‘कोपा’साठी आता ड्रीम फायनल | पुढारी

ब्रासिलीया (ब्राझील) : वृत्तसंस्था

कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन बलाढ्य संघांमध्ये जेतेपदासाठी 'ड्रीम फायनल' रंगणार आहे. रियो दी जनेरियोच्या ऐतिहासिक माराकाना स्टेडियममध्ये होणार्‍या या सामन्याच्या निमित्ताने मेस्सीची अर्जेंटिना आणि नेमारचा ब्राझील संघ एकमेकांविरुद्ध भिडणार असल्याने जगातील तमाम फुटबॉल चाहत्यांना  जणू चुरशीच्या लढतीची मेजवानीच चाखावयास मिळणार आहे. 

दुसर्‍या सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियावर 3-2 असा विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. गोलकीपर एमिलियानो मार्टिनेज याने कोलंबियाचे तीन पेनल्टी शॉट रोखत अर्जेंटिनाला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. नियमित वेळेत हा सामना 1-1 असा बरोबरीत होता. सातव्या मिनिटाला लॉटेरो मार्टिनेजने गोल करून अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, कोलंबियाच्या लुई डियाजने 61 व्या मिनिटाला गोल करीत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.  

अर्जेंटिनाचा गोलकीपर मार्टिनेजने शूटआऊटमध्ये कोलंबियाच्या सांचेज, येरी मायना आणि एडविन कारडोना यांचे शॉट रोखले. अर्जेंटिनाकडून रॉड्रिगो-डी-पॉल याला गोल करता आला नाही. मात्र, मेस्सी, लिएंड्रो पारेडेज आणि लॉटेरो मार्टीनेज यांनी गोल मारत संघाचा विजय निश्चित केला. कोलंबियाकडून कुआड्रेडो आणि मिगुएल बोर्जा यांनी गोल केले.  अर्जेंटिनाने 1993 मध्ये कोपा अमेरिका चषक जिंकल्यानंतर कोणतीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही.  ब्राझीलने पेरूविरुद्ध 1-0 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. ब्राझीलने मायदेशात कधीही कोपा अमेरिका फायनल सामना गमावलेला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news