स्पेन ते अर्जेंटिना!

कोट्यवधींची उलाढाल असलेल्या स्पर्धा; युरो चॅम्पियनशिप आणि कोपा अमेरिका
spain to argentina
स्पेन ते अर्जेंटिना!Pudhari News network
विवेक कुलकर्णी

जगातील सर्वात वेगवान कोणता खेळ असेल तर तो म्हणजे फुटबॉल. लढत अवघ्या 90 मिनिटांची. पण, त्यातील एकेक सेकंद लाख मोलाचा... क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा, तसेच श्वास रोखून धरायला लावणारा. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या खेळातील दोन महत्त्वाच्या स्पर्धा युरो चॅम्पियनशिप व कोपा अमेरिका गत आठवड्यात संपन्न झाल्या, त्यावेळी त्यातील अ‍ॅक्शन-ड्रामा-क्लायमॅक्सचा थरार एखाद्या हॉलीवूडपटापेक्षा तसूभरही कमी नव्हता!

spain to argentina
स्पेनच 'युरो'चा 'सम्राट'; इंग्लंडचा २-१ ने पराभव

युरो फुटबॉल स्पर्धेत छोटे छोटे पासेस तर कोपा अमेरिका स्पर्धेत लांब पल्ल्याचे पासेस... युरो स्पर्धेत बॉल कंट्रोल, टॅक्टिकल पोझिशनिंग तर कोपा अमेरिका स्पर्धेत तुलनेने धसमुसळा खेळ... युरो स्पर्धेत पासेसची कलात्मकता तर कोपा अमेरिकेत धोकादायक खेळावर अधिक भर... युरोमध्ये बॉल पझेशन आपल्याकडेच ठेवण्यावर भर तर कोपा अमेरिका स्पर्धेत त्याऐवजी चेंडू अचूकपणे गोल जाळ्यात धाडणे हा प्राधान्यक्रम! खेळ एकच... पण, या दोन्ही स्पर्धांमधील जमीन-अस्मानचे अंतर हे या खेळाची नजाकत दर्शवणारे... डोळ्याचे पाते लवते न लवते, तोवर त्याचे अगदी सेकंदा-सेकंदाला मैदानावर प्रतिबिंब उमटवणारे..!

spain to argentina
अर्जेंटिनाने रचला इतिहास, १६व्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

कोपा अमेरिका ही खरं तर सर्वाधिक प्राचीन फुटबॉल स्पर्धा. त्याची सुरुवात झाली ती 1916 मध्ये. या स्पर्धेत दक्षिण अमेरिकेतील संघ सहभागी होतात. दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल संस्कृती निराळी आणि या पठडीत घडलेले मेस्सी, पेले, माराडोनासारखे खेळाडूही निराळे! तिकडे युफा युरो चॅम्पियनशिपची सुरुवात 1960 ची. ख्रिस्तियानो रोनाल्डो, मायकल प्लॅटिनी व त्यांच्यासारखे अनेक दिग्गज या भूमीने घडवले. युरोपला फुटबॉलचा गर्भश्रीमंत इतिहास आहे आणि जर्मनी, फ्रान्स, स्पेन व इटलीसारखे पॉवरहाऊस संघही आहेत! यंदा युरो स्पर्धेत फारशी कुरकुर दिसून आली नाही. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेला मात्र छोट्या मैदानांच्या वादंगाचे ग्रहण पाठ सोडता सोडत नव्हते. फिफाच्या नियमावलीनुसार, फुटबॉलचे मैदान 105 बाय 68 मीटर्स कक्षेत असणे आवश्यक असते. पण, अमेरिकेतील सर्व फुटबॉल मैदाने मात्र 105 बाय 64 मीटर्सच्या कक्षेत आहेत आणि याचमुळे येथे सुरू होतो तो खेळाडूंचे ‘मार्किंग’ सोपे करणारा धसमुसळा, थेट अंगावर येऊ घालणारा ‘फिजिकल सॉकर’चा अतिआक्रमक खेळ!

‘कोपा’साठी आता ड्रीम फायनल | पुढारी

फ्रेंच स्टार फुटबॉलर किलियन एम्बापेने अलीकडेच यावर थेट अंगुलिनिर्देश केला. तो म्हणाला होता, फिफा वर्ल्डकपपेक्षाही अधिक गुंतागुंतीची स्पर्धा म्हणजे युरो. वर्ल्डकपच्या जेत्यांवर नजर टाकली तर लक्षात येईल की, बहुतांशी विजेते युरोपियन्सच असतात! तर अर्जेंटिनाचा कर्णधार लायोनेल मेस्सी म्हणतो, असे अनेक वर्ल्ड चॅम्पियन्स आहेत, जे सांगतील की युरो स्पर्धा खरोखरच खूप कठीण असते! पण, जगरहाटी बदलत असताना अमेरिकेने मैदानाचे डायमेन्शन्स मात्र कधीच बदलले नाहीत. हेच कारण असेल, ज्यामुळे कॅनडाविरुद्ध साखळी लढतीनंतर अर्जेंटिनाचा गोलरक्षक इमिलियानो मार्टिनेझ म्हणाला होता, प्रतिकूल मैदानाने परिस्थिती आणखी अवघड करून टाकली. कोपा अमेरिकेला काही बदल करावेच लागतील. अन्यथा युरोपियन चॅम्पियनशिप कायमची सरस ठरत जाईल! आश्चर्य वाटेल, पण, यंदा कोपा अमेरिकेतील 14 स्टेडियम्सपैकी 11 स्टेडियम्स हे मल्टी पर्पज स्टेडियम्स होते. या 11 स्टेडियम्सवर नॅशनल फुटबॉल लीग ही अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय स्पर्धा खेळवली जाते आणि या स्पर्धेतील मैदानाचा आकार फिफाशी प्रचंड मोठी फारकत घेणारा असतो. तो म्हणजे 110 मीटर्स बाय 49 मीटर्स! फिफाच्या डायमेंशनच्या आसपास तरी असावे म्हणून तेथे शेवटच्या क्षणी मैदानात बदल केले गेले आणि कशीबशी 100 बाय 64 मीटर्सच्या आसपासचे मैदान तयार केले गेले. पण, तरी एक प्रश्न अनुत्तरित राहिलाच. तो म्हणजे कॉर्नर किक घेताना खेळाडू आपला छोटा रनअप तरी कुठून घेणार?

EURO2020 : स्पेन सेमीफायनलमध्ये

कोपा अमेरिका स्पर्धा पुढे सरकत गेली आणि चाहते, खेळाडू, प्रशिक्षक या सर्वांच्या टीकेचा घाव आयोजक सोसत राहिले. मैदानाचा आकार छोटा असेल तर खेळाडूंचे मार्किंग सोपे होते. शिवाय, धसमुसळ्या खेळाची शक्यता वाढते. चेंडू मिडफिल्डमध्येच अधिक राहतो. गोल करण्यापेक्षा गोल वाचवता कसा येईल, यावर नकळत भर दिला जातो आणि तेथून पुढे सुरू होते परस्परांवर कुरघोडी करू पाहणारी फिजिकल सॉकरची गळेकापू स्पर्धा! आता हा वाद केवळ मैदानाच्या आकारापर्यंतच थांबला नाही तर मैदानावरील ग्रास अर्थात हिरवळीपर्यंतही पोहोचला. युरो स्पर्धेतील गवत नैसर्गिक पद्धतीने वाढवलेले. कोपा अमेरिकेतील ग्रास मात्र ड्रॉप इन पद्धतीचे! म्हणजे ते वाढवले जाते एकीकडे, आणले जाते दुसरीकडे आणि स्पर्धेला काही दिवस बाकी असताना वसवले जाते तिसरीकडेच! थोडक्यात कशाचा पायपूस कशाला नाही! याचा सर्व फटका स्पर्धा खेळाला बसतो. खेळाडू चेंडूवर ताबा ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. पण नैसर्गिक गवतावर खेळण्याची सवय असणार्‍या खेळाडूंचा येथे अंदाज चुकत जातो. चेंडू अधिक उसळत राहतो, अंदाज चुकवत राहतो आणि मैदानाशी जुळवून घेण्यातच 45 मिनिटांची 2 सत्रे कधी संपून जातात, ते ना खेळाडूंना कळते, ना त्यांच्या प्रशिक्षकांना!

spain to argentina
क्रीडा : स्पेनच्या पोरी लय भारी…

इतके कमी की काय म्हणून, 2026 ची फुटबॉल स्पर्धा चक्क अमेरिकेत खेळवली जातेय. त्याच अमेरिकेत जेथे ना मैदानाचे डायमेंशन्स सरळ असतात ना हिरवळीचे आडाखे! यंदा कोपा अमेरिका ज्या मैदानावर खेळवली गेली, त्यातील 14 पैकी 8 मैदानांवर या विश्वचषकाचे सामने होतील. त्यामुळे थोडक्यात सर्वत्र आनंदी आनंद! एक प्रांजळपणे नमूद करावे लागेल की, नजाकतदार, कलात्मक खेळ असो किंवा धसमुसळा, बॉडीलाईनवर आधारित खेळ, फुटबॉलचे ते अविभाज्य घटकच. ज्याप्रमाणे नजाकतदार, कलात्मक खेळाला तोड नाही, त्याचप्रमाणे फिजिकल सॉकरचा थरार, त्याच्या रोमांचकतेला देखील तोड नाही. हे सर्व घटक या खेळाला नव्या उंचीवर नेतात, अंगावर शहारे आणतात.

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा आजपासून

आता यंदा कोपा अमेरिका जिंकणारी अर्जेंटिना आणि युरो चॅम्पियनशिप जिंकणार्‍या स्पेनमध्ये विजयानंतर कसे वातावरण होते, तेही तितकेच महत्त्वाचे... ती तारीख होती जुलै 15. मियामीचे मैदान. अर्जेंटिनाने कोलंबियाला 1-0 अशा फरकाने चारीमुंड्या चीत केले आणि अवघी अर्जेंटिना जल्लोषात न्हाऊन निघाली. मार्टिनेझाचा जादा वेळेतील अचूक गोल निर्णायक ठरला. याचमुळे अर्जेंटिनाच्या कानाकोपर्‍यात लोक रस्त्यावर उतरत राहिले, राष्ट्रीय ध्वज फडकवत राहिले, विजयाची गाणी गात राहिले आणि फटाक्यांची आतषबाजी करत राहिले! दुसर्‍या दिवशीची पहाट उगवली, त्यावेळी या ऐतिहासिक विजयाचा जोशपूर्ण जल्लोष सुरूच होता! ब्युनोस आयर्स असेल किंवा रोझारिओ, प्रत्येक ठिकाणी चौकाचौकात मोठमोठ्या स्क्रीनवर या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी अर्जेंटिनातील एक न एक चाहता रस्त्यावर उतरला नसता तरच नवल होते. पुढे मार्टिनेझने जादा वेळेत गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला काय आणि अतिरिक्त वेळ संपल्याची शिट्टी वाजली काय, सारे अर्जेंटियन्स आनंदाश्रूना वाट करून देत राहिले!

spain to argentina
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : ब्राझील-अर्जेंटिना अंतिम सामन्यात आमने-सामने

युरो स्पर्धा जिंकणार्‍या स्पेनमध्येही यापेक्षा वेगळे वातावरण नव्हते. बर्लिनमधील त्या अंतिम लढतीत स्पेनसमोर इंग्लंडसारखा तगडा प्रतिस्पर्धी असल्याने उत्कंठा शिगेस पोहोचली होती. स्पेनने इथे 2-1 फरकाने निसटती बाजी मारली आणि यासाठी टर्निंग पॉईंट ठरला मिकेलने 86 व्या मिनिटाला विजयी आघाडी मिळवून देणारा निर्णायक गोल! मिकेलला हा निर्णायक गोल करण्यासाठी तो लाख मोलाचा पास देणारा अवघ्या 16 वर्षांचा यामल तर जणू आता अवघ्या स्पॅनिश फुटबॉल चाहत्यांसाठी एका रात्रीत स्टार बनला! स्पेनने इथे तगडा प्रतिस्पर्धी समोर असताना देखील बॉल पझेशन, पासेस, शॉर्ट पासेस, शॉटस्, शॉटस् ऑन टार्गेट, कॉर्नर्स अशा प्रत्येक आघाड्यांवर जोरदार हुकूमत गाजवली. थोडेसे तपशिलात जायचे तर आकडेवारी खूप रंजक आहे. स्पेनचे बॉल पझेशन 66 टक्के तर इंग्लंडचे 34 टक्के. स्पेनचे पासेस 545 तर इंग्लंडचे अवघे 294 पासेस. स्पेनची पास क्युरसी 89 टक्के तर इंग्लंडची क्युरसी 77 टक्के. स्पेनचे 10 कॉर्नर्स तर इंग्लंडचे अवघे 2! निकाल काय असेल, हे साहजिकच होते. झालेही तसेच.

सामना संपल्याची घोषणा झाली आणि 2-1 फरकाने स्पॅनिश ब्रिगेडने थाटात विजयोत्सवाचा श्रीगणेशा करून दिला. या लाख मोलाच्या विजयानंतर अवघे स्पेनवासी रस्त्यारस्त्यावर, चौकाचौकात उतरत राहिले, एकच हर्षोत्सव साजरा करत राहिले. माद्रिद असेल, बार्सिलोना किंवा व्हॅलेन्सिया, प्रत्येक ठिकाणी स्पेनचा लाल-पिवळा झेंडा जोमाने फडकत राहिला, विजयाची नवी पहाट दर्शवत राहिला.

जर्मनीचा टोनी क्रूस, त्याचा सहकारी थॉमस म्यूलर, स्वित्झर्लंडचा शाकिरी, फ्रान्सचा ऑलिव्हर गिरोड, अर्जेंटिनाचा अँजेल डी मारिया यांनी यंदाच्या या दोन प्रतिष्ठेच्या स्पर्धांनंतर निवृत्तीची घोषणा केली. शिवाय तूर्तास अद्याप न थांबणार्‍या मेस्सी, रोनाल्डो, लुईस सुआरेझ अशा खेळाडूंसाठी देखील यंदाही ही शेवटचीच स्पर्धा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक स्पर्धा या नात्याने युरो व कोपा अमेरिका यात जमीन-अस्मानाचे अंतर असले तरी त्यांनी यंदाही जो लाख मोलाचा आनंद फुटबॉल रसिकांना, क्रीडा विश्वाला दिला, त्याला अर्थातच तोड नाही!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news