

India safest banks RBI D SIB Report 2025: आर्थिक अनिश्चिततेच्या काळात बँकेत ठेवलेला पैसा किती सुरक्षित आहे, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो. अनेकदा बँका आर्थिक अडचणीत सापडतात, काही वेळा बंदही होतात. अशा वेळी लोकांच्या मेहनतीची कमाई बुडण्याची भीती अधिक असते. पण या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) तयार केलेल्या यादीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
RBI ने देशातील सर्वात सुरक्षित बँका म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि ICICI बँक या तीन बँकांची निवड केली आहे. या बँकांना डोमेस्टिक सिस्टेमिकली इम्पॉर्टंट बँक्स (D-SIBs) म्हणजेच देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या बँका म्हणून घोषित करण्यात आले आहे.
RBI च्या मते, या बँका इतक्या मोठ्या आणि अर्थव्यवस्थेशी निगडित आहेत की, यापैकी कोणतीही बँक अपयशी झाली तर संपूर्ण वित्तीय प्रणाली हादरू शकते. त्यामुळे अशा बँका ‘फेल’ होऊ नयेत म्हणून त्यांच्यावर अधिकाधिक भांडवली जबाबदारी असते आणि सरकारही त्यांच्या स्थैर्याकडे अधिक लक्ष देतं. 2024 मध्येही या तिन्ही बँकांनी आपली महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे RBI ने त्यांना पुन्हा D-SIBs यादीत स्थान दिले आहे.
अधिक भांडवल ठेवण्याची RBI ची अट
D-SIB बँकांना सामान्य बँकांपेक्षा जास्त भांडवल राखून ठेवावे लागते, जेणेकरून आकस्मिक संकटाला तोंड देता येईल.
D-SIB ही संकल्पना 2014 मध्ये भारतात लागू झाली. देशातील आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत करण्यासाठी RBI ने काही बँकांना ‘सिस्टेमिकली इम्पॉर्टंट’ घोषित करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच, या बँकांमध्ये काही बिघाड झाला तर त्याचा परिणाम थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. म्हणूनच सरकार आणि RBI या बँकांना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करतात.
बँक बंद पडली किंवा दिवाळे निघाले तरी सरकार डिपॉझिट इन्शुरन्स (DICGC) द्वारे प्रत्येक खातेदाराला 5 लाख रुपये पर्यंतची हमी देते. पूर्वी ही मर्यादा 1 लाख होती, ती 2020 पासून 5 लाख रुपये करण्यात आली.
म्हणजेच,
तुमच्या खात्यात 10 लाख असले तरी तुम्हाला जास्तीत जास्त 5 लाख परत मिळतील.
खात्यात 3 लाख असतील तर संपूर्ण 3 लाख परत मिळतील.
या यादीमुळे ग्राहकांना हे समजेल की SBI, HDFC आणि ICICI या बँका देशातील सर्वात सुरक्षित बँकांपैकी एक आहेत. त्यामुळे अशा बँकांमध्ये ठेवलेला पैसा बुडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या या तिन्ही बँकांना RBI ने पुन्हा ‘टॉप सेफ’ बँकांच्या यादीत समाविष्ट केल्याने ग्राहकांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.