कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा आजपासून

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दक्षिण अमेरिकेतील मोठी फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळख असलेली कोपा अमेरिका स्पर्धा ही 13 जून ते 10 जुलैदरम्यान ब्राझील येथे खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन गेल्यावर्षी 12 जून ते 12 जुलै 2020 दरम्यान होणार होते; पण कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. दक्षिण अमेरिकन फुटबॉल कॉन्फडरेशन (कोनमेबोल) ही या स्पर्धेचे संचालन करते. ब्राझील हा स्पर्धेचा गतविजेता आहे.

या स्पर्धेतील दहा संघांची विभागणीही दोन गटांत करण्यात आली आहे. 'अ' गटात गतविजेता ब्राझील, कोलंबिया, वेनेझुएला, एक्‍वाडोर, पेरू यांचा समावेश आहे. तर 'ब' गटात अर्जेंटिना, बोलिव्हिया, उरुग्वे, चिली, पॅराग्वे यांचा सहभाग असणार आहे. सुरुवातीला गटवार सामने होतील. त्यातील अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतील. उपांत्यपूर्व सामन्यांचे आयोजन दोन आणि तीन जुलैला, तर उपांत्य फेरीचे सामने पाच आणि सहा जुलैला खेळविण्यात येतील.

अर्जेंटिना संघाला  सर्वाधिक यजमानपद

कोपा अमेरिका स्पर्धा सहाव्यांदा ब्राझील येथे आयोजित केली जाणार आहे. गेली स्पर्धादेखील ब्राझील येथे आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये यजमानांनी जेतेपद मिळवले होते. अर्जेंटिनाला सर्वाधिक 9 वेळा कोपा अमेरिकेचे यजमानपद मिळाले आहे. तर उरुग्वे आणि चिली यांनी 7-7 वेळा यजमानपद भूषविले आहे. यापूर्वी अर्जेंटिना आणि कोलंबिया संयुक्‍तपणे स्पर्धेचे यजमानपद भूषविणार होते; पण वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना हे यजमानपद गमवावे लागले आणि ब्राझीलला यजमानपद सोपविण्यात आले.

स्पर्धेवर उरुग्वे व  अर्जेंटिनाचे वर्चस्व

कोपा अमेरिका स्पर्धेवर उरुग्वे आणि अर्जेंटिना यांचे वर्चस्व राहिले आहे. उरुग्वे संघाने सर्वाधिक 15 वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे; पण शेवटचे जेतेपद मिळवून त्यांना 10 वर्षे झाली आहेत. अर्जेंटिनाने 14 वेळा स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. ब्राझीलने 9 वेळा जेतेपद मिळवले असून, ते गतविजेते आहेत. पॅराग्वे, चिली आणि पेरू यांनी ही स्पर्धा 2-2 वेळा जिंकली आहे.

नेमार, मेस्सी, सूआरेज यांचा खेळ पाहण्याची संधी

जगातील आघाडीचे दक्षिण अमेरिकन खेळाडू लियोनल मेस्सी, लुई सूआरेज आणि नेमार यांचा खेळ पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे या खेळाडूंची कामगिरी स्पर्धेतील त्यांच्या संघाचे भवितव्य ठरवू शकते. सध्याच्या घडीला ब्राझील आणि अर्जेंटिना हे जेतेपदाचे प्रबळ दावेदार समजले जात आहेत. ब्राझीलचा संघ दक्षिण अमेरिकन विश्‍वचषक क्‍वॉलिफायरचे सहाही सामने जिंकत अव्वल स्थानी आहे. ते अर्जेंटिना संघाच्या सहा गुणांनी पुढे आहेत. त्यामुळे नेमारसारख्या खेळाडूच्या उपस्थितीत संघाचा प्रयत्न हा जेतेपद कायम राखण्याचा असणार आहे. अर्जेंटिनाचा संघ गेल्या स्पर्धेत तिसर्‍या स्थानी राहिला होता; पण प्रशिक्षक बदलल्यानंतर संघात बदल पाहायला मिळाला आहे. मेस्सीसोबत संघात आणखीन मॅच विनर खेळाडू आहेत. उरुग्वेचा संघ लुई सूआरेजसारखा खेळाडू असतानादेखील संघर्ष करताना दिसत आहे. गेल्या स्पर्धेतील उपविजेता संघ असलेल्या पेरू संघाला विश्‍वचषक क्‍वॉलिफायर्समध्ये चमक दाखवता आलेली नाही.

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news