोटासा मुलगा अ‍ॅडमिट होता. मी त्याला विचारले, ‘तुम्ही पार्टीत दारू पित असाल ना?’ यावर तो हसायला लागला. मी किती बाळबोध प्रश्न विचारतेय असे भाव त्याच्या चेहर्‍यावर होते. तो म्हणाला, आमच्यासाठी दारू म्हणजे एकदम सॉफ्ट ड्रिंक असते. आम्ही आता पार्टीमध्ये ड्रग्ज घेतो. आता आम्हाला त्यानेच किक बसते. त्यामुळे लोकांना दारू पिणे ही एक समस्या आहे असे वाटेनासेच झाले आहे. त्यातूनच विविध प्रकारचे ड्रग्ज पार्टीमध्ये घेतले जातात. याबाबत वैद्यकीय शास्र असे सांगते की, मेंदूला जेव्हा अमली पदार्थांच्या एका विशिष्ट प्रमाणाची सवय होते तेव्हा त्याची नशा येत नाही. यातून ते अधिकाधिक किक बसण्याच्या इच्छेने घातक अमली पदार्थांच्या आहारी जातात आणि आयुष्याची राखरांगोळी करुन घेतात. आजच्या तरुणपिढीला खूप आनंद हवा असतो आणि तो ताबडतोब हवा असतो. हा आनंद मिळवण्यासाठी कष्ट करायचे नसतात. त्यांना थांबायचे नसते. वास्तविक, व्यायाम करून, संगीत ऐकून आपल्याला आनंद मिळतो. पण तो खूप हळूहळू मिळतो. तेवढी वाट बघण्याची त्यांची तयारी नसते. त्यामुळेच ते झटपट किंवा क्षणार्धात आनंद देणार्‍या व्यसनांकडे वळत आहेत.

drug abuse on children
आम्हाला भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान आहे

व्यसनाधिन युवापिढी आणि समाज हा कधीही उज्वल भविष्य घडवू शकत नाही. त्यामुळे व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करणे ही या समाजातील प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. यामध्ये अधिक जबाबदारी आहे ती पालकांची. आज सर्वत्र आधुनिकतेचे वारे वाहत आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभावही वाढत आहे. त्याच वेळी आई-वडील आणि मुले यांच्यातील संवाद दुर्मिळ होत चालला आहे. आपली मुले काय करतात, ती कोणाच्या संगतीत आहेत याची बहुतांश पालकांना कल्पना नसते. ते फक्त मुलांना लागेल तसा पॉकेटमनी पुरवतात. परंतु पालकांनी आपल्या मुलांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांबाबतची जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. पालकांप्रमाणेच शिक्षकांची जबाबदारीही यामध्ये मोठी आहे. आपल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे, त्यांना व्यसनांकडे न वळण्याबाबतचे शिक्षण देणे ही जबाबदारी शिक्षकांनी पार पाडायला हवी. मीडियाचीही जबाबदारी यामध्ये मोठी आहे. व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करण्यामध्ये त्यांनीही अधिक प्रमाणात सहभागी व्हायला हवे. एकूणच, मुलांना व्यसनांपासून रोखण्यासाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करायला हवेत. यासाठी अगदी शालेय पातळीपासून जनजागृती केली पाहिजे. पालकांनी मुलांशी सुसंवाद साधल्यास त्यांच्या शंकांना योग्य उत्तरे मिळतील. त्यातून मुलांना चांगले काय आणि वाईट काय याचे ज्ञान होईल. त्याचबरोबर ज्या-ज्या चांगल्या व्यक्ती आहेत, आदर्श व्यक्तिमत्त्वे आहेत त्यांच्याविषयी मुलांना माहिती करून देणे गरजेचे आहे. यासाठी मुलांना मुळात रोलमॉडेल कशी निवडायची याचे ज्ञान करून देणे आवश्यक आहे. रुपेरी पडद्यावर दाखवलं जाणारं हे सगळंच खरं नसतं, ते आभासी असतं, मनोरंजनासाठी दाखवलं जातं, वास्तव जीवन त्यापेक्षा खूप वेगळं असतं याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलांशी चांगला संवाद साधणे गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news