

Year Ender 2025 India Gold Silver Stock Market Report:
2025 हे वर्ष भारतीय गुंतवणूकदारांसाठी अत्यंत अस्थिर होतं. या वर्षी सोन्या-चांदीने जबरदस्त परतावा दिला, तर शेअर बाजाराने मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली. वर्षाची सुरुवात होताना भारतात चांदीची किंमत सुमारे 86,000 ते 87,000 रुपयांच्या आसपास होती. मात्र वर्ष सरत असताना डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत चांदी 1,80,000 रुपयांच्या वर पोहोचली. म्हणजेच गुंतवणूकदारांना तब्बल 107 टक्के परतावा दिला. चांदीने परताव्याच्या बाबतीत इतिहास रचला आहे.
चांदीच्या या विक्रमी प्रवासामागे अनेक कारणं आहेत. सौर पॅनेलची वाढती मागणी, इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगात वेगाने वाढणारा वापर आणि हरित ऊर्जेच्या विस्तारामुळे चांदीची औद्योगिक मागणी अचानक वाढली. याच दरम्यान भारताने वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतच 4,172 मेट्रिक टन चांदीची आयात केली. ही आयात 2023 च्या एकूण आयातीपेक्षाही जास्त होती. यामुळे चांदीने या वर्षी जबरदस्त परतावा दिला आहे.
सोन्यानेही या वर्षी कमाल केली आहे. वर्षाच्या सुरुवातीला सोनं 73,000 ते 75,000 रुपयांच्या दरम्यान होतं, पण डिसेंबरपर्यंत त्याची किंमत 1,30,000 रुपयांपर्यंत पोहोचली. सोन्याने 2025 मध्ये सुमारे 68 टक्के परतावा दिला आणि 1979 नंतर सोन्याने सर्वात जास्त परतावा दिला आहे.
जागतिक पातळीवरही सोन्याने दमदार कामगिरी केली; स्पॉट गोल्डमध्ये जवळपास 57 टक्क्यांची वाढ झाली. भारतात सोने अधिक महागण्यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे रुपयाची घसरण. डॉलरच्या तुलनेत रुपया यावर्षी 5 टक्क्यांहून अधिक घसरल्यामुळे आयात केलेल्या सोन्याची किंमत देशांतर्गत पातळीवर जास्त वाढली.
या सगळ्यात भारतीय शेअर बाजाराने मात्र निराशा केली. 2025 मध्ये बीएसई सेंसेक्सने केवळ 5.30 टक्के परतावा दिला, तर निफ्टी 50 ने 6.38 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. चांदी आणि सोन्याच्या झपाट्याने वाढत असलेल्या भावांच्या तुलनेत शेअर बाजाराने मात्र निराशा केली. एवढंच नव्हे तर जागतिक स्तरावर भारताचा सेंसेक्स हा प्रमुख 17 शेअर बाजारांच्या तुलनेत सर्वात खालच्या स्थानावर राहिला.
या कामगिरीमागे एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर केलेली विक्री. 2025 मध्ये एफपीआयने भारतीय बाजारातून तब्बल 1.43 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली, ज्याचा थेट परिणाम बाजारावर झाला.
चांदी: – 107% परतावा
सोने: – 68% परतावा
शेअर बाजार: – 5% ते 6% परतावा