Gold Reserves: 8 हजार टन सोनं! अमेरिकेकडे इतकं सोनं आलं कुठून? भारताकडे किती साठा?
US Gold Reserves 8000 Tonnes Explained: अमेरिका हा देश आज जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक मानला जातो. लष्करी ताकद, डॉलरचा दबदबा आणि जगभरातील राजकीय दबाव यामुळे तो सातत्याने चर्चेत असतो. पण अमेरिकेची खरी ताकद काय आहे, असं विचारलं तर त्याचं उत्तर म्हणजे अमेरिकेकडचा प्रचंड सोन्याचा साठा.
जगातील सर्वात मोठा अधिकृत गोल्ड रिझर्व्ह अमेरिकेकडे आहे. अंदाजे 8,100 टनांपेक्षा जास्त सोने अमेरिकेकडे आहे. हे सोने फोर्ट नॉक्स, न्यूयॉर्क फेडच्या वॉल्टमध्ये आणि इतर काही सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं असल्याचं सांगितलं जातं.
अमेरिकेकडे इतकं सोनं आलं तरी कसं?
अमेरिकेकडे इतकं सोनं एका दिवसात जमा झालेलं नाही. सुमारे 100 वर्षांच्या काळात वेगवेगळ्या कारणांनी हा साठा तयार झाला.
1) ‘गोल्ड रश’मुळे मोठं खनन
19व्या शतकात अमेरिकेत कॅलिफोर्निया गोल्ड रश (1848) सारख्या घटना घडल्या. त्या काळात मोठ्या प्रमाणात सोने खाणींमधून निघालं आणि हळूहळू सरकारच्या साठ्यात जमा होत गेलं.
2) पहिलं आणि दुसरं महायुद्ध
महायुद्धाच्या काळात युरोपसह अनेक देशांना वस्तू, अन्नधान्य, इंधन आणि शस्त्रांची गरज होती. त्या बदल्यात अनेक देशांनी अमेरिकेला सोने देऊन व्यवहार केले. युद्धाच्या काळात अमेरिका तुलनेने सुरक्षित असल्याने अनेक देशांनी आपलं सोने अमेरिकेच्या वॉल्टमध्ये हलवलं, असंही सांगितलं जातं.
3) ब्रेटन वुड्स सिस्टीममुळे डॉलर मजबूत
1944 मध्ये झालेल्या ब्रेटन वुड्स करारानंतर डॉलर जगाची मुख्य चलनव्यवस्था बनली. तेव्हा डॉलरला सोन्याशी जोडण्यात आलं होतं. एक औंस सोने = 35 डॉलर अशी किंमत ठरली होती. त्यामुळे जगभरात व्यवहारात डॉलरची ताकद वाढली आणि अमेरिकेच्या सोन्याच्या साठ्यालाही मोठी ताकद मिळाली.
जगात सर्वाधिक ‘गोल्ड रिझर्व्ह’ कुणाकडे?
अधिकृत माहितीप्रमाणे जगातील टॉप गोल्ड रिझर्व्ह असे आहेत—
अमेरिका: 8,133 टन
जर्मनी: 3,350 टन
IMF: 2,814 टन
इटली: 2,451 टन
फ्रान्स: 2,437 टन
रशिया: 2,326 टन
चीन: 2,305 टन
स्वित्झर्लंड: 1,039 टन
भारत: 880 टन
जपान: 846 टन
पण 1971 मध्ये अमेरिका आणि डॉलर यांचं सोन्याशी असलेलं थेट नातं तुटलं. याला ‘निक्सन शॉक’ म्हटलं जातं. यानंतरही अमेरिकेने मोठ्या प्रमाणात सोने विकलं नाही. कारण संकटाच्या काळात सोने हा सर्वात सुरक्षित ‘बॅकअप अॅसेट’ मानला जातो. आणि डॉलरवरचा विश्वास टिकवण्यासाठीही मोठा गोल्ड साठा महत्त्वाचा आहे.
देशासाठी सोनं महत्त्वाचं का असतं?
आज डिजिटल व्यवहार आणि क्रिप्टो वाढले असले, तरी केंद्रिय बँकांसाठी सोने अजूनही खूप महत्त्वाचं आहे.
1) महागाई आणि चलनाचा धोका कमी
चलनाची किंमत कमी-जास्त होऊ शकते. पण सोन्याची किंमत तुलनेने स्थिर राहते. त्यामुळे संकटात सोनं आधार देतं.
2) फॉरेन रिझर्व्ह मजबूत राहतो
फक्त डॉलर, बॉण्ड्स यावर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. सोने असल्याने रिझर्व्हचा बॅलन्स राहतो.
3) जागतिक तणावात संरक्षण
युद्ध, निर्बंध (सॅंक्शन्स) किंवा जागतिक तणाव असताना सोनं उपयोगी ठरतं. गरज पडल्यास ते विकून व्यवहार करता येतात.
4) देशावर विश्वास वाढतो
मोठं गोल्ड + फॉरेन रिझर्व्ह असलं की त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर जगाचा विश्वास वाढतो.
भारताकडे किती सोनं आहे?
वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या माहितीनुसार भारताकडे अधिकृतरित्या जवळपास 880 टन सोने आहे. त्यामुळे भारत जगात 8व्या क्रमांकावर येतो. भारतामध्ये सोने फक्त गुंतवणुकीसाठी नाही तर संस्कृती, परंपरा आणि भावना आहे. लग्न, सण, अक्षय तृतीया, धनत्रयोदशी या दिवशी सोने खरेदीला मोठं महत्त्व आहे. अंदाजांनुसार भारतीय घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये मिळून 20,000 ते 25,000 टन इतकं सोनं असू शकतं. (हे सरकारी आकड्यात येत नाही.)

