वाढत्या मरुभूमीचे वास्तव

जगभरातील 24 टक्के जमीन ओसाड होण्याच्या मार्गावर
reality of growing deserts
जगातील सुमारे 24 टक्के जमीन ओसाड होण्याचे संकेत आहेत.Pudhari File Photo
अनिल जोशी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

जगातील सुमारे 24 टक्के जमीन ही शुष्क, निर्जन, ओसाड होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याला ‘मरुस्थळ’ असेही म्हटले जाते. बोलिव्हिया, चिली, पेरू यांसारख्या देशात 27 ते 43 टक्के जमीन ओसाड झाली आहे; तर अर्जेंटिना, मेक्सिको, प्राग येथे तर 50 टक्क्यांपेक्षा अधिक जमीन नापीक झाली आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे ओसाड जमिनीला पुन्हा ओलिताखाली आणण्याचे तंत्र अजूनही आपल्याकडे नाही.

संयुक्त राष्ट्रसंघाने नापीक होत जाणार्‍या जमिनी आणि वाढता ओसाडपणा यावर गांभीर्याने अभ्यास करण्याचे आवाहन जगातील सर्वच देशांना केले आहे. पर्यावरणाची सध्याची स्थिती पाहता काही गोष्टी आपल्या हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट होत आहे. यावेळचा उन्हाळा पाहिल्यास फेब्रुवारीपासूनच त्याच्या झळा जाणवू लागल्या होत्या आणि जूनमध्ये दाखल होईपर्यंत त्याची प्रचंड दाहकता सर्व जगाने अनुभवली. संपूर्ण जगात सरासरी कमाल तापमान वाढले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उन्हाळ्याच्या काळातील उष्णतेचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. आगामी काळात तापमान स्थिर होईल, असे समजून स्वत:चे समाधान करून घेणे म्हणजे शहामृगी पवित्रा ठरेल आणि तो येणार्‍या पिढीसाठी धोकादायक असेल. आज जगात 80 टक्के लोक तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत. अशी दाहकता पूर्वी दरवर्षी 27 दिवस राहात असे. पण बदलत्या काळानुसार दिवसांत भर पडत गेली असून उन्हाळ्यातील 32 दिवस असह्य राहात आहेत. अलीकडेच बिहार, जैसलमेर, दिल्लीत प्रचंड उष्णतेची लाट आली. शिवाय देशातील अन्य भागात देखील उष्णतेच्या लाटेच्या धक्क्यातून अजूनही लोक सावरलेले नाहीत. या वाढत्या तापमानाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पृथ्वी आणि निसर्गातील वाढत्या असंतुलनाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष.

जगभरात एकामागून एक निसर्गाचे सर्व स्रोत आटत असताना किंवा कमी होताना त्याचा गांभीर्याने विचार केला नाही. अर्थात या सर्व गोष्टीला आपणच म्हणजे मनुष्य जबाबदार आहे. आता आपण जीवनशैलीचे एवढे उदात्तीकरण केले आहे की, एकेकाळी आवश्यक असणार्‍या गोष्टी आपल्याला निरर्थक वाटू लागल्या आहेत. झाडे लावणे, पाणी कमी वापरणे या गोष्टी आपल्याला किरकोळ वाटू लागल्या आहेत. आपण ऐषोआरामाला अत्यावश्यक गरजेत सामावून घेतले आहे आणि त्यामुळेच पृथ्वीचा समतोल बिघडत चालला आहे. वाढते शहरीकरण आणि ऊर्जेच्या अत्याधिक वापरामुळे ग्लेशियर (हिमखंड/हिमकडे/हिमनद्या) वितळत आहेत. नद्या कोरड्याठाक पडत आहेत. जमीन असो, आकाश असो, पृथ्वीचा कोणताच भाग पर्यावरणपूरक आणि सुरक्षित राहिलेला नाही.

जगभरात शुष्क भूभागांचे वाढते प्रमाण हे चिंताजनक पातळीवर पोहोचत आहे. याचे आकलन आकड्यावरून होते. जगातील सुमारे 24 टक्के जमीन ही शुष्क, निर्जन, ओसाड होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याला ‘मरुस्थळ’ असेही म्हटले जाते. याचा अर्थ तेथे कोणतेही पीक येण्याची सुतराम शक्यता राहात नाही. एवढेच नाही तर तेथे पाण्याचे प्रमाणही अत्यंत कमी राहते. बोलिव्हिया, चिली, पेरू यांसारख्या देशात 27 ते 43 टक्के जमीन ओसाड झाली आहे; तर अर्जेंटिना, मेक्सिको, प्राग येथे तर 50 टक्क्यांपेक्षा अधिक जमीन नापीक झाली आहे. भारताचा विचार करता आपल्या देशातील 35 टक्के जमीन अगोदरच नापीक झालेली आहे आणि येणार्‍या काळात आणखी 25 टक्के जमीन ओसाड होणार आहे. प्रामुख्याने या जमिनी स्रोतांच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. झारखंड, गुजरात, गोवा, दिल्ली, राजस्थानचा यात समावेश करावा लागेल. या क्षेत्रात 50 टक्क्यांपेक्षा अधिक जमीन नापीक होणार आहे. सुदैवाने उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ, मिझोरामसारख्या राज्यांत नापीक जमीन राहण्याचे प्रमाण केवळ 10 टक्केच आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल.

ज्या ठिकाणी पूर्वी जंगल होते, तलाव होते, नैसर्गिक स्रोतांचा साठा होता त्या जमीनीचा वापर अन्य गोष्टीसाठी केला जात आहे. एका अंदाजानुसार जगभरात 50 टक्के जमीन ही अन्य वापरासाठी आणली जात आहे. यापैकी 34 टक्के देश जमिनीचा गरजेपेक्षा अधिक बदल करण्याच्या स्थितीत आहेत तर 48 टक्के देशांत मध्यम बदल होत आहेत. 18 टक्के देशांतील जमिनीच्या स्थितीत फारसा बदल झाला नाही. दक्षिण आशियात 94 टक्के जमिनीच्या वापराचे स्वरूप बदलले आहे आणि युरोपात 90 टक्के तसेच आफ्रिकेत हा आकडा 89 टक्के आहे. जमिनीचा अन्य कामासाठी वापर केला जात असल्याने निसर्गाची साथ सुटत आहे. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर आपण 68 टक्के जंगलावर पाणी सोडले आहे. आज जगात केवळ 31 टक्के वनक्षेत्र राहिले आहे. आपल्या देशात मात्र 23 टक्के जमीन वनाच्छादित असल्याचा दावा केला जात आहे. ही बाब खरी असल्याचे मानले तरी आपल्याकडे प्रति व्यक्तीच्या वाट्याला 0.08 जमीन आहे. दुसरी चिंतेची बाब म्हणजे देशात आता एकही अशी जागा राहिली नाही की, तेथे उत्खनन होत नाही. सरकारसाठी हा मोठा महसूल स्रोतही आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यांसाठी उत्खनन हा महत्त्वाचा स्रोत राहिला आहे.

आपली शेती पूर्णतः व्यावसायिक होत आहे अणि त्यात आक्रमकपणाने रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा अधिक वापर केला जात आहे. पूर्वी पोट भरण्यासाठी शेती केली जात होती आणि आता पैशांसाठी शेती होत आहे. परिणामी शेत जमीन देखील नापीक झाली आहे. पाण्याच्या अभावामुळे अनेक ठिकाणी शेती करता येत नसल्याची स्थिती आहे. याशिवाय ओसाडपणा येण्यासाठी ‘क्लायमेटिक व्हेरिएशन’चे देखील कारण आहे. आज देशात महत्त्वाच्या नैसर्गिक ठिकाणांच्या स्थितीत र्‍हास झाला आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे ओसाड जमिनीला पुन्हा ओलिताखाली आणण्याचे तंत्र अजूनही आपल्याकडे नाही. यावर एकच उपाय म्हणजे आपल्या देशात झाडे लावण्याच्या मोहिमेला आंदोलनाचे किंवा चळवळीचे रूप द्यावे लागेल. असे झाल्यास काही प्रमाणात गोष्टी नियंत्रणात येऊ शकतात. मात्र हे करत असताना वन प्रजातींच्या लागवडीकडे तितकेच गंभीर राहावे लागेल. कारण स्थानिक वने ही निसर्गाला जोडण्याचे काम करतात आणि मदत करतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news