Gold silver Price: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा विक्रम
सांगली : सोन्या-चांदीच्या दरातील अस्थिरता बुधवारीही कायम राहिली. पुन्हा दराचा विक्रम झाला. चांदीचा दर जीएसटीसह 3 लाख 27 हजार 540 रुपये झाला. विशेष म्हणजे सकाळी दर 3 लाख 31 हजार 560 रुपये होता, तो सायंकाळी उतरला. सोन्याचा दरही बुधवारी 1 लाख 59 हजार 856 रुपयांवर पोहोचला. एका दिवसात चांदीच्या दरात पुन्हा 3 हजार 90 रुपयांनी, तर सोन्याच्या दरात तब्बल 6 हजार 901 रुपयांनी वाढ झाली. सोन्या-चांदीच्या दरात भरमसाट वाढ होत असल्यामुळे सांगलीच्या सराफांनी तीन दिवसांपासून विक्री पूर्णपणे बंद ठेवली आहे.
दहा दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दराचा रोज नवा विक्रम होत आहे. महिन्याभरात चांदीचा दर तब्बल एक लाखाहून अधिक रुपयांनी, तर सोन्याचा दर तेरा हजार रुपयांनी वाढला आहे. दरवाढीमुळे ग्राहकांनी सराफ कट्ट्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. काही सराफांनी विक्री पूर्णपणे बंद केली आहे, तर काही जणांनी केवळ बुकिंग सुरू केले आहे.

